share market update मुंबई : माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांमधील तेजी आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची आशा निर्माण झाल्याने सेन्सेक्सने ३ शतकी कमाई केली. निफ्टी देखील २४,८५० अंशांच्या पातळीपुढे बंद होण्यास यशस्वी ठरला.

मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात बाजारात तेजीवाल्यांचा जोर कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१४.०२ अंशांनी वधारून ८१,१०१.३२ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३९४.०७ अंशांची कमाई करत ८१,१८१.३७ या सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. सलग पाचव्या सत्रात निफ्टीने वाढ नोंदवली असून तो ९५.४५ अंकांनी वधारून २४,८६८.६० पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने ११ सप्टेंबर रोजी समभाग पुनर्खरेदी प्रस्तावावर विचार करणार असल्याचे जाहीर केल्यांनतर समभागाने ५.०३ टक्क्यांची उसळी घेतल्याने निर्देशांकाला बळ मिळाले.

जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांमुळे मंगळवारच्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजार तेजीत होता. प्रतिकूल परिस्थिती असूनही इन्फोसिसने समभाग पुनर्खरेदीची घोषणा केल्याने आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये उत्साह संचारला आहे. उलट, जीएसटी दर कपातीनंतर तेजी आलेल्या वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांमध्ये मात्र नफावसुलीमुळे दबाव दिसून आला.

जागतिक व्यापार करारासंबंधित अनिश्चिततेमुळे प्रमुख निर्देशांक आगामी काळात श्रेणीबद्ध राहण्याची शक्यता आहे. मात्र फेड दर कपातीची वाढती शक्यता अल्पावधीत आशावाद टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

वधारले                                         घसरले

टेक महिंद्र                                  ट्रेंट

अदानी पोर्ट्स                             अल्ट्राटेक सिमेंट

एचसीएल टेक                            एनटीपीसी

टीसीएस                                       जिओ फायनान्स

सन फार्मा                                  टायटन