Sheshasai Technologies IPO: पुढील आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असणार असून, या कालावधीत बाजारात २२ नवे आयपीओ येणार आहेत. यातून एकत्रितपणे सुमारे ५,००० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न आहे. यातून भारतीय शेअर बाजारातील किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांचा वाढता रस आणि स्थिर संस्थात्मक सहभागातून तेजीचे वातावरण दिसून येत आहे.

शेषासाई टेक्नॉलॉजीज आघाडीवर

दरम्यान या २२ पैकी ८ आयपीओ मोठ्या आकाराच्या कंपन्यांचे तर १४ आयपीओ लघु आणि मध्यम कंपन्यांचे आहेत.

मोठ्या कंपन्यांमध्ये, शेषासाई टेक्नॉलॉजीज ८१३ कोटी रुपयांच्या इश्यूसह आघाडीवर आहे, त्यानंतर आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकिंग ७४५ कोटी रुपयांच्या इश्यूसह आणि अटलांटा इलेक्ट्रिकल्स ६८८ कोटी रुपयांच्या इश्यूसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इतर प्रमुख आयपीओंमध्ये एपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज (५०४ कोटी रुपये), सोलरवर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स (४९० कोटी रुपये), जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (४५० कोटी रुपये), गणेश कंझ्युमर प्रॉडक्ट्स (४०९ कोटी रुपये) आणि जिंकुशाल इंडस्ट्रीज (११६ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

सबस्क्रिप्शन विंडो

या आयोपीओंसाठी सबस्क्रिप्शन विंडो (नोंदणी प्रक्रिया) टप्प्याटप्प्याने उघणार आहे. अटलांटा इलेक्ट्रिकल्स आणि गणेश कंझ्युमर प्रोडक्ट्स २२ सप्टेंबर रोजी लाँच होतील. त्यानंतर जारो इन्स्टिट्यूट, सोलरवर्ल्ड एनर्जी, आनंद राठी ब्रोकिंग आणि शेषासाई टेक्नॉलॉजीज २३ सप्टेंबर रोजी सुरू होतील आणि २५ सप्टेंबर रोजी बंद होतील. एपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीजची सबस्क्रिप्शन विंडो २४ ते २६ सप्टेंबर खुली असणार आहे, तर जिंकुशाल इंडस्ट्रीजची सबस्क्रिप्शन विंडो २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान खुली होईल.

एसएमई विभागात १४ कंपन्यांची स्पर्धा

आयपीओसाठी लघु आणि मध्यम कंपन्याही (एसएमई) तितक्याच सक्रिय आहेत. एकणू १४ कंपन्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करत आहेत. प्राइम केबल इंडस्ट्रीज आणि सोव्हेक्स एडिबल्स २२-२४ सप्टेंबर दरम्यान त्यांची आयपीओ सब्सक्रिप्शन विंडो खुली करतील. भारतरोहन एअरबोर्न इनोव्हेशन्स, अ‍ॅप्ट्स फार्मा, ट्रू कलर्स, मॅट्रिक्स जिओ सोल्युशन्स, एनएसबी बीपीओ सोल्युशन्स आणि इकोलाइन एक्झिमसह इतर सहा कंपन्या २३-२५ सप्टेंबरदरम्यान बाजारात येणार आहेत.

सिस्टिमॅटिक इंडस्ट्रीज, जस्टो रिअलफिनटेक आणि प्ररुह टेक्नॉलॉजीज २४-२६ ​​सप्टेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुल्या होतील. तर, टेल्ज प्रोजेक्ट्स आणि डीएसएम फ्रेश फूड्सचे सब्सक्रिप्शन अनुक्रमे २५-२९ सप्टेंबर आणि २६-३० सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.

लिस्टिंग नफ्याचे आमिष…

मोठ्या प्रमाणात येत असलेल्या आयपीओ मागचे कारण देताना विश्लेषकांनी म्हटले आहे की, लिस्टिंग नफ्याचे आमिष दाखवून किरकोळ गुंतवणूकदारांना नवीन आयपीओकडे वळवले जात आहे. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकीमुळे बाजारात स्थिरता येत आहे, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात निव्वळ विक्रेते असूनही, या वर्षी आयपीओमध्ये ४१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.