मुंबई : अमेरिकी भांडवली बाजारातील घसरणीचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. त्यापरिणामी दोन सत्रांतील तेजीनंतर गुरुवारच्या प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये २०० अंशांची घसरण झाली. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा समभाग विक्रीचा मारा केल्याने बाजारावर मंदीवाल्यांनी पुन्हा ताबा मिळविला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८७.३१ अंशांनी घसरून ६०,८५८.४३ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ३२९.१९ अंश गमावून ६०,७१६.५५ या सत्रातील नीचांकी पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५७.५० अंशांची घसरण झाली आणि तो १८,१०७.८५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवरील नकारात्मक कलामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात निर्देशांकांनी सलग दोन सत्रांतील तेजी गमावली. अमेरिकी किरकोळ बाजारात घटलेली मागणी आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीच्या समर्थनाच्या भूमिकेने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला आहे. संभाव्य मंदीच्या भीतीने जागतिक भांडवली बाजारांमध्ये घसरण झाली आहे, ज्यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील अस्थिरतेचे वातावरण आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, कोटक महिंद्र बँक, हिंदूस्तान युनिलिव्हर, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसव्‍‌र्ह, आयटीसी आणि नेस्ले या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर टाटा स्टील, पॉवर ग्रिड, टेक महिंद्र, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग तेजी दर्शवीत होते. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ३१९.२३ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market news bse sensex fell 187 points nifty ends around 18100 zws