मुंबई: आघाडीचे रोखे आगार असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) समभागाने भांडवली बाजारातील पदार्पणाच्या सलग तीन सत्रात ६२.२ टक्क्यांनी वाढ दर्शवली आहे. तर लिस्टिंगनंतर दुसऱ्या दिवशी समभागाने २० टक्के वाढीची झेप घेतली होती.
तीन सत्रातील वाढीमुळे कंपनीच्या प्रवर्तक कंपन्यांना मोठा लाभ झाला आहे. या प्रवर्तकांमध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई), आयडीबीआय बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे
एनएसडीएलच्या समभागाने गेल्या आठवड्यात बुधवारी १० टक्के अधिमूल्यासह बाजारात ८८० रुपयांवर पदार्पण केले होते. गुंतवणूकदारांना आयपीओच्या माध्यमातून ८०० रुपयांना हा समभाग मिळाला होता. मात्र तीन सत्रात एनएसडीएलचा समभाग १३०० रुपयांपुढे पोहोचला आहे.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला सर्वाधिक लाभ झाला आहे. स्टेट बँकेने सरासरी प्रतिसमभाग २ रुपयांनी सुमारे ३ टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. त्या समभागांची किंमत आता ७,८०१.८० कोटी रुपायांवर पोहोचली आहे.
आयडीबीआय बँकेने देखील शानदार परतावा मिळवला आहे. तिने २.२९ कोटी शेअर (१४.९९% हिस्सा) २ रुपये प्रतिसमभागाप्रमाणे ५.९९ कोटी रुपयांना खरेदी केले होते, ज्याचे मूल्य आता ३,८९८.८० कोटी रुपयांपुढे आहे.
सरकारी मालकीच्या स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) ने एक कोटींहून अधिक शेअर (५.१२% हिस्सा) २ रुपये प्रति शेअर या दराने २.०४ कोटी रुपयांना खरेदी केले होते, ज्यांचे मूल्य आता १,३३२.६८ कोटी रुपयांच्या घरात आहे, म्हणजेच १,३३०.६३ कोटी रुपयांचा काल्पनिक नफा (नोशनल प्रॉफिट) आहे.
राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईचा सरासरी अधिग्रहण खर्च प्रति शेअर १२.२८ रुपये इतका जास्त असूनही, एनएसडीएलकडून मोठा परतावा मिळाला आहे. त्यांनी आयपीओच्या माध्यमातून ९ टक्के हिस्सा विकला आहे. एनएसईकडील उर्वरित समभाग ३६.८४ कोटी रुपयांचे आहेत. यामुळे त्या गुंतवणुकीचे रूपांतर ३,९००.९० कोटी रुपयांमध्ये झाले आहे. तर एचडीएफसी बँकेचा समभाग खरेदी खर्च प्रति शेअर १०८.२९ रुपये होता, यातून ६.९५ टक्के हिस्सा मिळवला होता. त्यामुळे बँकेच्या १५०.५४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत वाढ होऊन ती १,६५७.५४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ १,५०७ कोटी रुपयांचा नफा आणि १,१०१.१ टक्के नफा झाला आहे. सरकारी बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाचा देखील एनएसडीलमध्ये २.५६% हिस्सेदारी आहे. प्रतिसमभाग ५.२० रुपयांना खरेदी करून, त्यांची २.६६ कोटी रुपयांची गुंतवणूक आता ६६६.९० कोटी रुपयांची झाली आहे.
६ ऑगस्ट रोजी एनएसडीएलचे शेअर्स ८०० रुपयांच्या आयपीओ इश्यू किमतीपेक्षा १० टक्के अधिमूल्यासह ८८० रुपयांना बाजारात सूचिबद्ध झालेत. तेव्हापासून शेअर दररोज वाढत आहेत. शुक्रवारच्या बंदपर्यंत, शेअर आयपीओ किमतीपेक्षा ६२.५% ने वाढला होता.
विश्लेषकांचे मत काय?
विश्लेषकांच्या मते, एनएसडीएलचे मजबूत मूलभूत तत्वे आणि रोखे आगार अर्थात डिपॉझिटरी सेगमेंटमधील नेतृत्व पाहता गुंतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी शेअर्स धारण करण्याचा विचार करावा. बाजारात पदार्पणापासून तीन सत्रांमध्ये समभागांमध्ये आता जवळपास ६० टक्क्यांहून वाढ झाली आहे. ‘एनएसडीएल’ने आयपीओच्या माध्यमातून ४,०११ कोटींची निधी उभारणी केली आहे. कंपनीच्या आयपीओला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. कंपनीच्या आयपीओसाठी ४१ पट अधिक भरणा झाला होता. कंपनीने आयपीओसाठी ७६०-८०० रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.
आयपीओच्या माध्यमातून नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई), आयडीबीआय बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यासारखे विद्यमान भागधारक एनएसडीएलमधील त्यांची आंशिक हिस्सेदारी ओएफएसच्या माध्यमातून विक्रीला खुली केली. संपूर्ण ‘ओएफएस’ प्रकारचा हा आयपीओ असल्याने, एनएसडीएलला या माध्यमातून उभारला जाणारा कोणताही निधी मिळाला नाही.
कामगिरी कशी?
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, एनएसडीएलचा निव्वळ नफा २४.५७ टक्क्यांनी वाढून ३४३ कोटी रुपये झाला आणि एकूण उत्पन्न १,५३५ कोटी रुपये झाले, जे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत १२.४१ टक्क्यांनी अधिक आहे. छोट्या वैयक्तिक गुंतवणूकदारांवर केंद्रीत सीडीएसएलच्या तुलनेत, एनएसडीएल ही उच्च लाभदायी अशा संस्थात्मक गुंतवणूकदार ग्राहकांवर केंद्रीत संस्था आहे.