मुंबई: राज्य सहकारी बँकेकडून स्थापित आणि सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिल्या व एकमेव अशा ‘सायबर सिक्युरिटी ऑपरेशन’ (सी-सॉक) केंद्राचे उद्घाटन नुकतेच राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. हे देशातील क्रमांक एकचे आणि सर्वात अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त केंद्र असल्याचा निर्वाळा नाबार्डचे वरिष्ठ मुख्य महाव्यवस्थापक मणिकुमार एस. यांनी याप्रसंगी दिला.

मणिकुमार म्हणाले, त्यांनी देश-विदेशातील अनेक सायबर सिक्युरिटी ऑपरेशन केंद्रांना भेटी दिल्या आहेत. परंतु राज्य सहकारी बँकेने स्थापन केलेले ‘सी-सॉक’ केंद्र हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना असून त्यांनी पाहिलेल्या देश-विदेशातील इतर केंद्रांपेक्षा ते खूप प्रगत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

राज्य बँकेने सुमारे ५० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीतून वाशी येथील स्वत:च्या जागेत या केंद्राची स्थापना केली आहे. ‘सहकाराअंतर्गत सहकार’ या सहकारातील अत्युच्च तत्वाला अनुसरून राज्य बँकेने प्रथम राज्यातील सर्व जिल्हा बँकांना व नंतर राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांना ही सुविधा कोणतेही शुल्क न घेता उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे, असे याप्रसंगी राज्य बँकेचे प्रशासक विद्यााधर अनास्कर म्हणाले. यातून बँकांना ज्ञात व अज्ञात अशा दोन्ही प्रकारच्या संभाव्य सायबर हल्ल्यांपासून सुरक्षिततेसह, सायबर हल्ल्यांचा सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेऊन त्याचे परिणामकारक नियंत्रण करणे व असे हल्ले परतवून लावणे शक्य बनेल.