महेश शिरापूरकर
विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण केंद्रीय (संघ) लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात येणाऱ्या सनदी सेवा परीक्षेचे विविध टप्पे, या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, परीक्षेची तयारी कशी करावी याबाबतची विस्तृत चर्चा करणार आहोत.
UPSC द्वारे अनेक परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यातील नागरी सेवा परीक्षा (Civil Services Examination – CSE) ही एक महत्त्वाची परीक्षा होय. भारतीय प्रशासकीय, परराष्ट्रीय, पोलीस, महसूल सेवा याशिवाय इतर सुमारे १५ पदांसाठी अखिल भारतीय पातळीवर या परीक्षेचे दरवर्षी आयोजन केले जाते. नागरी सेवा परीक्षा अखिल भारतीय पातळीवरील असल्यामुळे स्पर्धेची तीव्रता स्वाभाविकच वाढते. शिवाय आयोगाद्वारे आपल्या जाहिरातीत नमूद केलेल्या पदांएवढेच विद्यार्थी अंतिमत: या परीक्षेद्वारा निवडले जातात. म्हणजेच तीव्र स्पर्धात्मकतेमुळे ही परीक्षा आव्हानात्मक मानली जाते. त्याखेरीज या परीक्षेचे पूर्व, मुख्य, मुलाखत असे तीन भिन्न स्वरूपाचे टप्पे; व्यापक अभ्यासक्रम; विविध विषय; अद्ययावत ज्ञान व माहितीची असलेली गरज आणि सतत बदलत जाणारे प्रश्नांचे स्वरूप यामुळे या परीक्षेचे स्वरूप अधिकच आव्हानात्मक बनते. त्यामुळे अशा कमालीच्या स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे गरजेचे ठरते.
प्रशासकीय अथवा सनदी सेवकांची भरती करण्यासाठी UPSC द्वारे जी परीक्षा आयोजित केली जाते त्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे ही प्राथमिकदृष्टय़ा महत्त्वाची बाब ठरते. या परीक्षेला स्पर्धात्मक परीक्षा संबोधले जाते आणि ही परीक्षा अनेक अर्थाने इतर परीक्षांपेक्षा वेगळी आहे. एकतर आयोगाद्वारे जाहीर केलेल्या पदसंख्येइतकेच विद्यार्थी अंतिम यादीत पात्र ठरवले जातात. तथापि, परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंमध्ये असते. परिणामी, इतरांच्या तुलनेत प्रभावी पद्धतीने अभ्यास करून यशस्वी ठरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते.
UPSC परीक्षेचे पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे केवळ तीन टप्पेच आहेत असे नाही तर हे टप्पे परस्परांहून वेगळे आहेत. पूर्वपरीक्षा हा प्रारंभीचा टप्पा वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धती असणारा आहे. मुख्य परीक्षा हा दुसरा टप्पा मात्र पूर्णत: लेखी स्वरूपाचा आहे. त्यात निर्धारित गुण आणि शब्दमर्यादेत विचारलेल्या प्रश्नाची लेखी उत्तरे लिहायची असतात. शेवटी येणारा टप्पा म्हणजे मुलाखत होय. यात उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचीच जणू चाचणी घेतली जाते. उपरोक्त तिन्ही टप्पे भिन्न असल्याने त्या त्या टप्प्यासाठी लागणारी गुणवैशिष्टय़े आणि क्षमता भिन्न ठरतात. परिणामी त्यासाठी विशिष्ट स्वरूपाची अभ्यासपद्धती अवलंबणे गरजेचे ठरते. या प्रत्येक टप्प्याचे स्वरूप जितक्या लवकर आणि सखोलपणे लक्षात येईल त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अभ्यासाची गुणवत्ता वृिद्धगत करता येईल. त्या दृष्टीने विचार करता आयोगाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम, मागील ९-१० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत साहाय्यभूत ठरते. या संदर्भात युनिक प्रकाशनने निबंध आणि सामान्य अध्ययन या विषयाच्या २०१३ ते २०२२ सालातील प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण करून त्या मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून दिल्या आहेत.
सनदी सेवा परीक्षेचे स्वरूप लक्षात घेतल्यास पुढे येणारी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे चालू घडामोडींचा सविस्तर अभ्यास. पूर्वपरीक्षेपासून मुलाखतीपर्यंतच्या सर्वच टप्प्यात निरनिराळय़ा प्रकारच्या चालू घडामोडींवरील प्रश्नांची तयारी करणे अनिवार्य ठरते. त्यासाठी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन, काही नियतकालिकांचा आणि निवडक वेबसाइट्सचा आधार घ्यावा लागतो. चालू घडामोडींची तयारी करताना माहिती, तथ्ये, आकडेवारी या बाबी महत्त्वाच्या आहेतच, परंतु या घटनांचे विश्लेषणात्मक आयामदेखील महत्त्वाचे आहेत.
सनदी सेवा परीक्षेचे आणखी एक मध्यवर्ती वैशिष्टय़ म्हणजे तिचे गतिशील स्वरूप होय. आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर दरवर्षी वेगवेगळय़ा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. थोडक्यात, त्याच अभ्यासक्रमावर विभिन्न प्रकारचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेची कसोटी पाहणारे हे वैशिष्टय़ आहे. म्हणून अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच उमेदवारांना आपल्या विचारशक्तीचा विशेषत: चिकित्सक विचारक्षमतेचा विकास होईल याकडे लक्ष द्यावे लागेल. थोडक्यात, सनदी सेवा परीक्षेतील तीन टप्पे, त्यातील विषयांचा अभ्यासक्रम आणि आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका या आधारे नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप योग्य रीतीने समजून घेता येईल. पुढील लेखात आपण या परीक्षेचे स्वरूप अधिक सखोलपणे जाणून घेऊ या.