Why are Most Buddhist Caves in India भारतीय इतिहासातील बौद्ध धर्माची भूमिका अनन्यसाधारण आहे. भारताला सुमारे २६०० हजार वर्षांचा बौद्ध धर्माचा इतिहास आहे. या इतिहासाचे अनेक साक्षीदार आजही या भूमीत आपल्या भग्न अस्तित्त्वाने समृद्ध इतिहासाची साक्ष देत आहेत. हा समृद्ध इतिहास सांगणाऱ्या शिलेदारांमध्ये स्तूप, लेणी, मंदिरे, किल्ले इत्यादींचा समावेश होतो. भारतीय इतिहास सांगणाऱ्या या अनेक वास्तूंमध्ये बौद्ध धर्माचा इतिहास समजून घेण्यासाठी लेणी महत्त्वाच्या मानल्या जातात. लेणी या वास्तूची सर्वसाधारण व्याख्या दगडी गुहा अशी केली जाते. असे असले तरी मानवाने तयार केलेल्या व निसर्गातील वेगवेगळ्या प्रक्रियेतून तयार झालेल्या गुहा यात फरक आहे. सद्यस्थितीत भारतात साधारण १२०० गुहा-लेणी आहेत. त्यात जवळपास १००० मानवनिर्मित लेणींचा समावेश होतो. म्हणजेच भारतात मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या लेणी या मानवनिर्मित आहेत. तर उरलेल्या गुहा या निसर्गनिर्मित आहेत. निसर्गनिर्मित गुहांचा वापर अश्मयुगीन मानवाने राहण्यासाठी केला होता. भारतात ‘भीमबेटका’ हे स्थळ निसर्गनिर्मित गुहांसाठी प्रसिद्ध आहे. मानवनिर्मित गुहांसाठी प्राचीन अभिलेखांमध्ये लेणी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर लेणी खोदण्याच्या प्रक्रियेसाठी लयनशास्त्र ही संज्ञा वापरण्यात आली आहे.

सर्वात प्राचीन मानवनिर्मित लेणी कुठे सापडते?

भारतातील सर्वात प्राचीन मानवनिर्मित लेणी ही मौर्य काळातील आहे. बिहारमधील बोधगया येथील बाराबर व नागार्जुन या दोन पर्वत शृंखलेवर हा लेणी समूह विस्तारलेला आहे. विशेष म्हणजे ही लेणी तत्कालीन आजीविक नावाच्या पंथाची आहे. या पंथाचा विश्वास ‘दैववादावर’ होता. या लेणी समूहाच्या परिसरात मौर्य सम्राट अशोक व त्याचा नातू दशरथ यांनी या लेणीच्या खोदकामसाठी देणगी दिल्याची माहिती सांगणारा ब्राह्मी लिपीतील अभिलेख उपलब्ध आहे. यामुळेच या लेणीचा काळ हा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात जातो हे समजण्यास मदत होते. सर्वात जुनी किंवा प्राचीन मानवनिर्मित लेणी मौर्य काळातील असली तरी, या लेणीच्या स्थापत्यशैलीवरून दगडात लेणी खोदण्याचे ज्ञान त्यापूर्वीच विकसिक झाले होते हे सर्वमान्य आहे.

Mumbai Maharashtra Day 2024 Mumbai wants more autonomy
मुंबई: मुंबईला हवी अधिक स्वायत्तता !
maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Mahavikas aghadi
“मविआला मुस्लीम मतं पाहिजेत, पण…”, प्रकाश आंबेडकरांचा आरोप; मतदारयाद्यांचा उल्लेख करत म्हणाले, “भाजपाप्रमाणेच…!”
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक

आणखी वाचा: बुद्ध पौर्णिमा आणि कार्ल मार्क्स जयंती एकाच दिवशी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोघांच्या तत्त्वज्ञानाबाबत काय भाष्य केले?

भारतात किती बौद्ध लेणी आहेत ?

या आधी नमूद केल्याप्रमाणे भारतात जवळपास १००० मानवनिर्मित लेणी आहेत. त्यातील ८० टक्के लेणी ही बौद्ध पंथाची आहेत तर उरलेली २० टक्के लेणी ही हिंदू व जैन पंथियाची आहेत. त्यामुळे भारताच्या इतिहासात सर्वात जास्त लेणी ही बौद्ध तत्त्वज्ञानाशी संलग्न आहेत. बहुतांश बौद्ध लेणीसमूह हा पश्चिम भारतात आहे. विशेष म्हणजे आज भारतात उपलब्ध बौद्ध लेणीपैकी ९० टक्के लेणी ही महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात असलेली बौद्ध लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या ते इसवी सन तेरावे शतक इतक्या प्रदीर्घ काळात खोदली गेली होती. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात प्रदीर्घ काळासाठी बौद्ध धर्माचे अधिपत्य होते हे लक्षात येते. या भागात आढळणाऱ्या लेणी समूहात हीनयान, महायान, वज्रयान या बौद्ध तत्त्वज्ञानातील तीनही पंथाशी संबंधित लेणी आपण आजही पाहू शकतो.

भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणी का सापडतात?

इसवी सन पूर्व सहाव्या शतकात गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा पाया रचला. सोप्या वा साध्या भाषेत सर्वसामान्य जनतेला समजेल अशी शिकवण दिली. त्यांच्या या शिकवणीने प्रभावित होवून तत्कालीन समाजातील व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात या तत्वज्ञानाचा स्वीकार केला होता. इतकेच नाही तर हे व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने जेथे गेले तेथे बौद्ध धर्माची शिकवण आपल्या सोबत घेवून गेले. त्यामुळे बहुतांश लेणी ही व्यापारी मार्गावर आढळतात. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर बौद्ध धर्माच्या प्रसाराचे काम याच बौद्ध तत्वज्ञान आत्मसात करणाऱ्या व्यापारी वर्गाने केले आहे.

आणखी वाचा: विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !

बौद्ध भिक्षुणी अग्रेसर

तत्कालीन समाजातील स्त्रिया या बौद्ध तत्वज्ञान अनुसरण्यात अग्रेसर होत्या हे बौद्ध लेणीमध्यें आढळणाऱ्या अभिलेखिय पुराव्यांमुळे सिद्ध झालेले आहे. तसेच आपल्या सांसारिक जगाचा त्याग करून बौद्ध संघात दिक्षा घेवून प्रवेश करणाऱ्या बौद्ध भिक्षुंनी केलेल्या प्रसारामुळेच आज आपण जगाच्या कानकोपऱ्यात बौद्ध धर्माची शिकवण पोहचल्याचे पाहू शकतो. त्याचीच परिणीती म्हणून भारतात आज मोठ्या संख्येने बौद्ध लेणी अस्तितत्वात आहेत.

बौद्ध भिक्षु, व्यापारी यांची बौद्ध लेणीच्या विकासातील भूमिका :

बौद्ध संघांच्या नियमानुसार बौद्ध भिक्षूनां एका ठिकाणी अधिक काळासाठी राहण्याची परवानगी नव्हती. एकाच ठिकाणी जास्त काळ राहिल्यास त्या जागेशी आपली भावनिक बांधिलकी निर्माण होते. बौद्ध भिक्षू त्याच भावनिक जगाचा त्याग करून निर्वाण मिळविण्याकरीता संघात आलेले असतात. त्यामुळे हीच भावनिक गुंतागुंत आणि मोह टाळण्यासाठी त्यांना काही नियम पाळावे लागत होते. त्याच नियमांनुसार बौद्ध भिक्षूंना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत प्रवास करणे अनिवार्य होते. ज्यावेळेस हे बौद्ध भिक्षू महाराष्ट्रात (पश्चिम भारतात) आले. त्यावेळेस त्यांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागले होते. महाराष्ट्र हा जास्त पावसाचा प्रदेश आहे आणि होता. त्यामुळे या भागात पावसाच्या काळात सतत प्रवास करणे हे अशक्य होते. त्यामुळे यात गरजेतून बौद्ध धर्मात ‘वर्षावास’ ही संकल्पना मांडण्यात आली.

वर्षावास

वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये राहण्याची केलेली तात्पुरती व्यवस्था. पावसाळ्याच्या सहा महिन्यांपैकी पहिले तीन महीने किंवा शेवटचे तीन महीने बौद्ध भिक्षूंना एक ठिकाणी राहण्याची परवानगी होती. या तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या वास्तुला वर्षावास असे म्हटले जाते. याच वास्तूच्या निर्मितीतून बौद्ध भिक्षुंसाठी लेणी खोदण्याची संकल्पना अस्तित्त्वात आली होती. किंबहुना बौद्ध लेणीमधील शिलालेखांमध्ये वर्षावास या संकल्पनेचा उल्लेख सापडतो हे विशेष. प्रारंभीच्या काळात या वास्तूंच्या निर्मितीत बांबू, विटा यांचा वापर करण्यात आला होता. परंतु बौद्ध भिक्षु हे राहण्यासाठी गावाच्या बाहेर जागा निवडत असत. महाराष्ट्राच्या बाबतीत ही जागा सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये होती. आणि हाच मार्ग तत्कालीन व्यापारी व्यापारासाठी वापरात होते. त्यावेळी आजच्या सारखे रस्ते नव्हते. त्यामुळे दरी खोऱ्यातून, घनदाट अरण्यातून बौद्ध भिक्षू व व्यापारी यांना प्रवास करावा लागत होता. या प्रवासात व्यापारी रात्रीच्या वेळेस बौद्ध संघात आश्रय घेत असत. याच गरजेतून या व्यापारांनी बौद्ध संघाला देणगी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे व्यापारांना वा त्यांच्या व्यापारी मालाला जंगली श्वापद, दरोडेखोर यांच्यापासून संरक्षण लाभले. म्हणूनच व्यापारी व भिक्षु यांच्या संयुक्तिक कार्यकुशलतेतून मोठ्या प्रमाणात लेणींची निर्मिती झाली.

आणखी वाचा: विश्लेषण:Global Buddhist Summit 2023 चीन, भूराजकीय मुद्दे आणि ‘बौद्ध मुत्सद्देगिरी’!

बौद्ध स्थापत्यशैलीतील मुख्य वैशिष्ट्ये

बौद्ध धर्मात हीनयान, महायान, व वज्रयान हे तीन प्रमुख पंथ होते. या तीन पंथाचा विकास काळाच्या विविध टप्प्यात झाला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मूळ मांडणीनंतर अनेक वर्षांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात झालेल्या बौद्ध धर्माच्या दुसऱ्या परिषदेत या तत्त्वज्ञानाचे हीनयान व महायान या दोन भागात विभाजन झाले. तर इसवी सन चौथ्या शतकात वज्रयान हा नवीन पंथ उदयास आल्याचे दिसते. इथे एक मुद्दा आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान हे गेली अडीच हजार वर्षे आपले मूळ रोवून आहे. त्यामुळे साहजिकच अनेक स्थानिक, परकीय गोष्टी, घटना, प्रथा, परंपरा यांचा परिणाम या धर्मावर झालेला आहे. आणि त्यातूनच महायान, वज्रयान या पंथात मूळ बौद्ध तत्त्वज्ञापेक्षा वेगळेपण जाणवते. तेच वेगळेपण आपल्याला बौद्ध लेणी स्थापत्यातही दिसून येते.

मूळ बौद्ध तत्त्वज्ञान हे साधे सोप्पे होते. त्यात मूर्तीपूजेला प्राधान्य देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्या तत्त्वज्ञानाला अनुसरून निर्माण झालेल्या लेणीमध्ये आपल्याला कुठेही बुद्ध मूर्ती आढळत नाहीत. इतकेच नव्हे तर कुठल्याही प्रकारचे अतिशयोक्त अलंकरण शिल्पस्वरूपात या लेणीमध्ये दिसून येत नाही. मात्र नंतर आलेला महायान हा पंथ मूर्तीपूजा मानणारा असल्याने यांच्या काळात घडवल्या गेलेल्या लेणींमध्ये बुद्ध, बोधिसत्त्व यांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. वज्रयान हा पंथ आधीच्या दोन्ही पंथापेक्षा बऱ्याचअंशी वेगळा असल्याने त्यांच्या धारणेनुसार अघोरी स्त्री देवता आपल्याला त्यांच्या लेणीमध्ये दिसतात.
बौद्ध लेणी स्थापत्यात विविधता आढळून येत असली असली तरी ही लेणी बौद्ध धर्माचा गेल्या हजारो वर्षांचा इतिहास सांगतात. त्यामुळे या लेणीचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे !