वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वाहन निर्मिती कंपनी असलेल्या टाटा मोटर्सचे बहुप्रतिक्षित वाणिज्य आणि प्रवासी वाहन कंपन्यांमध्ये विलगीकरण १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात टाटा मोटर्सने वाणिज्य आणि प्रवासी वाहन कंपन्यांचे व्यवसाय वेगवगेळे करण्याची घोषणा केली होती.

टाटा मोटर्सच्या वाणिज्य वाहन व्यवसायाचे नाव आता टीएमएल कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड असे असेल आणि प्रवासी वाहन ज्यामध्ये विद्युत शक्तीवर चालणारी म्हणजेच ईव्ही आणि जग्वार लँड रोव्हर व्यवसायांचा समावेश असेल, त्या कंपनीचे नाव टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स असेल.

गेल्यावर्षी ४ मार्च २०२४ मध्ये टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने कंपनीचे दोन स्वतंत्र सूचिबद्ध कंपन्यांमध्ये विलगीकरण करण्यास मान्यता दिली होती.त्यामुळे कंपनीचा वाणिज्य वाहन व्यवसाय टीएमएल कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेडमध्ये विलग केला जाईल, तर त्यांचा विद्यमान प्रवासी वाहन व्यवसाय टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये विलीन केला जाईल. 

भागधारकांची काय?

टाटा मोटर्सच्या विलगीकरणानंतर सध्याची कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड ही टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेडमध्ये बदलेल तर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल ही विलग केलेली कंपनी असेल. कंपनीने निश्चित केलेल्या रेकॉर्ड तारखेला ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर असतील त्यांना नव्याने सूचिबद्ध होणाऱ्या वाणिज्य वाहन कंपनीचे समभाग मिळतील. म्हणजेच टाटा मोटर्सचे १०० शेअर असल्यास नवीन जन्माला असलेल्या वाणिज्य वाहन कंपनीचे १०० समभाग कोणतेही अतिरिक्त पैसे न देता मिळतील.

मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्सचा समभाग १.१५ टक्क्यांनी वधारून ६८०.२० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे २,५०,४६८ लाख कोटींचे  बाजारभांडवल आहे.