मुंबई : जवळपास दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच टाटा समूहातील कंपनी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना आजमावणार असून, ‘टाटा टेक्नॉलॉजीज’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २२ नोव्हेंबरपासून खुली होत आहे. गुंतवणूकदारांना २४ नोव्हेंबरपर्यंत कंपनीच्या समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करता येईल. कंपनीने विक्रीसाठी प्रति समभाग ४७५ रुपये ते ५०० रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. यातून ३,०४२ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भागविक्रीच्या माध्यमातून प्रवर्तक कंपनी टाटा मोटर्स आणि विद्यमान भागधारक त्यांचा भांडवली हिश्शाच्या आंशिक विक्रीच्या (ऑफर फॉर सेल) माध्यमातून ११.४ टक्के हिस्सा (६.०८ कोटी समभाग) विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. शिवाय अल्फा टीसी होल्डिंग्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड देखील त्यांच्या मालकीच्या समभागांची विक्री करतील. सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांना २१ नोव्हेंबर रोजी कंपनीचे समभाग खरेदीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

हेही वाचा… ‘विंडफॉल’ करात कपात; डिझेल निर्यातीवरील करभार हलका

वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ३० आणि त्यानंतर ३० च्या पटीत समभागांसाठी बोली लावून या भागविक्रीत सहभागी होता येईल. कंपनीचा समभाग महिनाअखेर ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध होणे अपेक्षित आहे. ‘आयपीओ’च्या माध्यमातून उभारला जाणारा निधी केवळ प्रवर्तक कंपन्यांना प्राप्त होणार आहे. कंपनी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर कंपनीचे बाजारभांडवल १९,२६९ कोटी ते २०,२८३ कोटी रुपयादरम्यान राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतरही सहाराप्रकरणी पाठपुरावा सुरूच राहील : सेबी अध्यक्ष

‘टाटा’ नाममुद्रेचे वलय

टाटा समूहातील ध्वजाधारी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (टीसीएस) समभाग २००४ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाला. भागधारकांना भरभरून लाभ देणारा टीसीएस सध्या बाजार भांडवलात अव्वल तीनांत सामील कंपनी आहे. टीसीएसनंतर जवळपास दोन दशकात बाजारात सूचिबद्ध होत असलेली ही टाटा नाममुद्रेची दुसरी कंपनी असेल. ‘टाटा’ नावाचे वलय जोडले गेल्यामुळे या भागविक्रीला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा… आगामी दोन वर्षात ६ ते ७.१ टक्के दराने विकास शक्य

टाटा टेक्नॉलॉजीज नेमके काय करते?

ही डिजिटल धाटणीच्या अभियांत्रिकी सेवा पुरवणारी जागतिक कंपनी आहे. उपकरण उत्पादकांना विशेषत: विमान आणि वाहन निर्माण क्षेत्रातील उद्योगांना ती नवीन उत्पादनांचे संकल्पचित्र, विकसन आणि उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन या क्षेत्रात सेवा प्रदान करते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata technologies is planning to raise rs 3042 51 crore via public issue print eco news asj