Navi Mumbai Airport Charges for Passengers: देशभरात आठ विमानतळांचं व्यवस्थापन पाहणाऱ्या अदाणी उद्योग समूहाकडेच मुंबईजवळच्या नवी मुंबई विमानतळाचंही व्यवस्थापन आहे. या विमानतळावरून लवकरच नियमित प्रवासी विमानांची उड्डाणं सुरू होणार असून विमानतळाचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकसित केला जाणार असल्याचं अदाणी समूहाकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता अदाणी समूहाकडून मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई विमानतळासाठी गुंतवणूक केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनं बिझनेस स्टँडर्डच्या हवाल्याने यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

अदाणी समूहाकडून नवी मुंबई विमानतळासाठी किती गुंतवणूक?

नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्यासाठी याआधी करण्यात आलेल्या गुंतवणुकीप्रमाणेच आता अदाणींकडून नव्याने गुंतवणूक केली जाणार आहे. २०२९-३० पर्यंत म्हणजेच पुढच्या पाच वर्षांत अदाणी समूहाकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तब्बल ५७ हजार ३३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या विमानतळाच्या विकासाशी निगडित पहिल्या तीन टप्प्यांसाठी प्रामुख्याने ही गुंतवणूक वापरली जाणार आहे.

कोणत्या कामांसाठी गुंतवणुकीचा वापर होणार?

नवी मुंबई विमानतळावरून पहिलं प्रवासी विमान उड्डाण झाल्यानंतर लवकरच नियमित उड्डाणं सुरू होण्याची प्रतीक्षा मुंबईसह नवी मुंबईकरांना व पुणेकरांनादेखील आहे. पुण्यापासून मुंबई विमानतळापेक्षा नवी मुंबई विमानतळ जास्त सोयीस्कर असल्यामुळे हे विमानतळ पुणेकरांसाठीही महत्त्वाचं ठरणार आहे. या विमानतळाचा टप्प्याटप्प्याने विकास व विस्तारीकरण केलं जाणार आहे. त्यात सध्या असलेल्या प्रवासी टर्मिनल्ससोबत आणखी दोन नवीन प्रवासी टर्मिनल्सची उभारणी करणे, दुहेरी धावपट्ट्या तयार करणे, कार्गो टर्मिनल्स, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब अशा बाबींच्या उभारणीचं काम नवी मुंबई विमानतळावर हाती घेतलं जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काय होणार?

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यरत झाल्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण काहीसा कमी होऊ शकतो. पण या दोन्ही विमानतळांवरून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं होणार आहेत. त्यामुळे मुंबई व नवी मुंबई, तसेच आसपासच्या नागरिकांसाठी आता विमान प्रवासासाठी दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत.

नवी मुंबई विमानतळावर किती शुल्क आकारलं जाणार?

दरम्यान, बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार, एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी अर्थात AERA नं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाला प्रवाशांकडून शुल्क आकारणीस परवानगी दिली आहे. हे शुल्क प्रवाशांच्या विमान तिकीट दरातच समाविष्ट केलं जाईल. २० जून रोजी ही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या आंतरदेशीय प्रवाशांना ६२० रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२२५ रुपये शुल्क आकारणी केली जाईल. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरदेशीय प्रवाशांना २७० रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ५२५ रुपये शुल्क आकारलं जाईल.