आशीष ठाकूर
बरोबर अकरा महिन्यांपूर्वी, २७ सप्टेंबर २०२४ ला निफ्टी निर्देशांकावर २६,२७७ सार्वकालिक उच्चांक नोंदवला गेला होता. तिथून जी काही घसरण सुरू झाली ती आपण आजतागायत अनुभवत आहोत. या वाटचालीत निफ्टी निर्देशांकावरील मैलाचे दगड असलेले विविध स्तर ज्यात २५,०००, २४,०००, २२,००० चे स्तर त्याने तोडले आणि २१,७४३ च्या नीचांकापर्यंत तो घरंगळत खाली आल्याचेही आपण अनुभवले. या अकरा महिन्याच्या काळात मग त्यात ‘भारत पाकिस्तान युद्ध, इस्रायल इराण युद्ध, रशिया युक्रेन युद्ध’ अथवा आयात कर शुल्क अशा विविध कारणांनी आता चालू असलेल्या मंदीची साथ-संगत केली. जे तांत्रिक विश्लेषणाचे अभ्यासक आहेत त्यांना याची पूर्वकल्पना होती. आपल्या वाचकांसाठी या स्तंभातील ९ सप्टेंबर २०२४ च्या ‘तेजी मंदीच्या चक्राचा ल.सा.वि.’ या शीर्षकाच्या लेखात तसे पूर्वसूचित केले होते. त्याच लेखात ‘इलियट वेव्ह’ संकल्पनेचा आधार घेत, २५,९०० ते २६,३०० च्या उच्चांकाचं भाकीत केलं होत. त्याच बरोबर बाजाराचे तंत्र-मंत्र, प्रचलित सुभाषित, म्हणी याद्वारे देखील जाणते गुंतवणूकदार या उच्चांकाबद्दल अवगत होते. बाजारात प्रचलित असलेल्या विविध म्हणी, सुभाषित यांचा आधार घेत भूतकाळात (काल), वर्तमान (आज) आणि भविष्यकाळात (उद्याचा) निफ्टी निर्देशांकाचा आढावा आज आपण घेणार आहोत.

‘बाजारातील प्रचलित म्हणी अथवा दाखले’

“बाजार नेहमीच नितांत सुंदर अशा तेजीत उच्चांक नोंदवतो आणि दाहक मंदीच्या वातावरणात नीचांक नोंदवतो.” :

गेल्या वर्षीच्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील नितांत सुंदर, मनाला प्रसन्न, उल्हासित करणारे ते दिवस आठवा. अशा दिवसातच बाजार टिपेला अथवा उच्चांकावर असतो, अथवा निर्देशांकावर उच्चांक नोंदवतो. झालंही तसंच त्या वेळेला २८,००० ते ३०,००० चा उच्चांक अगदी हाकेच्या अंतरावर आहे, असं भासवलं जात होतं. पण निफ्टी निर्देशांकाने २६,२७७ उच्चांक नोंदवत घसरणीला सुरुवात केली. निफ्टी निर्देशांकाने २६,२७७ वरून ७ एप्रिल २०२५ ला २१,७४३ चा नीचांक नोंदवला. प्रसन्न, उल्हासित तेजीच्या वातावरणातून ४,५०० अशांच्या दाहक मंदीला गुंतवणूकदारांना सामोरे जावे लागले. निसर्गचक्राप्रमाणे सूर्योदयानंतर सूर्यास्त, भरतीनंतर ओहोटी, तद्वत मंदीनंतर तेजी येतेच. मार्चअखेर ते एप्रिलच्या पूर्वार्धात मंदीची दाहकता ही… आता सर्व काही संपले, निफ्टी निर्देशांक १८,००० पर्यंत कोसळू शकतो… असे सारे धास्तावले होते. सर्व जण चिंताक्रांत, हवालदिल झालेले. अशा परिस्थितीत ७ एप्रिल २०२५ ला निफ्टी निर्देशांकाने २१,७४३ चा नीचांक नोंदवत, पुढे ३० जूनला २५,६६९ उच्चांकही गाठला. अल्पावधीत जवळपास ३,९०० अंशांची सुधारणा झाली.

तात्पर्य: गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील उल्हासित वातावरणातील उच्चांकापासून ४,५०० अंशांची मंदी. या मंदीची भरपाई ही तेजीत नव्हे, तर एप्रिलच्या दाहक मंदीतून निफ्टी निर्देशांकावर ३,९०० अंशांची सुधारणा अशी झाली.

‘डाउ संकल्पना’

निफ्टी निर्देशांकाने २६,२७७ उच्चांक नोंदवत २७ सप्टेंबर २०२४ पासून घसरणीला सुरुवात केली. २७ सप्टेंबर २०२४ पासून ऑगस्ट २०२५, अशा ११ महिन्यांत आपण निफ्टीला लाल रंगाच्या विविध पोशाखात, पेहेरावात पाहिले. कधी लाल रंगाच्या गडद, तर कधी धूसर लाल छटांच्या नक्षीदार कलाकृतीत आपण निफ्टीला बघत आलो आहोत. आता ‘डाउ संकल्पने’प्रमाणे मंदीचे एक वर्ष पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे. पुढील लेखात निफ्टी निर्देशांकाचा संभाव्य नीचांक आणि येणाऱ्या दोन वर्षातील निफ्टी निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक याचा विस्तृत आढावा घेऊ.

तूर्त या आठवडयात निफ्टी निर्देशांकावर २४,७०० ते २४,८५० हा भरभक्कम अडथळा आहे. हा अडथळा पार केल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २५,००० ते २५,१५० असे असेल. निफ्टी निर्देशांक २४,७०० ते २४,८५०चा स्तर पार करण्यास अपयशी ठरल्यास, त्याचे खालचे लक्ष्य २४,२०० ते २३,८०० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २३,५०० ते २३,३०० असे असेल.

– आशीष ठाकूर, लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाँप लाँस’ आणी इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.