Nikhil Kamath X Post On Bollywood Audience: करोनानंतर प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी बॉलीवूड झगडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी एक टिप्पणी केली आहे. त्यांनी चित्रपट हे स्थानिक बिर्याणीसारखे हृदयाला भिडणारे आणि सगळ्यांना आवडणारे असावेत, असे म्हटले आहे.

एका व्हायरल एक्स पोस्टमध्ये कामत यांनी म्हटले की, “मी १०० पैकी ९९ वेळा मिशेलिन स्टार दर्जाच्या फॅन्सी रेस्टॉरंटपेक्षा चांगली स्थानिक बिर्याणी पसंत करतो” आणि बॉलिवूडनेही याचप्रकारे भावनिक मुळांशी पुन्हा जुळवून घेण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळतील.

कामत यांच्या पोस्टमुळे फिनफ्लो या अकाऊंटवरून शेअर केलेल्या १२ स्लाइड्सच्या रिसर्च थ्रेडला आणखी मोठा प्रतिसाद मिळाला. या थ्रेडमध्ये असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, बॉलिवूडचं पुनरुज्जीवन जागतिक प्रतिष्ठा किंवा झगमगीत निर्मितीमूल्यांवर अवलंबून नसून, भारताच्या हृदयाशी जुळणाऱ्या, मसालेदार आणि प्रेक्षकांना सहज समजणाऱ्या कथा देण्यात आहे.

मल्याळम आणि कन्नड तेजीत

या अभ्यासात बॉलिवूडची सध्याची स्थिती स्पष्टपणे मांडली आहे. या संशोधनातून एक स्पष्ट चित्र समोर आले आहे की, २०२४ मध्ये बॉलिवूडचे प्रेक्षक ८८३ दशलक्ष असण्याचा अंदाज आहे, जो कोविडपूर्वीच्या १ अब्जाहून अधिक प्रेक्षकांपेक्षा अजूनही कमी आहे. हाय-बजेट, स्टार-स्टडेड चित्रपटांना संघर्ष करावा लागला, तर प्रादेशिक चित्रपट विशेषतः मल्याळम आणि कन्नड तेजीत आहेत. गेल्या वर्षी मल्याळम चित्रपटांचे प्रेक्षक १००% पेक्षा जास्त वाढले आहेत.

कमी बजेटच्या बॉलिवूड चित्रपटांची चलती

या आकडेवारीवरून एक ट्रेंड स्पष्ट दिसून येतो, तो म्हणजे २०२४ मध्ये अव्वल १० बॉलीवूड चित्रपटांपैकी ८, ज्यात मुंज्या, भूल भुलैया ३ आणि स्त्री २ या चित्रपटांचा समावेश आहे, ते कमी ते मध्यम बजेटचे मनोरंजक चित्रपट होते. यामध्ये विचित्र लोककथा, अलौकिक थरार आणि निःसंशय नाट्याचा समावेश आहे. समीक्षक कदाचित त्यांना “ब्रेनरॉट” म्हणून नाकारतील, परंतु कामत त्यांच्या यशाला बाजारपेठेतील संकेत म्हणून पाहतात.

मल्याळम आणि कन्नड चित्रपटांनी नक्कल करण्याचा मोह टाळला

हे संशोधन दक्षिण भारतीय चित्रपटांशी विशेषतः मल्याळम आणि कन्नड चित्रपटांशी तीव्र विरोधाभास दर्शवते, जे आपल्या सांस्कृतिक मुळांशी प्रामाणिक राहून सातत्याने यश मिळवत आहेत. कांतारा आणि आरआरआर सारखे हिट चित्रपट पौराणिक कथा आणि स्थानिक गोष्टी लक्षात घेऊन बनवण्यात आले. त्यांनी पाश्चात्य कथाकथनाची नक्कल करण्याचा मोह टाळला. दरम्यान, “जागतिक” दिसण्याच्या बॉलीवूडच्या प्रयत्नांमुळे त्याचा भावनिक गाभा हरवत चालला आहे, असे संशोधनात म्हटले आहे. यामुळेच प्रेक्षक बॉलिवूडपासून दूर गेल्याचे त्यात नमूद केले आहे.