प्रथमेश आडविलकर
अमेरिकेत शिक्षण घेताना अर्धवेळ नोकरी ही केवळ आर्थिक मदत करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवते. वेळेचे व्यवस्थापन, जबाबदारीची जाणीव आणि संवादकौशल्ये विकसित होतात आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम होते.
अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाबरोबरच अर्धवेळ नोकरी करणे ही एक महत्त्वाची गरज असते. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळतेच, पण त्याचबरोबर वेळेचे व्यवस्थापन, जबाबदारीची जाणीव आणि संवादकौशल्ये विकसित होतात.
अमेरिकेच्या F1 व्हिसावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काही विशिष्ट नियमांनुसार नोकरी करण्याची परवानगी दिलेली असते. पहिल्या वर्षात विद्यार्थी फक्त विद्यापीठाच्या आवारामध्येच नोकरी करू शकतात. यात ग्रंथालय, कॅफेटेरिया, स्टोअर, संशोधन सहाय्यक किंवा प्रशासनातील कार्यालयीन कामे यांसारख्या कामांचा समावेश होतो. या नोकरीत विद्यार्थी आठवड्याला जास्तीत जास्त वीस तास काम करू शकतात. पहिल्या वर्षानंतर, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या बाहेरही काम करण्याची संधी मिळू शकते, पण त्यासाठी अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाची ( USCIS) परवानगी आवश्यक असते.
‘सीपीटी’
अभ्यासाबरोबरच व्यावसायिक अनुभव मिळावा यासाठी अमेरिकेत ‘सीपीटी’- Curricular Practical Training ( CPT) ही संधी दिली जाते. सीपीटी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असतो. इंटर्नशिप, को-ऑप प्रोग्रॅम्स किंवा प्रोजेक्ट्स या माध्यमातून विद्यार्थी प्रत्यक्ष उद्याोग क्षेत्राशी जोडले जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये किमान एक शैक्षणिक वर्ष पूर्ण केलेले असणे आवश्यक असते. महत्त्वाचे म्हणजे सीपीटी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी संबंधित क्षेत्रातच करता येते. सीपीटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत कामाचा अनुभव, व्यावसायिक आणि करिअरच्या संधींचा मार्ग मोकळा होतो.
‘ओपीटी’
सीपीटीसारखाच अजून एक प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे ‘ओपीटी’. अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील करिअरच्या दृष्टीने एक उत्तम संधी मिळते ती म्हणजे ओपीटी- Optional Practical Training. ओपीटीअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांची पदवी पूर्ण झाल्यानंतर किंवा विद्यापीठामध्ये शिकत असतानाही त्यांच्या क्षेत्राशी संबंधित नोकरी करण्याची परवानगी दिली जाते. ओपीटी एकूण १२ महिन्यांसाठी असतो. जर विद्यार्थी विज्ञान किंवा तंत्रज्ञान शाखेतील शिक्षण घेत असतील, तर त्यांना ओपीटीची २४ महिन्यांची अतिरिक्त मुदत मिळू शकते. म्हणजे शिक्षणानंतर विद्यार्थ्याला एकूण ३६ महिने अमेरिकेत काम करण्याची संधी मिळते. ओपीटीमुळे विद्यार्थ्यांना अमेरिकेतील कार्य-संस्कृतीचा अनुभव घेता येतो आणि पुढे H-1 B किंवा इतर व्हिसासाठी अर्ज करताना हा अनुभव अत्यंत उपयुक्त ठरतो.
विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्हिसाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनधिकृतरीत्या काम केल्यास व्हिसा धोक्यात येऊ शकतो. शक्यतो अलीकडील काळामध्ये ज्यावेळी जगभरातील अनेक देश त्यांच्या व्हिसा आणि स्थलांतरणाचे नियम कडक करत असताना या गोष्टींचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे. सीपीटी आणि ओपीटीसाठी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे, कारण प्रक्रियेला वेळ लागतो. तसेच नोकरी करताना शिक्षणाला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे.
थोडक्यात सांगायचे तर, अमेरिकेत शिक्षण घेताना अर्धवेळ नोकरी ही केवळ आर्थिक मदत करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम करते. तर दुसरीकडे सीपीटी आणि ओपीटी यांसारख्या संधींमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक अनुभव मिळतो, जो त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी अमूल्य ठरतो.
विद्यार्थ्यांसाठी टिप्स
विद्यार्थ्यांनी, एसओपी लिहिताना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांबाबत लिहायला हवे. विद्यापीठामध्ये शिक्षण सुरू झाले की ‘ऑन कॅम्पस जॉब्स’साठी त्यांचा प्राधान्यक्रमाने विचार होऊ शकतो. जवळपास सर्वच विद्यार्थी सुट्ट्यांमध्ये वेळ वाया न घालवता इंटर्नशिप्स आणि सीपीटीच्या माध्यमातून अर्थार्जन करतात. त्यातून विद्यार्थ्यांना स्वत:चा किरकोळ खर्च भागवता येतो. त्यामुळे परदेशी भाषा, उत्तम संगणकीय कौशल्ये, भाषेवर चांगले प्रभुत्व, वाचन-लेखन यांसारखी सॉफ्ट स्किल्स विद्यार्थ्यांना अर्धवेळ नोकरी मिळवण्यासाठी फायद्याची ठरू शकतात.
theusscholar@gmail.com
