निलेश देशपांडे
आपण आतापर्यंत मराठी अनिवार्य पेपर बाबत मागील तीन लेखांमध्ये अनुक्रमे पेपरचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नांचा स्तर, प्रश्नांचा कल, प्रवाह, कौशल्ये इत्यादी बाबींची सविस्तर चर्चा केली. लेख क्र. ३ मध्ये आपण २०२३ चा अनिवार्य मराठी पेपर व त्याचे स्वरूप या बाबीवर चर्चा करण्यास सुरुवात केली. २०२३ च्या अनिवार्य मराठीच्या पेपरमध्ये विचारलेले निबंध व या निबंधासाठी कशी तयारी करावी? त्याची आपण सविस्तर चर्चा केली. निबंधाचा प्रश्न क्र. १ आपण सविस्तर अभ्यासला आहे.
प्रस्तुत लेखात आपण पुढील प्रश्न कोणते असतात व ते कशाप्रकारे विचारले जातात याची सखोल चर्चा करणार आहोत.
प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपणास उतारा दिला जातो. पुढील उतारा वाचा व उताऱ्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा. अशाप्रकारे आपणास प्रश्न दिला जातो. मित्रांनो, उतारा खूप मोठ्या प्रमाणात अवघड वगैरे अजिबात नसतो. मात्र उतारा आपणास सोडवायचा नाही. संपूर्ण उतारा समजून घेऊन त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहिणे अभिप्रेत आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरास १२ गुण याप्रमाणे अनुक्रमे ५ प्रश्नांचे ६० गुण यासाठी असणार आहेत. उतारा वाचत असताना पूर्णपणे स्वत:ला एकाग्र करा. आपणास उतारा केवळ वाचायचा नाही. संपूर्ण उतारा आपणास समजून घ्यायचा आहे. पूर्ण उतारा समजल्याशिवाय तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहू शकणार नाही. सर्वांत महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की तुम्ही उताऱ्याची उत्तरे लिहिताना स्वत:च्या मनाने कोणत्याही प्रकारचा आशय मांडू नये. तसे झाल्यास नकारात्मकता निर्माण होऊन त्याचा गुणांवर परिणाम होतो. एकही प्रश्न समजून न घेता सोडवू नका.
हेही वाचा >>> पदवीधरांना नोकरीची मोठी संधी! केंद्रीय गुप्तचर विभागात ‘या’ पदासाठी भरती सुरू
२०२३ च्या पेपरमध्ये शेतकऱ्यांवर उतारा दिलेला आहे. समजून घेण्यासाठी हा लेख वाचताना आपण २०२३ चा पेपर जर आपल्याकडे डाउनलोड केला तर जास्त फायदा होईल. या उताऱ्यामध्ये श्रमिक कोण होते? सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय? असे प्रश्न विचारले आहेत. एकही प्रश्न उताऱ्याच्या बाहेरचा नाही. आपण व्यवस्थित समजून घेऊन लेखन केल्यास कमी वेळेत आपण संपूर्ण प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतो.
प्रश्न क्रमांक ३ हा एक तृतीयांश सारांश यासाठी असून या प्रश्नास एकूण ६० गुण आहेत. खालील उताऱ्याचा अंदाजे एक-तृतीयांश शब्दांत सारांश लिहा. उताऱ्याला शीर्षक देऊ नये. सारांश मराठीत लिहा. अशाप्रकारे प्रश्न देऊन आपणास सारांश लिहिण्यासाठी उतारा दिला जातो. मित्रांनो पूर्ण उतारा व्यवस्थितपणे वाचून आपण तो समजून घेणे खूप आवश्यक असते. उताऱ्याचे पूर्ण आकलन झाल्याशिवाय सारांश तयार करू नये. सारांश तयार करताना संपूर्ण उताऱ्याचे सार त्यामध्ये येईल याची पूर्ण काळजी घ्यावी. २०२३ च्या पेपरमध्ये ४१९ शब्दांचा उतारा आपणास दिलेला होता व त्याचे आपणास सारांशलेखन करावयाचे होते.
प्रश्न क्रमांक चार हा इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करणे यासाठी असतो. यासाठी एकूण २० गुण असून उतारा मराठी भाषेमध्ये दिलेला असून आपणास उतारा इंग्रजीत भाषांतर करावयाचा असतो. प्रश्न देतानाच आपणास पुढील उताऱ्याचे इंग्रजीत भाषांतर करा. असा प्रश्न दिला जातो. २०२३ चा पेपर पाहिला तरी लगेच लक्षात येईल की आपण सराव केल्यास व आपला शब्दसंग्रह वाढवल्यास आपणास चांगला फायदा होतो. उदाहरणदाखल आपण मागील प्रश्नपत्रिकेतील एक ओळ पाहू. उदा. वेळ अनमोल आहे. वस्तुत: वेळ ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे जी सीमित आहे.
आता याचे इंग्रजीत काय भाषांतर होईल बघुयात. भाषांतर – Time is precious. In Fact, time is the only thing in the world that is limited.
वरील भाषांतर पाहून नक्कीच तुमचा आत्मविश्वास दुणावला असेल यात शंका नाही. प्रश्न क्रमांक पाच हा प्रश्न क्रमांक पाच प्रमाणेच भाषांतराचा असतो. पाचव्या प्रश्नात इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करावयाचे असते. यासाठीदेखील २० गुण असतात. याचेदेखील आपण उदाहरण पाहू. उदाहरणार्थ – We cannot deny the importance of games in life as games make a person sound in body and mind. भाषांतर – खेळांचे जीवनातील महत्त्व आपण नाकारू शकत नाही, कारण खेळच आपल्या शरीर व मनाला आवाज देतात.
दोन्ही भाषांतरे पाहता आपणास तयारीच्या प्रथम टप्प्यापासून शब्दसंग्रह व भाषेचे महत्त्व उमगते. शेवटचा प्रश्न क्रमांक ६ यामध्ये आपणास एकूण ४० गुण असून ते विविध उपप्रश्नांमध्ये विभागले गेले आहेत. प्रथमत: १० गुणांसाठी वाक्प्रचार/ म्हणींचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, असा प्रश्न आहे. अति तिथे माती, साखर पेरणे यासारखे म्हणी/ वाक्प्रचार असून आपणास सहज उत्तर लिहिता येते. त्याचबरोबर कल्पना विस्तार १० गुणांना असून आपण त्या दिलेल्या विषयावर कल्पना विस्तार करणे अभिप्रेत आहे. त्यानंतर १० गुणांसाठी २० वाक्यात संवाद लिहा असा प्रश्न असून आपण संवाद लेखन करावयाचे आहे. अंतिमत: समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द अनुक्रमे ५ गुणांना असून प्रश्न क्र. ६ हा गुण मिळवण्यासाठी एकदम सोपा घटक आहे. याप्रकारे २०२३ चा अनिवार्य मराठी हा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मुख्य परीक्षेचा पेपर होता.