जागतिक पातळीवर वाढत्या अनिश्चिततेपोटी सोने-चांदीची मागणी वाढते आहे.शुक्रवारी यूबीएसने २०२५ च्या अखेरीस सोन्याच्या किमतीचा अंदाज प्रति औंस ३०० डॉलरने वाढवून ३,८०० डॉलर केला आहे. म्हणजेच सोने प्रति १० ग्रॅम १,२०,००० रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता आहे आणि २०२६ च्या मध्यापर्यंत २०० डॉलरने वाढवून ३,९०० डॉलर केले. फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपात आणि भू-राजकीय जोखमींमुळे जागतिक मंचावर अमेरिकी डॉलरचे महत्त्व कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्विस बँकेने सोन्याच्या एक्सचेंज-ट्रेडेड फंडाचा अंदाजही सुधारला असून, २०२५ च्या अखेरीस पातळी ३,९०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो ऑक्टोबर २०२० मध्ये स्थापित केलेल्या ३,९१५ टनांच्या मागील विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे.
वाढती भू-राजकीय चिंता तसेच अमेरिकी प्रशासन आणि फेडरल रिझर्व्हमधील धोरणात्मक तफावत हे सोन्याचे आकर्षण वाढवण्या मागील प्रमुख कारण आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्याजदर कमी करण्याच्या बाजूने असलेले धोरण देखील कारणीभूत आहे, यूबीएसने म्हटले आहे.
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षाच्या अखेरीस व्याजदरात एकूण २०० आधारबिंदूंची कपात करण्याची शक्यता आहे, जे अपेक्षेपेक्षा ५० आधारबिंदू अधिक आहे.
सोन्या-चांदीचा नवीन उच्चांक
जागतिक पातळीवर सोने-चांदी नवनवीन उच्चांक गाठत आहेत. जागतिक बाजारपेठेतील मागणी आणि पुढील आठवड्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढल्याने पुन्हा एकदा मौल्यवान धातूंनी विक्रमी दर गाठले आहेत. सोने आणि चांदीच्या किमती अनुक्रमे १,१३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीने १,३२,००० रुपये प्रति किलोग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या भावात सलग चौथ्या सत्रात ७०० रुपयांची वाढ भर घालत १,१३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मागील बाजार सत्रात तो १,१३,१०० रुपयांवर पोहोचला होता. चालू कॅलेंडर वर्षात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ३४,८५० रुपये म्हणजेच ४४.१४ टक्के वाढ झाली आहे, ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोने प्रति १० ग्रॅम ७८,९५० रुपये पातळीवर होते. स्थानिक सराफा बाजारात, सोने ७०० रुपयांनी वाढून १,१३,३०० रुपयांवर पोहोचले आहे.
चांदीला सोन्याचे मोल
चांदीच्या किमतीत मोठी तेजी आली. शुक्रवारच्या सत्रात त्यात ४,००० रुपयांची वाढ होऊन १,३२,००० रुपये प्रति किलोग्रॅमचा सर्वोच्च टप्पा गाठला.
औद्योगिक धातूंमध्ये सकारात्मक कल आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंडांकडून मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे चांदीच्या किमती वाढल्या आहेत.
या वर्षी चांदीच्या किमती तेजीत आहेत, ३१ डिसेंबर २०२४ रोजी ८९,७०० रुपये प्रति किलोग्रॅमवरून त्यात ४२,३०० रुपयांची भर पडली आहे. म्हणजेच ४७.१६ टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत.
मौल्यवान धातूच्या किमतीतील वाढ ही अलिकडच्या अमेरिकेतील रोजगाराची आणि महागाईच्या आकडेवारीमुळे झाली आहे. ज्यामुळे २०२५ च्या अखेरीस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली होती, ज्यामुळे सोने खरेदीला प्रोत्साहन मिळत आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक – कमॉडिटीचे सौमिल गांधी म्हणाले.
अमेरिकेच्या व्यापार धोरणांबाबत वाढती अनिश्चितता आणि जगमान्य चलन असलेल्या डॉलरला पर्याय म्हणून बहुतांश देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी वाढवली आहे. – जतीन त्रिवेदी, संशोधक विश्लेषक एलकेपी सिक्युरिटीजचे कमॉडिटीज अँड करन्सी