डॉ. श्रीराम गीत
माझी मुलगी बारावी कला शाखेत आहे. तिचे आयटी, लॉजिक, सोशिओलॉजी, इकोनॉमिक्स विषय आहेत. तिला आयटी व लॉजिक या विषयात रूची आहे. परंतु पुढे या विषयातील पर्याय व स्कोप याबद्दल आम्हाला फारशी माहिती नसल्यामुळे सध्या तरी तिचा, पुढे बीबीए करून तीन वर्षांचा लॉ करायचा मानस आहे. तरी असे केल्यावर पुढे स्कोप काय आहे? या बद्दल मार्गदर्शन करावे. तसेच आयटी व लॉजीक विषयातील पर्याय असतील तर नमूद करावे. दहावीची परीक्षा रद्द झाली होती. माहितीसाठी तिचे अकरावीचे मार्क ८३ टक्के होते. तसेच, ‘लिबरल आर्टस’ कोर्स व त्या विषयाचा पुढील स्कोप या बद्दल सविस्तर माहिती द्यावी. मुलीला करिअर निवड करण्यापूर्वी उपयुक्त व उपलब्ध असलेले व जास्तीतजास्त पर्याय माहीत असावे हाच उद्देश आहे. –अल्पना एम.
आपल्या प्रश्नाचे ओळीने उत्तर देत आहे. आयटी हा विषय नसून कॉम्प्युटरची तोंड ओळख एवढाच असतो. लॉजिक हा विषय तत्त्वज्ञान विषयाकडे घेऊन जाण्याची सुरुवात असते. फारच मोजक्या संस्थांमध्ये बीए करता लॉजिक हा विषय असतो. तेव्हा या दोनातून पुढे काय हा प्रश्न इथेच संपतो. आपल्या मुलीने बीबीए करायचे ठरवले असले तर त्यानंतर लॉचा निर्णय आत्ता घेण्याची गरज नाही. बीबीए नंतरचा स्वाभाविक रस्ता एमबीएकडे जातो, लॉ कडे नाही. बीबीए झालेल्या एखाद्या व्यक्तीला भेटणे व त्यांच्याकडून माहिती घेणे हे करायला आपल्या हातात अजून दहा महिने आहेत. ‘बीबीए’साठी उत्तमसंस्था मध्ये जायचे असेल तर तिथे प्रवेश परीक्षा असते. त्याची माहिती व तयारी करणे हा दुसरा महत्त्वाचा भाग राहील. बीबीएमध्ये चार प्रकारची स्पेशलायझेशन्स असतात त्यांचीही माहिती त्या व्यक्तीकडून किंवा तेथील शिक्षकांकडून घेणे गरजेचे राहील. जागे अभावी ती माहिती येथे देणे शक्य नाही. कायदा व बीबीए असा एकत्रित पाच वर्षांचा अभ्यासक्रम काही संस्थांमध्ये उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी लॉची सीईटी द्यावी लागेल. सध्या आपल्या मुलीने लॉ सीइटी व बीबीए सीईटी या दोन्हीच्या बद्दलची माहिती गोळा करून त्याची प्राथमिक तयारी जानेवारीपासून करणे हे जरूर करावे. तिचे मार्क उत्तम आहेत. ते टिकवणे ही बारावीमधील जबाबदारी असेल. लिबरल आर्ट्स या चार वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक विषय असतात. त्यासाठी सुद्धा प्रवेश परीक्षा लागेल. तो तसा खर्चिक अभ्यास क्रमआहे एवढेच सांगतो. नंतर एमबीएचा एक रस्ता जातो. वाचनाची व सखोल अभ्यासाची स्वत:ची आवड असणाऱ्यांना कायदा व लिबरल आर्ट्स हे अवघड वाटत नाहीत. नाहीतर तिथे जाऊन फसगत होण्याची शक्यता भरपूर.
मला दहावीला ६२ बारावीला ५२ आणि बीएससी मायक्रोबायोलॉजिला सीजीपी ६.०१ आहेत. जून २०२२ ला पास झालो आहे. मी सध्या एका खासगी ट्रस्ट च्या शाळेत लॅब आसिस्टंट पदावर नोकरी करत आहे.आणि सरळसेवे मधील पोलीस भरती परीक्षाची तयारी करत आहे. पुढील शिक्षणाची संधी कोणती? आणि पुढील नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करावे? – अभिजीत शिंदे, कल्याण</strong>
बीएससी मायक्रोबायोलॉजी झालेला पदवीधर सरळ सेवा पोलीस भरती करता प्रयत्न करतो आहे. ते फक्त पगारा करता का अन्य काही कारणा करता? यावर तुम्हालाच विचार करायचा आहे. आपण शास्त्र पदवीधर असून योग्य संधी व योग्य पगाराच्या अभावी हा रस्ता धरत आहात असे मला वाटते. डायग्नोस्टिक लॅब मध्ये नोकरी करण्यासाठी लागणारी कौशल्ये आपणही मिळू शकता. डीएमएलटी चा अभ्यासक्रम त्यासाठी उपलब्ध आहे. किंवा बी. एड. करून शास्त्र विषयातील क्लासेस वा शाळा येथे सायन्स टीचर म्हणून काम करणे ही शक्य आहे. एखाद्या रस्त्याला भरकटणे ऐवजी यावर नीट विचार करावा.
मी बीकॉम २०२३ मध्ये ८४ टक्क्यांनी पूर्ण केले आहे. मला एमबीए सीईटीला ८९.१५ परसेंटाइल मिळाले आहेत. स्पर्धा परिक्षेची तयारी सुद्धा करायची आहे. एमबीए कोणत्या विषयात करावे याबद्दल ही मार्गदर्शन करावे. – दीपाली जाधव
एमबीएला स्पेशलायजेशनचा निर्णय पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर कॉलेजातील प्राध्यापकांच्या सहमतीने घ्यावा. कॉमर्स पदवीधर असल्यामुळे फायनान्स किंवा मार्केटिंग मध्ये स्पेशलायझेशन करणे सोयीचे जाते. त्याचा विचार आता नको. आपल्या पर्सेटाइल मार्काप्रमाणे कॉलेजची निवड महत्त्वाची राहील. जिथे कॅम्पस इंटरव्यू होतात अशा कॉलेजला आपण प्राधान्य द्यावे. एमबीए चा अभ्यास सोपा नाही. स्पर्धा परीक्षा हा विषय आता पूर्णपणे बाजूला ठेवणे गरजेचे आहे. प्रथम एमबीए नंतर त्यातून मिळणारी नोकरी किमान तीन वर्षे व त्यानंतर वाटल्यास स्पर्धा परीक्षा असा तुमच्यासाठी चा रस्ता राहील. जिथे प्रवेश घ्यावा वाटतो अशा एमबीए संस्थेमध्ये पास झालेल्या एखाद्या विद्यार्थिनीला भेटावे. नीट माहिती घ्यावी ती जास्त उपयोगी पडेल.