मुंबई : जगातील तिसऱ्या क्रमांकाचे धनाढय़ उद्योगपती गौतम अदानीप्रवर्तित उद्योगसमूहाने  अनेक दशकांपासून ताळेबंदात आणि लेख्यांमध्ये गैरप्रकार केल्याच्या अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालाचे शुक्रवारी भांडवली बाजारात तीव्र  पडसाद उमटले. सेन्सेक्स-निफ्टी हे प्रमुख निर्देशांक तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गडगडले असून, २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प तोंडावर असताना गुंतवणूकदारांमधील चिंता अधोरेखित झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदानी समूहातील कंपन्यांमधील समभागांच्या घसरणीसह बँका, वित्तीय सेवा आणि तेल कंपन्यांचे समभाग शुक्रवारच्या सत्रात जोरदार आपटले. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने सत्राच्या पूर्वार्धात तब्बल १,२३० अंश गमावले होते. मात्र, शेवटच्या तासाभरात काहीसा सावरत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर ८७४.१६ अंशांनी म्हणजेच १.४५ टक्क्यांनी घसरून ५९,३३०.९० अंशांवर बंद झाला. २१ ऑक्टोबर २०२२ नंतर सेन्सेक्सने नोंदविलेली ही नीचांकी पातळी आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २८७.६० अंशांची (१.६१ टक्के) घसरण झाली आणि तो १७,६०४.३५ पातळीवर स्थिरावला. बुधवारपाठोपाठ, शुक्रवारच्या या तुफान समभाग विक्रीच्या परिणामी गुंतवणूकदारांचे तब्बल १०.७३ लाख कोटी रुपयांनी नुकसान झाले आहे.

जगभरात मंदीचे काहूर सुरू असताना, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाचा रोख कसा असेल, याबद्दल साशंकता आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा घेतल्याने बाजारातील घसरणीला अधिकच चालना मिळाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

बँकांनाही फटका

अदानी समूह कंपन्यांसंबंधीच्या प्रतिकूल संशोधन अहवालामुळे गुंतवणूकदारांमध्ये पसरलेल्या नकारात्मक भावनांमुळे बाजारात तीव्र घसरण झाली. दुसरीकडे, अदानी समूहाला कर्ज दिल्याने त्याचे भविष्यात प्रतिकूल परिणाम होण्याच्या भीतीने बँकांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. खासगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांना याचा सर्वाधिक फटका बसला.

स्टेट बँक (५.०३ टक्के), आयसीआयसीआय बँक (४.४१ टक्के), इंडसइंड बँक (३.४३ टक्के), अ‍ॅक्सिस बँक (२.०७ टक्के), कोटक बँक (२.०३ टक्के), एचडीएफसी बँक (१.९६ टक्के) हे समभाग घसरणीत आघाडीवर राहिले. दुसरीकडे, बाजारातील नकारात्मक वारे आणि घसरणीकडे दुर्लक्ष करत, टाटा मोटर्स आणि मिहद्र अँड मिहद्रचे समभाग शुक्रवारी सर्वाधिक तेजीत होते.

अदानीने ४.२ लाख कोटी गमावले

’‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात अदानींच्या समभागांत घसरण कायम राहिली.

’या सत्रात भांडवली बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग मोठय़ा आपटीसह कोसळले. परिणामी समूहाचे बाजार भांडवल शुक्रवारच्या सत्रात सुमारे ३.४ लाख कोटींनी घसरले.

’या सत्रादरम्यान अदानी समूहातील कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात १८.५ टक्क्यांची घसरण झाली. बुधवारी बसलेल्या दणक्यासह अदानी समूहाच्या बाजार भांडवलात एकूण ४.२ लाख कोटी रुपयांचा ऱ्हास झाला.

’अदानींच्या चार कंपन्यांचे समभाग शुक्रवारच्या सत्रात घसरणीच्या स्वीकारार्ह कमाल मर्यादेपर्यंत अर्थात २० टक्क्यांच्या ‘लोअर सर्किट’पर्यंत गडगडले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market crash sensex plunges 874 points after report on adani group zws