गेल्या काही लेखांमधून आम्ही, वेगवेगळ्या खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन करत आहोत. आजच्या आणि या पुढच्या काही लेखांमधून आम्ही काही खेळ, शारीरिक अॅक्टिव्हिटीज याबद्दल लिहिणार आहोत. यात आपण योगासन, मेडिटेशन, मल्लखांब, कुस्ती या आणि इतर अनेक खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहणार आहोत.

कुस्तीला कुस्ती का म्हणतात? कुस्ती या खेळाचा उगम कुठे झाला? प्राचीन इजिप्त आणि ग्रीस देशात हा खेळ लोकप्रिय होता का? भारताच्या महाभारतासारख्या महाकाव्यात उल्लेख केलेले मल्लयुद्ध आणि आजची कुस्ती यात काही साम्य आहे का? या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केव्हा झाला? खाशाबा जाधव यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? कुस्तीच्या क्षेत्रात त्यांचे योगदान काय आहे? महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर शहराला, भारतात कुस्तीच्या नकाशावर नावलौकिक कसा मिळाला? ग्रीकोरोमन आणि फ्री स्टाईल कुस्ती यांत काय फरक आहे? कुस्तीमध्ये चांगली कामगिरी बजावणारे भारताचे पुरुष आणि महिला खेळाडू कोणकोणते?

कुस्तीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या वजनी गटात भारताचे खेळाडू खेळतात? ऑलिम्पिक खेळाडू योग्य वजन कसे राखतात आणि २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनिशा फोगट या खेळाडूला वजन कमी न करता आल्याने अपात्र व्हावे लागले का? कुस्ती आणि बॉक्सिंग यात काय फरक आहे? कुस्ती आणि ज्युडोमध्ये काय फरक आहे? मॅटवरची कुस्ती आणि मातीतली कुस्ती यात काय फरक आहे? कुस्तीतले वेगवेगळे डाव कोणते आहेत? कुस्तीचे नियम आणि पॉईंट्स कसे मोजतात? हरयाणा राज्यात लिंग गुणोत्तर असमान असतानाही या राज्यामध्ये कुस्तीचे प्रशिक्षण पुरुषांबरोबर मोठ्या प्रमाणावर महिलांनाही का दिले जाते? ‘दंगल’ हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का? हा चित्रपट कोणत्या कुस्तीपटूंवर आधारित आहे?

अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे त्या खेळासाठी काय फायदा होतो? कुस्ती खेळाचे इतर प्रकार कोणते आहेत? भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या देशात हा खेळ परंपरागत खेळला जात आहे? भारतीय कुस्ती महासंघातील (रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया) वाद नेमका काय होता आणि ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू दिल्लीत त्याविरुद्ध आवाज उठवत रस्त्यावर का उतरले? ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ अन्वये महिला खेळाडूसाठीही लैंगिक छळ वा शारीरिक शोषण होऊ नये म्हणून अंतर्गत समिती सक्तीच्या आहेत का? कुस्ती खेळाचे भविष्य कसे असेल?

बॉक्सिंग

बॉक्सिंग हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो का? बॉक्सिंगमधील भारताचे महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत? मेरी कोम या खेळाडूबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मेरी कोम यांच्या आयुष्यावर चित्रपट आला होता, तो तुम्ही पाहिला आहे का? मेरी कोम यांनी केलेल्या कष्टांचे योग्य चित्रण चित्रपटात आले आहे असे तुम्हाला वाटते का? मणिपूर राज्यात बॉक्सिंग हा खेळ खास करून महिलावर्गात कसा लोकप्रिय झाला? बॉक्सिंग या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या देशांची मातब्बरी आहे असे तुम्हाला वाटते ? बॉक्सिंगमध्ये कोणते वजनी गट असतात? बॉक्सिंग खेळात खेळाडूंना कोणती काळजी घ्यावी लागते? ‘बॉक्सिंग अरेना’चा आकार किती असतो? या खेळात पॉइंट्स कसे मोजले जातात? २०२४ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमध्ये किती आणि कोणत्या वजनी गटात पदक मिळवले? ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणजे काय? बॉक्सिंग खेळात प्रतिस्पर्ध्याकडून इजा झाली तर काही कारवाई होते का?

आट्यापाट्या

भारतातील पारंपरिक खेळात आट्यापाट्या हा खेळ तुम्हाला माहीत आहे का? या देशाचा उगम कुठच्या देशात झाला? भारताव्यतिरिक्त हा देश कोणत्या देशांमध्ये तो खेळला जातो? आट्यापाट्या आणि खो-खो हे खेळ सारखेच आहेत की यात काही फरक आहे? या खेळात एका बाजूला किती खेळाडूंची टीम असते? या खेळाच्या मैदानावर किती चौकोन आखलेले असतात? त्या चौकोनांचे खेळामध्ये महत्त्व काय असते?

भारत हे ज्या खेळांचे उगमस्थान आहे त्या खेळांबद्दल उमेदवारांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातूनसुद्धा तयारी केली पाहिजे. त्या खेळाचा उगम साधारणतः केव्हा झाला, त्या खेळाला राजकीय आश्रय मिळाला असेल तर त्या राज्यकर्त्यांबद्दल माहिती असली पाहिजे. आधुनिक काळात त्या खेळामध्ये काही बदल झाले असले तर त्याची माहिती असली पाहिजे. परंपरेने चालत आलेल्या या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी काय केले पाहिजे? अधिकाधिक लोकांनी हे खेळ खेळावेत यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? या सारख्या धोरणांशी संबंधित प्रश्नांची तयारी करणे आवश्यक आहे. कारण बोर्डाचे सदस्य हे फक्त खेळाबद्दल प्रश्न विचारणार नाहीत. समोरचा उमेदवार हा अधिकारी म्हणून निवडला जाणार आहे आणि राष्ट्रीय पातळीवर खेळांचे धोरण ठरवण्यात आणि राबवण्यात त्याचा सहभाग असणार त्यामुळे त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाणे हे साहजिकच आहे.