Impact of GST Cut On Stock Market मुंबई: दैनंदिन वापराच्या वैयक्तिक जीवनावश्यक उत्पादनांवरील वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) दर कपातीची घोषणा केल्यानंतर गुरुवारी शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वधारला. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने १५० अंशांची कमाई केली.

‘ब्लूचिप’ कंपन्यांमधील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसमधील विक्रीने ‘सेन्सेक्स’ला झळ बसली. मात्र विमा आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने बाजाराला बळ मिळाले. गुरुवारच्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५०.३० अंशांनी वधारून ८०,७१८.०१ बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ८८८.९६ अंशांची मुसंडी घेत ८१,४५६.६७ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र ‘ब्लूचिप’ कंपन्यांमधील नफावसुलीमुळे सत्रातील उच्चांकावरून निर्देशांक घसरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने केवळ १९.२५ अंशांची भर घातली आणि तो २४,७३४.३० पातळीवर बंद झाला.  

तेजीचे कारण काय?

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या तब्बल साडेदहा तास सुरू राहिलेल्या बैठकीअंती राज्यांशी झालेल्या सहमतीतून, ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचनेला बुधवारी मंजुरी देण्यात आली. म्हणजेच १२ टक्के आणि २८ टक्के हे कर दराचे टप्पे रद्दबातल करण्यात आले. सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या नित्य वापराच्या वस्तू, केश तेल, साबण, सायकलींवरील जीएसटी १२ तसेच १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर येणार आहे. तर  रोटी, पराठे आणि जीवनरक्षक औषधांवर शून्य जीएसटी आकारला जाणार आहे. गुंतागुंतीच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत संपूर्ण फेरबदल करण्यास मंजुरी दिल्यानंतर वैयक्तिक आरोग्य आणि आयुर्विम्यावरील कर आकारणी शून्यावर आणली आहे.

जीएसटी परिषदेने २२ सप्टेंबर, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचना लागू करण्यास मान्यता दिली.वाहन निमिर्ती, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तूसारख्या उपभोग-केंद्रित लाभार्थी क्षेत्रांना वगळता संपूर्ण बाजारात नफावसुली सुरू झाल्याने देशांतर्गत बाजार  स्थिर राहिला. जीएसटी सुसूत्रीकरणाचे देशांतर्गत परिणाम आणि अमेरिकेकडून सुरू असलेल्या व्यापारी शुल्काच्या धमक्यांमुळे बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, ज्याचा वाटा सकल देशांतर्गत उत्पादनाच्या २.२ टक्के वाटा आहे. यामुळे याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होणे अपरिहार्य आहेत. कंपन्या परदेशात उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासारख्या धोरणांद्वारे त्यांच्या विद्यमान ग्राहकांना निर्यात कायम राखण्याचे मार्ग शोधत आहेत. तथापि, निर्यात मंदावण्याची आणि नवीन वाढीच्या संधींना अडथळा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, जीएसटी दर कपातीमुळे देशांतर्गत वापराच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे निर्यात स्पर्धात्मकतेत घट होण्याच्या प्रतिकूल परिणामांना तोंड द्यावे लागेल, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रचा समभाग ५.९६ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट, आयटीसी आणि एचडीएफसी बँकेचे समभाग तेजीसह बंद झाले. मात्र मारुती सुझुकी इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचसीएल टेक, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांची निराशा केली.

शेअर बाजार आकडेवारी

सेन्सेक्स   ८०,७१८.०१ +१५०.३०  (+०.१९%)
निफ्टी  २४,७३४.३० +१९.२५  (+०.०८%)
तेल ६६.८७     -१.०८
डॉलर ८८.१४    +१२ पैसे