नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याची योजना केंद्राकडून आखली जात असून, गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेशी या प्रस्तावावर अर्थमंत्रालयाची चर्चा सुरू असून, अद्याप त्या संबंधाने अंतिम निर्णय घेतला गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. यातून सोमवारी बँकांचे समभागांना उत्तरार्धात अकस्मात मोठी मागणी मिळून, दमदार तेजीसह ते बंद झाले.
सरकारी बँकांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांकडून रस दिसून येत आहे आणि परदेशी मालकीची मर्यादा वाढवल्याने येत्या काळात बँकांनाही व्यवसाय वाढीसाठी अधिक भांडवल मिळू शकेल, असा यामागील सरकारचा विचार असल्याचे रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
सध्या थेट परकीय गुंतवणुकीची सरकारी बँकांतील मर्यादा ही २० टक्के असून, ती ४९ टक्क्यांवर नेली जाईल. तथापि या बँकांमध्ये किमान ५१ टक्के भागभांडवली हिस्सा कायम राखण्याची सरकारची योजना आहे. मात्र सध्या सर्वच १२ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सरकारची मालकी यापेक्षा खूपच जास्त आहे. या उलट खासगी बँकांमध्ये ७४ टक्के मर्यादेपर्यंत परकीय मालकी राखण्याला परवानगी आहे.
दुबईस्थित एमिरेट्स एनबीडीने अलिकडेच खासगी क्षेत्रातील आरबीएल बँकेतील ६० टक्के हिस्सा ३०० कोटी डॉलरच्या मोबदल्यात खरेदी केला आहे. त्या आधी जपानच्या सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पने भारताच्या येस बँकेतील २० टक्के हिस्सा १६० कोटी डॉलरला विकत घेतला आहे. भारतातील बँकिंग उद्योगात परकीय गुंतवणूकदारांचा रस वाढल्याचे हे द्योतक असून, सरकारी मालकीच्या बँकांतही त्यांना हिस्सेदारी वाढविण्याची संधी दिली जावी, असा सरकारचा मानस आहे.
शेअर बाजाराकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, सरलेल्या ३० सप्टेंबरपर्यंत सरकारी बँकांमध्ये सध्या कॅनरा बँकेत सुमारे १२ टक्के इतकी उच्चांकी परदेशी मालकी आहे, तर त्या उलट युको बँकेत ती जवळजवळ शून्य आहे.
बँकांच्या समभागांत दमदार तेजी
परदेशी मालकीच्या मर्यादेत वाढीच्या शक्यतेच्या या वृत्तानंतर, सोमवारी बीएसई बँकेक्स निर्देशांक ४२२ अंकांनी वाढून ६५,५१२ वर बंद झाला आणि बँक निफ्टी ४१४ अंकांनी वाढून ५८,११४ वर बंद झाला. बरोबरीने निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक ३.०२ टक्क्यांनी वाढून ८०५३.४ च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. सत्र समाप्तीला २.२२ टक्के वाढीसह तो बंद झाला. सर्वच बँकांच्या समभागांत बहारदार तेजी दिसून आली, तर सरकारी मालकीच्या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँकेचा समभाग २.४८ टक्क्यांनी, कॅनरा बँक २.७८ टक्क्यांनी, बँक ऑफ इंडिया (४.४८%) आणि इंडियन बँक (१.२०%) हे समभाग सर्वाधिक वधारले. बँक ऑफ बडोदा (२.८७%), स्टेट बँक (२%) हे समभागही वाढले. खासगी क्षेत्रातील फेडरल बँक (२.८८%), इंडसइंड बँक (२.०२%), अॅक्सिस बँक (०.९७%) एचडीएफसी बँक (०.८२%) आणि येस बँक (०.४०%) हे समभागही वधारले.
