मुंबई: परदेशी गुंतवणुकीची नव्याने झालेली आवक आणि डोनाल्ड ट्रम्प-व्लादिमीर पुतिन या दोन राष्ट्राध्यक्षांमध्ये १५ ऑगस्टला होऊ घातलेल्या चर्चेसंंबंधीच्या आशावादाने सोमवारी बाजारात दिलासादायक तेजी दिसून आली. मुख्यत: तेल, वाहने आणि बँकांमध्ये झालेल्या खरेदीमुळे प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ७४६ अंशांनी उसळला आणि शुक्रवारच्या सत्रात गमावलेली ८० हजारांची पातळी त्यामुळे त्याला पुन्हा गाठता आली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७४६.२९ अंशांनी (०.९३ टक्के) वाढून सोमवारी सत्रअखेरीस ८०,६०४.०८ वर बंद झाला. सेन्सेक्समधील, ३० पैकी २६ कंपन्यांनी तेजी दर्शविली. दिवसभरात सेन्सेक्सचा ७७८.२६ अंशांचा उच्चांक राहिला आणि जवळपास या उच्चांकी पातळीनजीक त्याने बंद नोंदवावा, अशी बाजारातील वातावरणाने उत्साही वळण घेतल्याचे आढळून आले. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक २२१.७५ अंशांच्या (०.९१ टक्के) कमाईसह २४,५८५.०५ वर बंद झाला.

उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारी १,९३२.८१ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी करणाऱ्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी, सोमवारीही बाजाराला खरेदीचा हात दिला. सप्ताहाअखेरीस नोंदविलेल्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीनंतर, सोमवारी बाजारात दिलासादायक तेजी दिसून आली; सकारात्मक जागतिक संकेत आणि मुख्य म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार परतल्याने बाजारातील भावनेला सकारात्मक वळण मिळाले.

या आठवड्यात (१५ ऑगस्टला) अमेरिका-रशिया दरम्यान होत असलेल्या शिखर परिषदेकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत. ट्रम्प-पुतिन यांच्यात होऊ घातलेल्या चर्चेतून, भू-राजकीय तणाव लक्षणीय कमी होण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, इटर्नल, ट्रेंट, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि लार्सन अँड टुब्रो हे प्रमुख वाढणारे समभाग होते. त्या उलट भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल आणि मारुती हे समभाग मागे पडले. सेन्सेक्स-निफ्टीतील जवळपास १ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत, बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७९ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.३५ टक्क्यांनी वधारला. मुंबई शेअर बाजारावर २,२३७ समभागांनी वाढ केली तर १,९३० समभाग घसरणीत राहिले. ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक वगळता, बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक मोठ्या वाढीसह बंद झाले.