(उत्तरार्ध)
राहुल बजाज यांनी आयुष्यात अनेक संघर्षाना तोंड दिले कधीही हार मानली नाही. नातेवाईकांशी संघर्ष, व्यावसायिक भागीदारांशी संघर्ष, सरकारशी संघर्ष, ज्या कंपनीने स्कूटरचे तंत्रज्ञान दिले त्या इटलीच्या पिआजियो कंपनीशी संघर्ष, तरुणपणीच कर्मचाऱ्यांच्या संपाला सामोरे जावे लागले तो संघर्ष, अशा प्रत्येक संघर्षावर स्वतंत्र लेख प्रसिद्ध करायचे ठरविले तरी ही मालिका किमान सात-आठ लेखांची होईल. त्यामुळे हा केवळ राहुल बजाज यांच्या कार्याचा धावता आढावा आहे. बजाज ऑटो या कंपनीचा वार्षिक अहवाल १९७३ ला प्रथम वाचायला मिळाला, त्याला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता असे वाटते की, कंपन्याचे ताळेबंद ज्या व्यक्ती निर्माण करतात त्या व्यक्तीचे आयुष्यसुद्धा एक ताळेबंदच असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही विजय, काही पराजय या सगळ्यांना ती व्यक्ती कशी सामोरे जाते हे बघणे महत्त्वाचे असते. कंपनीच्या प्रवर्तकालाच जर कंपनी बुडवायची असेल तर तिला कोणी वाचवू शकत नाही. आणि प्रवर्तकाला कंपनी वाचवायची असेल तर त्या कंपनीला कोणीही बुडवू शकत नाही. एप्रिल १९८२ ला व्हेस्पाला बरोबर घेऊन लोहिया मशीन्स नावाची कंपनी व्हेस्पा स्कूटर उत्पादन करण्यासाठी बाजारात आली होती. कंपनीने अपरिवर्तनीय कर्जरोख्यांना, प्राधान्य तत्त्वावरील रोखे धारकांना व्हेस्पा स्कूटर मिळेल असे जाहीर केले. कंपनीने १०५ कोटी रुपये गोळा केले पुढे काय झाले ते लिहायची आवश्यकता नाही.

आणखी वाचा-बाजारातली माणसं : ‘हमारा बजाज’ राहुल बजाज

राहुल बजाज यांनी यावेळेससुद्धा आपली भूमिका स्पष्टपणे सरकारकडे मांडली, परंतु सरकारने दुर्लक्ष केले. सरकारने तंत्रज्ञानाचा करार पुन्हा नवीन करण्यासाठी परवानगी नाकारली आणि तरीसुद्धा मोटर सायकलच्या उत्पादनातील जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून बजाज ऑटोचे नाव आदराने घ्यावे लागते. आश्चर्याचा धक्का बसेल परंतु जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री असताना त्यांनी बजाज ऑटोला उत्पादनक्षमता दुप्पट करण्याची परवानगी दिली. आणि त्यानंतर नारायण दत्त तिवारी उद्योगमंत्री असताना वाळुंज प्रकल्पाला ३ लाख वाहने तयार करण्यासाठी परवाना मिळाला. फक्त १४ महिन्यांत राहुल बजाज यांनी हा प्रकल्प सुरू केला.

आणखी वाचा-बाजाराचा श्वास असणारा गुंतवणूक गुरू: मार्क मोबियस

५ नोव्हेंबर १९८५ ला राष्ट्रपती झैल सिंग यांनी उद्घाटन केले. आणि तीन वर्षांनंतर त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी तीन लाखांवरून १० लाखांपर्यंत उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी परवाना दिला. देशी कंपन्यांना जर जगाच्या बाजारपेठेत मोठ्या कंपन्यांची स्पर्धा करायची असेल तर हात-पाय बांधून पळायला सांगायचे हे अत्यंत चुकीचे होते. तरीही सूडाच्या राजकारणाचे अनेक उद्योगपती बळी पडलेले आहेत. भारतात त्यानंतरही अनेक कंपन्या आल्या, उत्पादन वाढले आणि त्यामुळे जुने दिवस मागे पडले. म्हणूनच वाटते, वेगवेगळ्या व्यक्तींवर चित्रपट निर्माण होतात. राहुल बजाज यांच्यावरसुद्धा बायो्पिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

आणखी वाचा-बाजारातील माणसे: कक्षा रुंदावत नेणारा अविरत प्रवास… कुमार मंगलम बिर्ला

बजाज ऑटोच्या सहकार्याने अनेक छोटे छोटे उद्योजक अनेक भागांत पुढे येऊ शकले. आपल्याच नातेवाईकांना प्रोत्साहन द्यायचे असे राहुल बजाज यांनी कधी केले नाही. भागधारकांवर प्रेम करणारा हा माणूस होता. यामुळे विलगीकरणाच्या अगोदरची बजाज ऑटो दर दोन-चार वर्षांनी एकास एक, दोनास एक अशा प्रकारे बोनस शेअर्सचे वाटप करीत होती. आणि त्याशिवाय लाभांश वाटपसुद्धा चांगले होते. विलगीकरणानंतरसुद्धा १३ सप्टेंबर २०१० या दिवशी पुन्हा एकास एक बोनस शेअर्सचे वाटप झाले. तर राहुल बजाज यांचे निधन झाल्यानंतर बजाज फिनसर्व्ह या कंपनीने एकास एक शेअर्सचे वाटप केले आणि शेअरची विभागणीदेखील केली. २०१६ ला बजाज फायनान्सनेसुद्धा एकास एक बोनस शेअर्सचे वाटप केले. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्सचे वाटप आणि लाभांशात वाढ याचा पायंडा राहुल बजाज यांनी निर्माण केला, याचीसुद्धा गुंतवणूकदारांनी दखल घेतली पाहिजे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaratil mansa success story of industrialist rahul bajaj print eco news css