Jeffrey Sachs Said Trump Will Not Succeed Against India: भारत-अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी भारताला उदयोन्मुख अर्थव्यवस्थांशी संबंध मजबूत करण्याचे आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) सारख्या प्रादेशिक व्यापार गटात सहभागी होण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. सॅक्स म्हणाले की ट्रम्प प्रशासनाचे टॅरिफ भारतावर दबाव आणण्यात यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे.
“ते (ट्रम्प) भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. यामुळे फक्त ब्रिक्स देशांना एकत्र येण्यास मदत होत आहे. भारताला रशिया, चीन, ब्राझील आणि जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या जवळ येण्यास मदत होत आहे. ट्रम्प अमेरिकेला जागतिक अर्थव्यवस्थेपासून वेगळे करत आहेत कारण या टॅरिफमुळे अमेरिकन उद्योग जागतिक स्पर्धेतून बाहेर पडत आहेत”, असे सॅक्स यांनी इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
“कदाचित ते घरगुती बाजारपेठेसाठी अधिक उत्पादन करतील, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर ते कमी स्पर्धात्मक असतील. मला वाटते की ट्रम्प स्वतःच्या पायावर गोळी झाडत आहेत असे मी म्हणणार नाही, ते अमेरिकेच्या पायावर गोळी झाडत आहेत, असे मी म्हणेन. ते अमेरिकेला कमी समृद्ध आणि कमी स्पर्धात्मक बनवत आहेत.”
अमेरिकेला असे वाटले की…
अमेरिका भारतावर दबाव आणू शकतो, हा युक्तीवाद सॅक्स यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, “त्यांना (ट्रम्प टीमला) वाटले की ते भारतावर दबाव आणू शकतात, जे मूर्खपणाचे आहे. अमेरिकेला असे वाटले की ते १.५ अब्ज लोकसंख्येच्या एका महान शक्तीवर दबाव आणू शकतात. पण मी भारतातील अनेक मित्रांना सांगितल्याप्रमाणे, अमेरिकेवर विश्वास ठेवू नका. अमेरिका भारताशी विशेष संबंध ठेवू इच्छित नाही. अमेरिका अदूरदर्शी आहे, कमकुवत नेतृत्वाखाली आहे, अस्थिर आहे.”
भारत आणि चीनने…
यावेळी त्यांनी भारताच्या आर्थिक धोरणासाठी मार्गदर्शनही केले, ज्यामध्ये विविधता आणि मजबूत प्रादेशिक भागीदारी यावर भर देण्यात आला. “भारताला उर्वरित जगात बाजारपेठ विकसित करण्याची आवश्यकता आहे. माझा स्वतःचा दीर्घकाळचा सल्ला आहे ज्यामुळे कधीकधी भारतातील अनेकांच्या भुवया उंचावतात, तो म्हणजे भारत आणि चीनने प्रलंबित प्रश्न सोडवावेत. सीमा वाद मिटवावेत अशी माझी इच्छा आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सहावा स्थायी सदस्य म्हणून चीनने भारताला पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे कारण जगाला त्याचा खरोखर फायदा होईल. आणि भारत आणि चीनने एकमेकांशी अधिक व्यापार करावा आणि परस्पर गुंतवणूक करावी अशी माझी इच्छा आहे.”