Success Story Of IAS Officer Srutanjay Narayanan : प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्रीचा मुलगा किंवा मुलगी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार, असं आपल्यातील अनेकांनी गृहीतच धरलेलं असतं. पण, काही जण याला अपवाद असतात. तर, आज आपण अशाच एका स्टार किडबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यानं वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता, स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि चित्रपटसृष्टीत जाण्याऐवजी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत हे आयएएस (IAS) अधिकारी? त्यांचे नाव काय? त्यांनी अभिनय क्षेत्रात जाण्याऐवजी हा मार्ग का निवडला? मग जाणून घेऊ ते कितव्या प्रयत्नात यशस्वी झाले ते.

या आयएएस (IAS) अधिकाऱ्याचं नाव श्रुतंजय नारायणन, असे आहे. श्रुतंजय नारायणन हे प्रसिद्ध तमीळ अभिनेता चिन्नी जयंत (जन्मनाव कृष्णमूर्ती नारायणन) यांचा मुलगा आहे. तमीळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत अभिनीत ८० च्या दशकातील चित्रपटांतील विनोदी भूमिकांसाठी आयएएस अधिकारी श्रुतंजय नारायणन यांचे वडील ओळखले जातात. आयएएस अधिकारी श्रुतंजय नारायणन यांनाही वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात रस असल्यामुळे त्यांनी तरुण वयात थिएटर केले; पण त्यांच्या मनात आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी श्रुतंजय नारायणन यांनी शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, गिंडी (CEG)मधून पदवी आणि प्रसिद्ध अशोका विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली.

हेही वाचा..Success Story: वडील रिक्षाचालक, आर्थिक अडचणींचा सामना; तरीही जिद्दीने बनला ‘तो’ देशातील सर्वात तरुण IAS; वाचा प्रेरणादायी गोष्ट

दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली यूपीएससी परीक्षा :

आयएएस अधिकारी श्रुतंजय नारायणन हे शिक्षण पूर्ण करून थांबले नाहीत. त्यांनी स्टार्टअपमध्ये काम करून अनुभवही मिळवला. या नवीन मार्गाने त्यांना थिएटर सोडण्यास प्रेरित केले. नंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. आयएएस अधिकारी श्रुतंजय नारायणन यांनी दररोज चार ते पाच तास अभ्यासासाठी दिले. नंतर स्वतःला स्टार्टअपमध्ये टिकून ठेवण्यासाठी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केले. श्रुतंजय नारायणन यांनी २०१५ मध्ये AIR 75 सह यूपीएससी परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि ते IAS अधिकारी बनले. IAS अधिकारी श्रुतंजय नारायणन हे सध्या तमिळनाडूमधील विल्लुपुरम जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (विकास) म्हणून नियुक्त आहेत.