US Share Market Crashed: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या व्यापर कराचा त्यांच्या शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला असून, आज अमेरिकन बाजार उघडताच एस अँड पी ५०० निर्देशांकातील अंदाजे १.७ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कर लादण्याच्या घोषणेमुळे आर्थिक मंदीची भीती वाढल्याने अमेरिकेच्या शेअर बाजारात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान बाजारातील या घसरणीचा सर्वाधिक फटका अशा कंपन्यांना बसला आहे, ज्या परदेशी उत्पादनांवर अवलंबून आहेत. अमेरिकेत विक्री होणाऱ्या बहुतेक उपकरणांचे उत्पादन चीनमध्ये करणाऱ्या अ‍ॅपल इंकच्या शेअर्समध्ये ८% घट झाली आहे. तर, व्हिएतनामध्ये उत्पादन होणाऱ्या लुलुलेमॉन अ‍ॅथलेटिका आणि नाईकीच्या शेअर्समध्ये सुमारे १०% घसरण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे २०२२ नंतर पहिल्यांदाच अमेरिकन बाजाराच्या बेंचमार्क निर्देशांकात सर्वात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. न्यू यॉर्कमध्ये सकाळी (गुरूवारी) ९.३५ वाजेपर्यंत, एस अँड पी ५०० निर्देशांकातील कंपन्यांपैकी सुमारे ७०% कंपन्यांनी तोटा सहन करावा लागला, जवळजवळ निम्म्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २% किंवा त्याहून अधिक घसरण झाली आहे.

दरम्यान अमेरिकन बाजारातील नॅस्डॅक कंपोझिटमध्ये आज सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे तर एस अँड पी ५०० मध्ये ३.७ टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अमेरिकन बाजारातील महत्वाचा निर्देशांक डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी ३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्यामध्ये सुमारे ११०० अंकांची घसरण झाली आहे.

चीन आणि इतर आशियाई देशांमध्ये आपली उपकरणे उत्पादीत करणारी आयफोन निर्माता कंपनी अ‍ॅपल २०२० नंतरच्या सर्वात मोठ्या घसरणीकडे वाटचाल करत आहे. कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. याचबरोबर इतर टेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत आहे.

मेटा प्लॅटफॉर्म आणि एनव्हीडिया ६ टक्क्यांहून अधिक घसरले, तर टेस्ला ५ टक्क्यांहून अधिक आणि अमेझॉन ७ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुमारे २ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देशभरातील अनेक देशांवर व्यापार कर लादण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारत आणि चीनसारख्या देशांचाही समावेश आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २६% व्यापार कर भरावा लागणार आहे. तर चीनच्या वस्तूंवर ३४% शुल्क आकारले जाईल.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump tariffs 2 trillion wipeout us stock market aam