महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या देशातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन केले. एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाचे फडणवीस यांनी स्वागत करत म्हटले की, ते “योग्य शहरात आणि योग्य राज्यात पोहोचले आहेत.”
मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये असलेल्या ४,००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या टेस्ला शोरूममध्ये मॉडेल वाय कारची विक्री सुरू होणार आहे. टेस्ला भारतात मॉडेल वाय च्या रियर-व्हील ड्राइव्ह आणि लाँग-रेंज रियर-व्हील ड्राइव्ह या दोन व्हेरिएंट्स लाँच करत आहे. प्राथमिक रियर-व्हील ड्राइव्ह मॉडेलची किंमत ५९.८९ लाख रुपये आहे, तर लाँग-रेंज व्हेरिएंटची किंमत ६७.८९ लाख रुपये आहे.
भारतात अतिरिक्त किंमत का?
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, अतिरिक्त खर्चाचा विचार करता यामध्ये १८% जीएसटीसह ५०,००० रुपयांचे प्रशासन व सेवा शुल्क समाविष्ट आहे. त्यानुसार रियर-व्हील ड्राइव्ह मॉडेलची ऑन-रोड किंमत ६१.०७ लाख रुपये आणि लाँग-रेंज व्हेरिएंटची किंमत ६९.१५ लाख रुपये आहे.
खरेदीदार मॉडेल वाय कारला विविध पर्यायी वैशिष्ट्यांसह आणि अॅड-ऑन्ससह पर्सनलाइज करू शकतात, ज्यामुळे अंतिम किंमत वाढू शकते. असाच एक पर्याय म्हणजे टेस्लाची फुल सेल्फ-ड्रायव्हिंग क्षमता, जी ६ लाख रुपयांच्या अतिरिक्त किमतीत उपलब्ध आहे.
अमेरिकेपेक्षा मुंबईतील किंमत ३० लाखांनी जास्त
आंतरराष्ट्रीय स्तरावर, टेस्लाच्या मॉडेल वाय कारची किंमत अमेरिकेत अंदाजे ३८.६३ लाख रुपये, चीनमध्ये ३१.५७ लाख रुपये आणि जर्मनीमध्ये ४६.०९ लाख रुपयांपासून सुरू होते. या बाजारपेठांच्या तुलनेत, भारतातील किंमत बरीच जास्त आहे. यामागे आयात शुल्क आणि शिपिंग शुल्क ही प्रमुख कारणे आहेत.
बॅटरी पर्याय आणि रेंज
भारतात, मॉडेल वायच्या रियर-व्हील ड्राइव्ह कारमध्ये ६० केव्ही आणि ७५ केव्ही बॅटरी पॅक असे दोन पर्याय असतील. याची रेंज ५०० किमी पर्यंत असल्याचा टेस्लाचा दावा आहे. तर लाँग-रेंज व्हेरिएंट एका चार्जमध्ये सुमारे ६२२ किमी पर्यंत धावू शकते, असे म्हटले जाते.
मॉडेल वाय ची वैशिष्ट्ये
याचबरोबर ग्राहकांना सात बाह्य रंग आणि दोन इंटीरियर थीममधून निवड करता येईल. या कारमध्ये पुढे १५.४ इंचांची टचस्क्रीन, मागील प्रवाशांसाठी ८ इंचांची स्क्रीन, पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, स्टीअरिंग व्हील, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, १९ इंचांचे क्रॉसफ्लो व्हील्स, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि ऑटोमॅटिक रिअर लिफ्टगेट यांसारखी वैशिष्ट्ये असतील.