पाकिस्तान मधील मोहेन-जो- दारो आणि गुजरात मधील ढोलावीरा या प्राचीन शहरामध्येही स्तूप सापडला. मागच्याच वर्षी ओडिशातही नवीन स्तूपाची नोंद करण्यात आली आहे. एकूणच या निमित्ताने भारतीय स्थापत्य रचनेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला स्तूप, त्याची रचना, इतिहास नेमका आहे तरी काय हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

बौद्ध धर्मीयांमध्ये गौतम बुद्ध तसेच ज्या बौद्ध भिक्षूंनी अर्हतपद प्राप्त केले आहे. त्या अतिमहत्त्वाच्या विभूतींच्या स्मरणार्थ स्तूप उभारला जातो. भारतात अनेक प्राचीन स्तूप आजही आपण पाहू शकतो. प्रांत आणि कालपरत्त्वे त्यांच्या रचनेत फरक आढळत असला तरी त्यांच्या अस्तित्त्वामुळे भारताच्या गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासाविषयी जाणून घेण्यास मदत होते.

अधिक वाचा: भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

स्तूप म्हणजे नेमके काय?

स्तूप हा वास्तू प्रकार समाधिस्थान तसेच पूजास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. स्तूपाचा आकार घुमटाकार असतो, त्याच्या माथ्यावर पेटीसारखा दिसणारा भाग, त्यात छत्र्यांची माळ असते तर भोवती दगडी कठडा आणि चारही दिशांना तोंड करून उभी असणारी उंच तोरणे असतात. भारतीय इतिहासात हजारो वर्षांपासून स्तूप बांधण्याची परंपरा आहे. आज आपण स्तूपाचे जे प्रगत प्रकार पाहतो, त्या स्वरूपापर्यंत पोहचण्यासाठी स्तूप या वास्तूरचनेला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले आहे. या दीर्घ कालखंडात स्तूपाच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत. या बदलांसाठी कारणीभूत घटकांमध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक बदल समान प्रमाणात समाविष्ट होतात. साहित्यिक संदर्भानुसार जैन आणि वैदिक धर्मातही स्तूप उभारण्याची परंपरा होती. एकूणच भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून मृत व्यक्तीच्या समाधी प्रित्यर्थ स्तूप उभारला जात होता. मथुरा येथे झालेल्या उत्खननात इसवी सनपूर्व शतकातील जैन स्तूपाचे पुरावे सापडले आहेत. त्याशिवाय उत्खननात सापडलेल्या अनेक जैन शिल्पांवर ‘आयगपट्टयांवर’ जैन स्तूप कोरण्यात आलेले आहेत.

स्तूप या वास्तूमागील मूळ संकल्पना:

मूलतः स्तूप हा मृत व्यक्तीच्या अस्थीधातुंवर/अवशेषांवर किंवा त्या व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारला जातो. स्तूप उभारण्याच्या मागे मृत्यू नंतरचे जग या संकल्पनेचा समावेश प्राथमिक स्थरावर आढळतो. म. श्री. माटे यांनी ‘प्राचीन कालभारती’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, “मृत व्यक्ती, या ना त्या स्वरूपात जिवंत राहते किंवा अस्तित्त्वात असते ही कल्पना सर्व धार्मिक परंपरात रूढ आहे. म्हणूनच मृत्यूनंतर त्या व्यक्तीवर योग्य ते संस्कार करण्याची परंपरा आहे. म्हणून त्या व्यक्तीला व्यवस्थित दफन केले जात होते, तिच्यासोबत अन्न पाण्यासाठी भांडीकुंडी देणे, तिच्या सेवेसाठी नोकर चाकर पुरविणे अशा विविध प्रकारांनी या कल्पनेची अभिव्यक्ती झालेली दिसते. भारतीय इतिहासात प्रागैतिहासिक समाजांनी मातीच्या पेटीत मृतांना, विशेषतः लहान मुलांना अशा पद्धतीने दफन केलेले आहे. महापाषाण संस्कृतीच्या समाजांनी अशाच स्वरूपाची दफने करून त्यांच्या भोवती दगडांची मोठी वर्तुळे मांडून त्या व्यक्तीचा आणि जागेचा विसर पडणार नाही याची दक्षता घेतली.” दुसऱ्या एका प्रकारात मृत व्यक्तीच्या शरीराच्या जागी तिच्या अस्थी दफन करून तिच्या स्मृती जपल्या जातात आणि त्या अस्थींसभोवती रचना तयार करण्यात येत होती.

अधिक वाचा: बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !

स्तूप वास्तूचे मूळ स्वरूप:

प्रारंभिक काळात स्तूप या वास्तूचे मूळ स्वरूप अगदी साधे, दफनावर असलेला मातीचा ढिगारा एवढेच होते. परंतु हा मातीचा ढिगारा कोणाचा आहे, त्यावर त्याचा आकार आणि रचना ठरत असे. मृत व्यक्ती जर संपन्न, प्रतिष्ठित असेल तर त्या ढिगाऱ्याचा आकार मोठा असे, त्याभोवती दगडांचे वर्तुळ किंवा चौकट करण्यात येत असे. तो ओळखता यावा या करता त्यावर खांब उभा केला जात असे. अशा स्वरूपाच्या रचना पूर्व परंपरेने चालू होत्या, परंतु त्याला खरे महत्त्व आले ते बौद्ध धर्मामुळे. भगवान बुद्धांच्या महानिर्वाणानंतर प्रत्यक्ष बुद्ध धातूंवर उभारण्यात आलेल्या स्तूपांमुळे भारतीय इतिहासात स्तूप या रचनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या शारीरिक धातूंसाठी युद्ध झाली. याचाच परिणाम म्हणून बुद्ध धातू हे आठ भागात विभागले गेले. आणि बौद्ध धर्मातील अष्टमहास्थानांवर स्तूप बांधण्यात आले. कालपरत्त्वे अष्टमहास्थानांवरील स्तुपांचा जीर्णोद्धार होत राहिला आणि त्यामुळे स्तूप वास्तू रचनेत बदल दिसतो.

स्तूपाची प्रतिकात्मकता:

स्तूप हे गौतम बुद्धांच्या ज्ञानाचे आणि त्यांच्या शिकवणुकीचे प्रतीक मानले जाते, स्तूप हे बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गाचे प्रतिनिधित्व करतात, स्तूपाचा वर्तुळाकार आकार जन्म आणि मृत्यूच्या चक्राचे प्रतिनिधित्व करतो आणि यष्टी तसेच छत्रावली निर्वाणाची प्राप्ती दर्शवते. बिहारमधील राजगृह, वैशाली, वेथादीप आणि पावा, नेपाळमधील कपिलवस्तू, अल्लाकप्पा आणि रामग्राम, कुशीनगर आणि उत्तर प्रदेशातील पिप्पलिवन येथील स्तूप प्रत्यक्ष बुद्ध धातूवर बांधण्यात आले आहेत.

स्तूप वास्तुकलेचे घटक:

स्तूपांमध्ये सामान्यत: तळाशी गोलाकार व्यासपीठ असते, त्यावर अंडाकृती घुमट उभारला जातो, या घुमटाकार भागात धातू करंडक ठेवला जातो, या अंडाकृती रचनेच्या डोक्यावर हर्मिका तयार करून यष्टी आणि छत्रावली उभी केली जाते. स्तूपाभोवती कठडा तयार केला जातो, त्याला वेदिका म्हटलं जातं. स्तूप परिसरात प्रवेशासाठी चार बाजूला प्रवेशद्वारे असतात, या प्रवेशद्वारापाशी आयताकृती कमान असते त्याला तोरण अशी संज्ञा वापरली जाते.

अधिक वाचा: भीमा- कोरेगाव: १८१८ साली आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? गॅझेटियर काय सांगते?

प्राथमिक कालखंडातील स्तूप

भारतातील मौर्य कालखंड हा स्तूप वास्तुकलेच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. प्रारंभिक कालखंडातील स्तूप हे साधे, मातीच्या विटांनी आच्छादितअसत, उत्तर प्रदेशमधील इसवी सनपूर्व चौथ्या शतकातील पिप्रहवा स्तूप अशा स्वरूपाच्या रचनेचे प्राचीन उदाहरण आहे. नंतरच्या मौर्य काळात बांधकाम व्यावसायिकांनी स्तूप बांधण्यासाठी दगडाचा वापर करण्यास सुरुवात केली. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सांचीच्या स्तुपावर झालेले बांधकाम हे याचे उत्तम उदाहरण आहे. या कालखंडात स्तूपाच्या भिंतींवर गौतम बुद्धांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांचे कोरीव चित्रण करण्यातही आले. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळात बुद्धाचे प्रतीकात्मक चित्रण पद चिन्ह, स्तूप, कमळ सिंहासन, चक्र आदी स्वरूपात करण्यात येत होते. हळूहळू हे चित्रण बौद्ध परंपरेचा एक भाग झाले. अशा प्रकारे बुद्धाच्या जीवनातील घटना, जातक कथा, स्तूपांच्या रेलिंग आणि तोरणांवर चित्रित केल्या गेल्या. त्या नंतर कुशाण, गुप्त यांच्या कालकांडात स्तूपाच्या रचनेत अनेक बदल झाल्याचे दृष्टिपथास पडते. स्तूपाचे बांधकाम, आकार, शिल्प, नक्षीकाम अशा सर्वच बाबींमध्ये भिन्नता आढळून येते.