मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टीची सलग तिसऱ्या सत्रात पीछेहाट झाली. परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली वस्तू आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केल्याने सेन्सेक्समध्ये पाच शतकी घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५०२.२५ अंशांची घसरण झाली असून तो ८०,१८२.२० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६३४.३८ अंशांची माघार घेत ८०,०५०.०७ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३७.१५ अंशांनी घसरून २४,१९८.८५ पातळीवर बंद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात चिंतेत भर घातली आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदराबाबत निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी बुधवारीही सावध व्यवहारांचे धोरण सुरू ठेवले. शिवाय गेल्या दोन तिमाहीत कंपन्यांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. याचा त्या कंपन्यांच्या मूल्यांकनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये वाढलेल्या व्यापार तुटीने देशांतर्गत भावनांवर नकारात्मक परिणाम केला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा : राधाकिशन दमानी स्व-निर्मित उद्योजकांच्या यादीत अव्वल – हुरून इंडिया

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्सच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर या घसरणीतदेखील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्र आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या कंपन्यांची कामगिरी चांगली राहिली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारच्या सत्रात ६,४०९.८६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा : ‘आयटीसी’च्या भागधारकांना लवकरच नवीन हॉटेल कंपनीच्या समभागांचा नजराणा

सेन्सेक्स ८०,१८२.२० -५०२.२५ (-०.६२%)

निफ्टी २४,१९८.८५ -१३७.१५ (-०.५६%)

डॉलर ८४.९४ ३ पैसे

तेल ७३.६७ ०.४८ टक्के

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market updates sensex declined by 502 points due to foreign investors print eco news css