Indian Stock Market Comparison With Sachin Tendulkar Batting: नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आशिष कुमार चौहान यांनी भारतीय शेअर बाजारातील सध्याच्या ट्रेंडबद्दल आपले मत मांडले आहे आणि त्याची तुलना दिग्गज सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीशी केली आहे.
आशिष कुमार चौहान यांचा असा विश्वास आहे की, भारतीय शेअर बाजार सचिनच्या फलंदाजीसारखा संयमी आणि सातत्यपूर्ण आहे, परंतु ‘षटकारांच्या अभावामुळे’ त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
“भारतीय बाजार सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीसारखा आहे. आपण १०० शतके ठोकू शकतो, पण आपण प्रत्येक बॉलवर षटकार का मारत नाही, असा प्रश्न लोकांना पडतो”, असे ते सीआयआय फायनान्सिंग समिटमध्ये बोलताना म्हणाले.
“ओएफएस (ऑफर फॉर सेल) करणारे लोक अजूनही कुठे ना कुठे गुंतवणूक करत आहेत, फक्त ते सेकंडरी मार्केटमध्ये उशिरा येत आहेत”, असे ते पुढे म्हणाले.
चौहान यांनी सचिनची फलंदाजी आणि भारतीय शेअर बाजाराची तुलना आकडेवारीच्या आधारे केली आहे. निफ्टी ५० मध्ये २०२५ मध्ये आतापर्यंत फक्त ९% वाढ झाली आहे, ज्यामुळे निफ्टी ५० जागतिक स्तरावरील तुलनेने कमकुवत प्रमुख बाजारपेठांपैकी एक ठरला आहे.
व्यापकपणे, लार्ज-कॅप शेअर्स टिकून राहिले असले तरी, एनएसई ५०० मधील निम्म्याहून अधिक शेअर्स अजूनही २०२४ च्या त्यांच्या उच्चांकापेक्षा २०% पेक्षा जास्त खाली व्यवहार करत आहेत. म्हणजे फलंदाजी तांत्रिकदृष्ट्या उत्तम आहे, पण चौकार-षटकारांची कमतरता आहे.
भारतीय शेअर बाजाराच्या या घसरलेल्या कामगिरीसाठी मंद उत्पादन वाढ, वाढलेले मूल्यांकन आणि जागतिक टॅरिफसंबंधी प्रतिकूल परिस्थिती हे घटक काही प्रमाणात जबाबदार आहेत.
सचिन तेंडुलकरच्या संदर्भाव्यतिरिक्त, आशिष चौहान यांनी भारतीय शेअर बाजारातील उच्च मूल्यांकनांबद्दलच्या चिंतेवरही भाष्य केले.
एनएसईच्या सीईओंनी भारतीय शेअर बाजारातील उच्च मूल्यांकनांचे समर्थन करत असा युक्तिवाद केला की, वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये प्राइस-टू-अर्निंग (पी/ई) रेश्यो स्वाभाविकपणे जास्त असतो.
“विविध कारणांमुळे वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये प्राइस-टू-अर्निंग रेश्योमधील फरक दिसून येतो. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये प्राइस-टू-अर्निंग रेश्यो जास्तच असतो.”
