या माणसामध्ये जेवढी लढाऊ वृत्ती आहे, त्याच्या एक शतांशाने जरी ती आपल्यात भिनली तरीसुद्धा ते खूप मोठे बक्षीस राहील. ‘साठे’ उत्तराची कहाणी’ हे त्यांचे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. परंतु आजचा लेख पुस्तक परीक्षणासाठी लिहिलेला नाही. तर बाजारातल्या या माणसाची ओळख झालेल्या दिवसापासून ते आजपावेतो एका प्रश्नाला अजूनही उत्तर मिळालेले नाही. ही ताकद येते कुठून? म्हणूनच म्हणावेसे वाटते, ‘साठे उत्तराची कहाणी’ ही उत्तराची कहाणी नसून अनेक प्रश्न निर्माण करणारी कहाणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यवस्थेशी लढा देणे हे फारच थोड्यांना जमते. लढा देता देता व्यक्ती संपून जाते. पण व्यवस्था बदलत नाही. सुस्त झोपलेल्या एलआयसीला, विकास अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, हलवून सोडण्याची ताकद नीलेश साठे यांनी दाखविली. हे बदल करण्यात काय काय म्हणाल तितक्या अडचणी आल्या. ताकदवान कर्मचारी संघटना नीलेश साठे यांनी सरळ केल्या, परंतु शेवटी कटुता राहिली नाही. ज्यांनी भांडणे केली, त्यांनीच निरोप समारंभ आयोजित केले.

नीलेश साठे यांची सुरुवात बँकेतल्या नोकरीने झाली, परंतु प्रत्येक जण जन्माला येताना कपाळावर ललाट लेख घेऊन जन्माला आलेला असतो. त्यामुळे बँकेची नोकरी सोडून एलआयसीकडे येणे. एलआयसीत नोकरी करत असताना वेगवेगळी छोटी-मोठी गावे, वेगवेगळ्या शाखा, वेगवेगळ्या स्वभावाची माणसे, या सर्वावर साठे आडनाव असताना वचक निर्माण करणे, प्रसंगी नियमांची चाकोरी बाजूला ठेवून चांगल्यासाठी नियम मोडणे हे धाडससुद्धा नीलेश साठे यांनी दाखविले.

ज्याला नेतृत्व करायचे त्यांचे वक्तृत्व चांगले असावे लागते. विद्यार्थी दशेतच नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे साठे यांनी सोने केले. व्यवस्थापन करणाऱ्याच्या हातात खाटिकाच्या हातात असलेला सुरा असावा लागतो. तो सुरा त्यांनी वेळोवेळी वापरला, परंतु त्याचबरोबर ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास’ हे रूपसुद्धा त्यांनी दाखविले. संघर्ष हा नीलेश साठे यांचा जीवन मंत्र आहे. मग तो संघर्ष स्वतःच्या प्रकृतीचा असो किंवा इतरांच्या.

नागपुरात १९५७ ला जन्माला आलेल्या नीलेश साठे यांना ४ वर्षांचे असतानाच वडिलांचा मृत्यू सहन करावा लागला. जिजाबाई होती म्हणून शिवाजी घडला. तसेच नीलेश साठे यांची आई ज्या स्वभावाची, विचारांची, कडक वृत्तीची होती म्हणून नीलेश साठे घडले. गणिताचा प्राध्यापक होण्याची इच्छा असणारा हा माणूस विमा व्यवसाय, विक्री कला, म्युच्युअल फंडस्, विमा नियंत्रक संस्था (आयआरडीएआय – इर्डा) आणि सर्वात शेवटी एनएचएआय या संस्थेचे आर्थिक सल्लागार म्हणून भूमिका निभावत आला. आयुष्यात असा एवढा वेगवेगळा प्रवास करणारा कोणीतरी विरळाच असेल. ज्या शाखेत अनेक आव्हाने आहेत, ज्या शाखेत कोणाचीही जायची तयारी नसायची, तेथेसुद्धा जाण्यासाठी नीलेश साठे सदैव तयार असायचे. नियतीला ते कधीच शरण गेले नाहीत. आणि त्यामुळे अमावास्या दिवस अशुभ आहे म्हणून त्या दिवशी ऑपेरेशन करून घेण्याचे टाळायचे हा विषयही त्यांना शिवला नाही. साठे यांनी सगळी आव्हाने स्वीकारलीत, अमुक एक गोष्ट मला येणार नाही हे वाक्य त्यांच्या शब्दकोशात नाही.

हेही वाचा… माझा पोर्टफोलियो: एलआयसी – लवकरच लाभाचे दिवस दिसावेत !

या गृहस्थाने कोणकोणत्या व्यवस्थेशी संघर्ष करावा. तुम्हीच पाहा. सहसा पोलीस यंत्रणेच्या नादी कोणी लागत नाही, परंतु नीलेश साठे यांनी पोलिसांना वठणीवर आणले. त्यांच्या सहकाऱ्याने या प्रसंगावर दिलेली प्रतिक्रिया मजेशीर आहे. ती म्हणजे – पोलिसांकडून पैसे काढून घेणे फक्त तुम्हालाच जमते. तमाम पब्लिककडून पोलीस हप्ते वसुली करतात, फक्त एलआयसीलाच पोलिसांकडून हप्ते वसूल करता येतात. हे नीलेश साठे यांनी सिद्ध करून दाखविले.

सरकारी पाठिंबा असलेले उद्योजक आणि एलआयसी या दोघांचे नाते वेगळेच आहे, परंतु एका उद्योजकाला साठे यांनी नियम बाजूला ठेवून सुतासारखे सरळ केले. पॅनकार्ड क्लबच्या एका प्रमुख व्यक्तीला एलआयसीच्या नावाचा वापर करून मोठे व्हायचे होते. आणि लोकांना चुना लावून पैसा काढायचा होता. अशा वेळेस एलआयसीचे सहकार्य मिळणार नाही.

मनसुब्सांचा नेमका पूर्वअंदाज लावून, त्याला नाही म्हणून स्पष्टपणे सांगायला फार धाडस लागते. धार्मिक भावना दुखावून चालत नाही, परंतु त्या भावनांचे अति लाड केले तरी ते त्रासदायक ठरते. एलआयसीने शेअर्स विक्री करायचे ठरविले त्या वेळेस फारच थोड्या लोकांना या विक्रीचे महत्त्व समजलेले होते.

नीलेश साठे यांच्याकडून शिकण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी निर्माण केलेले वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मित्रांचा परिवार. हा परिवार त्यांना त्यांच्या संकटात मदतीला धावून येतो. कारण त्यांना हे माहिती असते की, साठे यांनी काहीही केलेले असले तरी ते स्वतःच्या फायद्यासाठी कुठली गोष्ट कधी करणार नाहीत. यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात.

नीलेश साठे यांचा आणखी एक गुण म्हणजे कोणतीही भिडभाड न ठेवता जे त्यांच्या डोक्यात असेल ते बोलून मोकळे व्हायचे. विमा योजना हप्ते भरताना १८ टक्के जीएसटी हा घोर अन्याय आहे. जीएसटी कमी करायलाच हवा असे सांगायला ते घाबरत नाहीत. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेचे नीलेश साठे आता आर्थिक सल्लागार आहेत. अनेक संस्थाशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहेत. आपण समाजाचे देणे लागतो. म्हणून त्यांनी अनेक चांगल्या संस्थांना मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत. सर्वात शेवटी उल्लेख करायचा तो म्हणजे त्यांनी कर्करोगाला पराजित केले आहे. प्रत्येकाने त्यांच्या कामाचा अभ्यास करायला हवा. अशी माणसे बाजारात दुर्मीळ आहेत

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People from market nilesh sathe financial advisor worked at lic struggle is the mantra of life print eco news dvr