Pune Engineer Requests IT Companies To Allow Work From Home: पुण्यातील एका इंजिनिअरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने सांगितले की, पावसाळ्यात कर्मचाऱ्यांसाठी ऑफिसमधून काम करणे हे केवळ व्यावहारिकच नाही, तर आर्थिक डोकेदुखीही आहे. लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये या इंजिनिअरने पुण्यातील आयटी कंपन्यांना कळकळीची विनंती केली आहे.

या इंजिनिअरने कंपन्यांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात बहुतेकदा रस्त्यांवर पाणी साचून राहते, तसेच कॅब आणि ऑटो रद्द होतात. अशा वेळी जर कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नसेल, तर त्यांना प्रवास भत्ता द्यावा.

पावसाळ्यात ऑफिसमधूनच काम करण्याचे आदेश तरुण कर्मचाऱ्यांच्या खिशाला कशी कात्री लावतात, हे देखील या इंजिनिअरने पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

प्रत्येकजण महिन्याला लाख रुपये कमवत नाही

हा पुण्याचा इंजिनिअर लिंक्डइन पोस्टमध्ये म्हणाला की, “प्रत्येकजण महिन्याला १ लाखांहून अधिक कमवत नाही. मुंबई, बंगळुरू इत्यादी शहरांमध्ये काही लोक २७,००० रुपये कमवत जगण्याचा प्रयत्न करत आहेत. आता कल्पना करा की बाहेर पाऊस पडत आहे, रिक्षा आणि कॅब रद्द होत आहेत, लोकल ट्रेन गर्दीने भरल्या आहेत, रस्ते पाण्याखाली आहेत. अशा परिस्थितीत हा कर्मचारी फक्त ऑफिसला पोहोचण्यासाठी दररोज उबरवर ५०० रुपयांहून अधिक पैसे खर्च करत आहे. एका महिन्यात यावर १०,००० रुपयांहून अधिक खर्च झाला आहे”, असे या इंजिनिअरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

घरून करता येणारे काम…

पोस्टमध्ये असेही नमूद केले आहे की, तरुण कर्मचारी त्यांचा जवळपास अर्धा पगार प्रवासावर खर्च करतात आणि घरून करता येणारे काम ऑफिसमध्ये जाऊन करतात.

“जवळजवळ अर्धा पगार फक्त प्रवासासाठी. आणि कशासाठी? तोच लॅपटॉप उघडण्यासाठी… त्याच बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी… तेच काम जे घरून करता आले असते ते करण्यासाठी. हे कसे योग्य आहे? प्रत्येकाकडे गाडी नसते. प्रत्येकजण ऑफिसपासून २ किमी अंतरावर राहत नाही. प्रत्येकजण नेहमीच वेळेचं नियोजन करू शकत नाही”, असे या इंजिनिअरने पोस्टमध्ये म्हटले आहे.

वर्क फ्रॉम होम शक्य नसेल तर…

काही कर्मचारी निराश न होता महिना अखेरपर्यंत खर्च भागवण्यासाठी कसा प्रयत्न करत आहेत हे देखील त्या इंजिनिअरने सांगितले आहे. “जर वर्क फ्रॉम होम शक्य नसेल, तर किमान फक्त येण्याच्या खर्चात मदत करा. जर तुम्ही त्यांच्याशी कुटुंबासारखे वागणार नसाल तर कृपया तुमच्या कंपनीतील प्रत्येकाला “फॅमिली” असे उल्लेख असणारे ईमेल करणे थांबवा”, असे या इंजिनिअरने पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.