मुंबईः अस्थिरतेचे ग्रहण लागलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांकांनी आठवड्याची सुरुवात किंचित घसरणीने केली. सलग सातव्या दिवसापर्यंत लांबलेली निर्देशांकाची ही घसरण मालिका चालू आठवड्याच्या अखेरीस रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वेगळे वळण घेण्याची अपेक्षा आहे. तथापि सोमवारी त्या परिणामी परदेशी गुंतवणूकदारांचा विक्री करून निधी बाहेर काढून घेण्याचे धोरण कायम राहिल्याचे दिसून आले.
अत्यंत्र त्रोटक स्वरूपात सुरू राहिलेल्या व्यापारात, चढउतारांच्या हिंदोळ्यांनंतर, बीएसई सेन्सेक्स ६१.५२ अंशांनी घसरून ८०,३६४.९४ वर स्थिरावला. दिवसभरात, ८०,८५१.३८ चा उच्चांक आणि ८०,२४८.८४ चा नीचांक असा ६०० अंशांच्या निमुळत्या श्रेणीत त्याची हालचाल राहिली. दुसरीकडे एनएसई निफ्टी निर्देशांक १९.८० अंशांनी घसरून २४,६३४.९० वर बंद झाला.
दोन्ही निर्देशांकातील सोमवारची घसरण नाममात्र ०.०८ टक्के अशी राहिली. दिवसांतर्गत बहुतांश काळ चांगल्या कमाईसह दोन्ही निर्देशांक सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. तर परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे सलग सात सत्रांमध्ये त्यात ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सरलेला आठवडा हा मागील सहा महिन्यांतील निर्देशांकांसाठी सर्वात वाईट कामगिरीचा सप्ताह राहिला आहे.
गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने आणि परकीय गुंतवणूकदार संस्था अर्थात ‘एफआयआय’ची विक्री सुरू राहिल्याने देशांतर्गत बाजाराने अत्यंत अस्थिर राहिलेल्या सत्राचा शेवट किंचित घसरणीने केला. अमेरिका-भारत व्यापार कराराच्या भवितव्यासंबंधाने सुस्पष्टतेचा अभाव आणि ट्रम्प धोरणांनी लक्ष्य केल्या गेलेल्या आयटी आणि औषध निर्माण क्षेत्रातील शेअर्सवरील ताण ही बाजारासाठी जवळच्या काळातील चिंता आहेत, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
मात्र रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या होऊ घातलेल्या बैठकीतून व्याजदर कपातीचा अनुकूल निर्णय हा अर्थव्यवस्थेसाठी आणि बाजारासाठी ‘बूस्टर डोस’ ठरेल, असाही विश्लेषकांचा कयास आहे. मागील सलग सात दिवसांत, सेन्सेक्स २,६४९.०२ अंशांनी (३.१९ टक्के) घसरला आहे आणि निफ्टी निर्देशांक ७८८.७ अंशांनी (३.१० टक्के) घसरला आहे.
विक्रीचा मारा कुणावर?
वाहने आणि एफएमसीजी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, तर रिअल्टी, एनर्जी आणि मेटल शेअर्समध्ये वाढ झाली. सेन्सेक्समध्ये स्थान असणाऱ्या कंपन्यांमध्ये मारुती, अॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे प्रमुख घसरणीतील शेअर्स होते. त्या उलट, टायटन, स्टेट बँक, इटर्नल आणि ट्रेंट हे प्रमुख वधारलेले शेअर्स ठरले. सलग पडझडीने आकर्षक भाव पातळीवर आलेल्या निवडक मिडकॅप शेअर्सना खरेदीचे पाठबळ मिळताना दिसून आले. परिणामी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारा बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३४ टक्क्यांनी वधारला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.१७ टक्क्यांनी घसरला.