मुंबई : अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हसह जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँकांनी पुन्हा एकदा व्याजदर वाढ करण्यासह, महागाई नियंत्रणासाठी आणखी कडक पावले उचलण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक पडसाद उमटले. अर्थव्यवस्था मंदावण्याच्या धास्तीने, देशांतर्गत भांडवली बाजारातही शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा आणि डॉलरपुढे पुन्हा कमकुवत झालेल्या रुपयाने बाजारातील घसरण अधिक वाढवली.

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४६१.२२ अंश गमावून ६१,३३७.८१ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसभरात ६१,२९२.५३ अंशांच्या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४५.९० अंशांची घसरण झाली आणि तो १८,२६९ पातळीवर बंद झाला. सरलेल्या आठवडय़ात सेन्सेक्स ८४३.८६ अंश म्हणजेच १.३६ टक्क्यांनी घसरला आहे, तर निफ्टीने २२७.६० अंश गमावत १.२३ टक्क्यांची माघार घेतली.

युरोपीय मध्यवर्ती बँक (ईसीबी) आणि बँक ऑफ इंग्लंडसारख्या मध्यवर्ती बँकांनी अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हचे अनुसरण करत व्याजदरात वाढ केली. शिवाय आगामी काळातदेखील दरवाढ सुरूच राहण्याचे संकेत दिल्याने जगभरातील भांडवली बाजार कोसळले. महागाईवर नियंत्रण राखण्यासाठी आक्रमक भूमिका कायम राहण्याच्या या शक्यतेने जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता वाढवली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांध्ये डॉ. रेड्डीजच्या समभागात ३.६२ टक्क्यांची घसरण झाली, त्यापाठोपाठ मिहद्र अँड मिहद्र, एशियन पेंट, टीसीएस, स्टेट बँक, टायटन, पॉवरग्रीड, विप्रो या कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. दुसरीकडे एचडीएफसी बँक, एचयूएल, नेस्ले इंडिया आणि टाटा स्टील या केवळ चार कंपन्यांच्या समभागांची अर्ध्या टक्क्यांची तेजी दर्शविली.

५.७८ लाख कोटींची संपत्ती लयाला

सलग दोन सत्रांतील निर्देशांकातील घसरणीने गुंतवणूकदारांची ५.७८ लाख कोटींची संपत्ती लयाला गेली. गुरुवार आणि शुक्रवारच्या सत्रात मिळून सेन्सेक्सने १,३४०.१ अंशांची माघार घेतली. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल दोन दिवसांत ५,७८,६४८.३९ कोटी रुपयांनी घसरून २८५.४६ लाख कोटी रुपयांवर गडगडले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market update sensex falls 461 points nifty settles at 18269 zws