‘‘माझं अस्तित्वच आता माझी बासरी आहे. तिच्या जोरावर मी देशविदेशात प्रचंड फिरलो. अनेक बरेवाईट अनुभव घेतले. अनेक दिग्गज गायक, वादकांबरोबर जगभरात कार्यक्रम करताना सुरांमध्ये चिंब भिजलेल्या असंख्य रसिकांना पाहून मीही तृप्त झालोय. वयानुसार भटकणं कमी झालंय. आता मुरलीधराच्या सान्निध्यात बसून असंख्य आठवणींच्या हिंदूोळय़ावर झुलतो आहे..’’ सांगताहेत, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील
ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया.
माझा मुरलीवाला आणि त्याच्या बासरीनं मला जगायला कायमच बळ दिलं. त्याच्या जोरावर आजवर माझ्या अवघ्या आयुष्याचं आनंद पर्यटन झालं आहे. माझा प्रत्येक श्वास जेव्हा संपूर्ण शरीरातून प्रवास करून, बासरीच्या वाटेनं बाहेर येतो, तेव्हा त्याला सुरांचं अद्भुत लेणं लाभतं. मन आनंदानं लखलखून जातं. याच बासरीमुळे मला जगातल्या जवळपास प्रत्येक खंडात जाण्याची संधी मिळालीय. जिथं जिथं गेलोय, मी तिथलाच झालोय. त्याच या मनात घर करून राहिलेल्या आठवणी..
माझा पहिला मोठा प्रवास होता माझ्या गावातून प्रयाग- अलाहाबादेतून मुंबईला येण्याचा. माझ्या आईचं माझ्या लहानपणीच निधन झालं होतं. पिताजी ‘पहिलवानी’चे शौकीन. त्यामुळे अगदी कडक शिस्तीचे, स्ट्रिक्ट! माझ्या शरीराला एखाद्या पैलवानासारखा आकार येतो की नाही यावर बारकाईनं लक्ष ठेवून असत. ते स्वत: स्वयंपाक करायचे. दीदीलाही स्वयंपाकघराकडे जाऊ देत नसत. तालमीकडे जरा दुर्लक्ष झालं की त्यांना ते अजिबात आवडत नसे. पण कसं कुणास ठाऊक मला बासरीचं वेड लागलं. कुठूनही बासरीचे स्वर कानी पडू लागले, की मी मंत्रमुग्ध होऊन त्याकडे धावायचो. माझा मित्र जगन्नाथ, त्याचे वडील जवाहिरांचे व्यापारी; पण त्याला त्यात रस नव्हता. मग एक दिवस आम्ही दोघंही संगीताच्या ओढीनं घर सोडून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये बसलो.
तो प्रवास लक्षात राहण्याजोगाच होता. खिशात पैसे नाहीत, टी.सी. येताना दिसला, की बाजूच्या शौचालयात लपायचं, असला प्रकार करत प्रवास केला. मुंबईत पोहोचलो, मग इथं तिथं विचारणा करत बाणगंगा मंदिरात गेलो. तिथं एका भल्या साधूनं आश्रय दिला. तिथंच राहिलो. त्या संध्याकाळी जगन्नाथ गाणं गायला आणि मी त्याला बासरीवर साथ केली. हा माझा कदाचित पहिला जाहीर कार्यक्रम असावा! त्या बदल्यात त्या देवळात राहायची परवानगी मिळाली. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं काम शोधायला निघालो. फिरत फिरत चेंबूरला आर.के. स्टुडिओमध्ये पोहोचलो. कुणीही आत सोडेना. दरवानाला आम्ही गाणं गाऊन दाखवलं, बासरी वाजवून दाखवली; पण छे! तो बधला नाही.
बाजूला बाबूराव पैलवानांचा ‘जागृती स्टुडिओ’ होता, थोडीफार ओळख काढली आणि त्या जोरावर आत प्रवेश केला. आम्ही आत गेलो, पाहातो तर समोर साक्षात पुढच्या शॉटची वाट बघत बसलेल्या मीनाकुमारी. त्यांच्याकडे बघत बघतच दिवस संपला. त्यानंतरच्या दिवसांत आमच्याकडचे पैसेच संपले आणि आम्ही घरी परतलो. अॅडव्हेंचर म्हणता येईल असा हा माझा पहिला प्रवास. या प्रवासानं मला घराची आणि पिताजींच्या मायेची खरी किंमत कळली. दरम्यान, मी पूर्णत: बासरीकडे वळलो होतो आणि त्याच्याच बळावर ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या नोकरीसाठी भुवनेश्वरला गेलो. एक संपूर्ण वेगळं जग या प्रयाग ते भुवनेश्वरच्या प्रवासामुळे माझ्यासमोर आलं. नंतर, मी बदली झाल्यामुळे मुंबईत आलो आणि संपूर्ण विश्व बदलून गेलं. रेडिओच्या नोकरीबरोबरच चित्रपटांसाठी काम सुरू झालं, शास्त्रीय संगीतामध्ये बासरीसारख्या लोकवाद्याला स्थान मिळवून देण्याच्या धडपडीतून देशभर भ्रमण करू लागलो. सुरुवातीच्या काळात तर रात्री लातूरला कार्यक्रम करायचा, सकाळी हुबळीत कार्यक्रम करायचा, दुपारी धारवाड आणि त्याच रात्री बेळगावला कार्यक्रम असं चालायचं. तरुण वयात ते धकून जायचं; पण एक नक्की, या प्रत्येक नव्या गावात त्या त्या गावातला प्रसिद्ध पदार्थ खाल्ल्याशिवाय मी तिथून निघायचो नाही. त्या त्या गावाची संस्कृती जशी त्या गावाच्या कलेच्या आवडीतून दिसते तशीच त्या गावाच्या खाद्यपदार्थातूनही दिसते. ते पदार्थ त्या भूमीचे असतात. आपण त्या भूमीशी आपलं नातं जोडतो. आजही या वयात मधुमेहासारखे आजार असताना, माझं खाद्यभ्रमण सुरू असतं. मुंबईहून पुण्याला ‘डेक्कन क्वीन’ने जायला मला आवडायचं, त्याचं कारण या ट्रेनची पँट्री कार! चवदार पदार्थ देखणेपणानं या गाडीत वाढले जातात. कर्जत स्टेशन आलं, की खाली उतरून बटाटेवडे खाणं हा माझा आणखी एक आवडीचा भाग होता. पुण्याला मोटारनं जाताना पळस्प्याला थांबून कोथिंबीर वडी खाण्याचा आनंद मी अनेकदा लुटला आहे. असो, हा एका वेगळय़ा लेखाचा भाग आहे; पण अनेक प्रवास कायमचे लक्षात राहिले.
एकदा मी कार्यक्रम करण्यासाठी उस्ताद अल्लारखाँसाहेबांबरोबर झाशीला निघालो होतो, मुंबई-दिल्ली विमानानं. विमान उडाल्यावर साधारणपणे चाळीस-पंचेचाळीस मिनिटांनी विमान अचानक एका बाजूला कललं. आम्हाला काही कळेना काय होतंय. काही वेळानं घोषणा झाली, विमानाचं एक इंजिन बंद पडलंय, त्यामुळे आपण मुंबईला परत जात आहोत. खाँसाहेबांसह आम्हाला सर्वाना धक्का बसला. मनात भीती दाटली. झालं, आता एक तबलजी आणि एक बासरीवाला -देवाचे लाडके कलावंत, देवाकडे निघाले, असं वाटलं मला! मी चेहऱ्यावर भीती येऊ दिली नाही; पण घाबरलो तर होतोच. विमान कसंबसं उतरवलं गेलं आणि आम्ही सुखरूप घरी आलो. खाँसाहेबांनी काही वेळ आमच्याकडेच आराम केला. त्यांच्या पत्नींना जेव्हा हे कळलं, तेव्हा त्या आमच्या घरी आल्या. आम्हाला दोघांना घेऊन माहीमच्या दग्र्यात जाऊन त्यांनी अल्लाचा लाख लाख शुक्रिया अदा केला!
एका कार्यक्रमासाठी माझ्या काही साथीदारांसह मीरतहून हरिद्वारला निघालो होतो. कार्यक्रम संध्याकाळी ७ चा होता. कारनं जेमतेम तासाभराचं अंतर होतं. प्रवासात आमच्यापुढे एक ट्रक होता. नेमकं काय झालं माहीत नाही, पण त्या ट्रकच्या चाकामुळे एक दगड उडाला तो थेट आमच्या गाडीच्या पुढच्या काचेवर आदळला. काचेचे तुकडे तुकडे होऊन ती कोसळली. सुदैवानं आम्हाला काही झालं नाही, पण काचेचे ते लोंबकळणारे तुकडे पाहून आमचा ड्रायव्हर गाडी चालवायला घाबरू लागला. माझा एक सहकारी म्हणाला, ‘‘मी चालवतो.’’ काही वेळ गेल्यानंतर, आमच्या गाडीजवळून एक ट्रक वेगात गेला. हे महाशय घाबरले, त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि आमची गाडी रस्ता सोडून थोडय़ा अंतरावरच्या झाडावर आपटली, पण कुणालाही काही लागलं नाही. कार्यक्रमाला जायचं तर होतंच. काही वाहनांना हात दाखवला, एक वाहन थांबलं, आम्ही हरिद्वारला पोहोचलो; पण तोवर खूप उशीर झाला होता. संयोजकांनी कार्यक्रम रद्द झाल्याचं जाहीर केलं होतं. आम्ही पोहोचलो तेव्हा रसिक निघतच होते. आम्ही स्टेजवर गेलो. रसिकांना सगळय़ा घटना सांगितल्या. सगळे पुन्हा जागेवर बसले. मी मनोमन ईश्वराचं स्मरण केलं आणि बासरीच्या पोकळीत फुंक मारली.. तो कार्यक्रम अद्भुत रंगला!
आणखी एक अविस्मरणीय प्रसंग. १९६९चा सुमार असेल. विख्यात गायिका गिरिजादेवी यांच्याबरोबर मी दिल्लीहून जम्मूला विमानानं निघालो होतो. विमानात सोबत असलेले एकजण म्हणाले, ‘‘चला, तुमची एका खास व्यक्तीशी ओळख करून देतो.’’ ते मला कॉकपिटमध्ये घेऊन गेले. त्या विमानाचे पायलट होते राजीव गांधी! भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांचे चिरंजीव. आमचा त्या वेळी जो परिचय झाला, तो त्यांनी कायम लक्षात ठेवला. आमचा स्नेह कायम टिकला. १९८० ला इंदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर एकदा मी युरोपमध्ये कार्यक्रमांच्या मालिकेसाठी गेलो होतो. मला इंदिराजींच्या स्वीय सचिवाचा फोन आला, ‘‘तुम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान आणि काही पाहुण्यांसाठी कार्यक्रम करू शकाल का?’’ मी आनंदानं होकार दिला आणि लंडनहून भारतात आलो. दिल्ली विमानतळावर खुद्द राजीवजी स्वत: कार चालवत, माझ्या स्वागतासाठी आणि मला घ्यायला आले होते. ध्वनिव्यवस्था कोणती असावी हेही त्यांनी ठरवलं होतं. नंतर जेव्हा ते देशाचे पंतप्रधान झाले तेव्हाही भारत महोत्सवासाठी ते मला जपानला स्वत:च्या विमानातून घेऊन गेले. तिथं कार्यक्रम झाल्यानंतर, त्यांनी मला खास पाहुण्यांसाठी दुसरा एक कार्यक्रम करण्याची विनंती केली. आम्ही दिल्लीला परतलो त्या वेळी ते मला चहासाठी घरी घेऊन गेले. ‘‘मी तुमच्यासाठी काय करू शकतो?’’ असं त्यांनी मला विचारलं. ‘मला गुरुकुलासाठी जागा हवीय,’ असं म्हटल्यावर त्यांनी मुंबईला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना फोन करून आज जिथं ‘वृंदावन गुरुकुल’ आहे ती जागा द्यायला लावली. माझ्या प्रवासानं मला हेही दिलं.
तत्पूर्वी १९६६ मध्ये माझा पहिला परदेश प्रवास झाला तो सुप्रसिद्ध गायक, संगीतकार हेमंतकुमार यांच्यासह. ते मला लंडनला घेऊन गेले होते. पं. रवी शंकर यांचे नातेवाईक बिरेन शंकर यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. हेमंतदांनी त्या कार्यक्रमात मला सामील करून घ्यावं, अशी विनंती केली. प्रसिद्ध रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम होता. अतिशीत वातावरणात मला वाजवायचं होतं. वेळूपासून बनलेल्या बासरीसाठी ते वातावरण अजिबात योग्य नव्हतं. समोर भारताचे उच्चायुक्त, तसेच पं. रवी शंकर, यहुदी मेन्युहिन, ज्याँ पिअरे रामफल आदी दिग्गज बसलेले. मी घाबरलोच होतो. मैफल चांगली व्हावी म्हणून मी तसा सोपा राग भूप व त्रिताल निवडला. मला बारा मिनिटं दिली होती; पण वादन असं काही रंगलं, की मला वीस मिनिटं वाजवण्याची संधी मिळाली. या पहिल्यावहिल्या दौऱ्यात मी रेडिओवरचं, दूरचित्रवाणीवरचं संगीत भरपूर ऐकलं-पाहिलं. १९७० मध्ये मी आणि माझे घनिष्ठ मित्र पं. शिवकुमार शर्मा (शिवजी) एकत्रित स्वीडनच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथल्या एका रेकॉर्ड कंपनीनं आमच्या जुगलबंदीची रेकॉर्ड काढली. लोकसंगीतात वाजवल्या जाणाऱ्या सुषीर आणि तंतुवाद्यांच्या जुगलबंदीची ती पहिली रेकॉर्ड होती.
आणखी एक भन्नाट दौरा आठवतोय, १९७३चा पंडित रवी शंकरजींबरोबरचा युरोप-अमेरिकेचा दौरा. एखादी कार भाडय़ानं घ्यावी तसं एक विमान भाडय़ानं घेऊन आम्ही दौऱ्यावर निघालो होतो. ३०० आसनक्षमतेचं ते, बाहेर ॐ अक्षरं लिहिलेलं आलिशान विमान होतं. विमान धावपट्टीवर उतरताच एक जण प्रत्येकाच्या हातात पाकीट ठेवायचा, ज्यात स्थानिक चलन असे, ज्या हॉटेलात उतरणार असू त्यातील खोलीची चावी असायची. कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचे कपडे स्वच्छ धुऊन, इस्त्री करून हँगरवर टांगलेले असत. भारतीय कलाकारांसाठी खास भारतीय आचारी आणलेला होता. रवीजी, अल्लारखाँसाहेब, शास्त्रीय गायिका लक्ष्मी शंकर, संगीतकार जॉर्ज हॅरिसन, शिवजी, असा सारा कलाकारांचा संच असायचा. सतत संगीतविषयक गप्पा, त्यातील प्रयोगांच्या चर्चा, नवनव्या शहरांना भेटी, परमानंदाचे ते क्षण, आजही माझ्या अंगावर रोमांच उभे करतात. एका वेळी पंचवीस हजार प्रेक्षक कार्यक्रमाचा आस्वाद घेताना पाहून तर मी थक्क झालो होतो. त्यातही जेव्हा ते भारतीय संगीताचा आस्वाद घेत असत तेव्हा ते शांतपणे सर्व समजून घेत असत आणि पाश्चात्त्य संगीत सुरू झालं की त्यात ते बेभान होऊन जात.
त्या दौऱ्यामधील लंडनमधला एक अनुभव फार सुरेख होता. जॉर्ज हॅरिसनचा एक जुना किल्ल्यासारखा मोठा वाडा होता. त्या वाडय़ाच्या परिसरात आमच्या तालमी चालायच्या. शेवटच्या तालमीचं तर रेकॉर्डिग केलं गेलं व ती रेकॉर्ड नंतर ‘शंकर फॅमिली अँड फ्रेंड्स’ या नावाने हॅरिसनच्या कंपनीनं सादर केली. या दौऱ्यात मी पोटपूजाही भरपूर केली! कार्यक्रमाच्या बिदागीच्या पैशांतून मी मला परवडतील असे वेगवेगळे पदार्थ खाल्ले. त्यात मफिन्स, पेस्ट्रीज अधिक होत्या.
तिथून आम्ही अमेरिकेत आलो. अमेरिकेत असताना आम्हाला- म्हणजे मी, शिवजी आणि अल्लारखाँसाहेब अशा तिघांना, लॉस एंजेलिसहून कॅलिफोर्नियात एका ठिकाणी जायचं होतं. मला तिथं मोटार चालवायची होती. नवी गाडी, नवा देश, नवे रस्ते, गाडी चालवण्याची नवी पद्धत! त्यात त्या काळात आजच्यासारखे गूगल मॅप वगैरे नव्हते; पण मी स्मरणशक्तीच्या बळावर गाडी चालवली, गन्तव्य स्थळी आम्ही न चुकता पोहोचलो. त्यानंतरचा एक अनुभव मात्र जबरदस्त आहे. आम्ही कधीही विसरू शकणार नाही. भारतात आमच्या हातात अँबॅसिडर, फियाट अशा जुन्या प्रकारच्या गाडय़ा अन् इथं फोर्ड मस्टँग! तिचा वेग, सहज वळणारं स्टीअिरग, उच्च तंत्रज्ञान माझा वेग सुसाट झाला. तेव्हा वेगाच्या फारशा मर्यादा नसत. एके ठिकाणी तर मला लाल सिग्नल दिसलाच नाही आणि समोर एकदम एक चारचाकी मोठा ट्रक आला. मी करकचून ब्रेक दाबले, ट्रकचालकानं ब्रेक दाबले आणि कसेबसे आम्ही एकमेकांसमोर तीन-चार इंचांवर जाऊन थांबलो. त्यानंतर मात्र मी असला उपद्वय़ाप कधी केला नाही.
माझं परदेशातलं एक आवडतं ठिकाण आहे, नेदरलँड्समधलं रोस्टरडॅम. नेदरलँड्स किंवा हॉलंड हा नयनरम्य प्रदेश आहे. इथल्या छोटय़ाशा नद्या, कालवे, जलवाहतूक, बस-ट्रॅम-रेल्वेसेवा, फुलाफुलांच्या सुरेख बागा, मासेमारी, प्रेमळ आणि स्नेहाळ लोक! १९७१ मध्ये मी इथं पहिल्यांदा आलो आणि जणू इथलाच झालो. इथला काव्य महोत्सव, संगीत महोत्सव म्हणजे कलापर्वणीच. मी नेहमी याचा आस्वाद घेत असे. इथले भारतीय सर्व सण आनंदानं साजरे करतात. दिवाळीला मातीचे दिवे लावतात, हातात दिवे घेऊन शोभायात्रा काढतात, होळीला होळी पेटवतात, रामलीला होते. मीलन मेला (जत्रा) भरतो, त्यात भारतीय खाद्यपदार्थ, कपडे, संगीत, वेगवेगळय़ा वस्तूंचे स्टॉल्स अशी धमाल असते. मी नियमितपणे त्यात सहभागी होत असे. हे सारं उपभोगताना मला संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवत असे- ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग!’
पण आता माझं फिरणं, भटकणं वयानुसार कमी झालंय. बऱ्याचदा मी माझ्या मुंबईतल्या गुरुकुलात असतो. माझ्या विद्यार्थ्यांबरोबर बासरीची उपासना करतो. ही उपासना करत असताना भल्या पहाटे साडेतीन वाजता सवयीनं उठतो, मुरलीधराच्या समोर जाऊन बसतो, डोळे मिटतो, हातात बासरी घेतो. नंतर मनाच्या रथात बसतो आणि मग कधी प्रयागला, कधी अॅमस्टरडॅमला, कधी सॅन फ्रान्सिस्कोला, तर कधी केनला जातो. तिथं हजारो रसिकांचा समुदाय जमलेला असतो, ते अधीर झालेले असतात माझ्या बासरीचे स्वर झेलायला आणि मी अधीरलेला असतो मला गवसलेल्या स्वरांचं नक्षत्र त्यांच्यासमोर पेश करायला. बस, मग सुरू होतं एक आनंद पर्यटन!
आजही या वयात मधुमेहासारखे आजार असताना, माझं खाद्यभ्रमण सुरू असतं. मुंबईहून पुण्याला ‘डेक्कन क्वीन’ने जायला मला आवडायचं, त्याचं कारण या ट्रेनची पँट्री कार! चवदार पदार्थ देखणेपणानं या गाडीत वाढले जातात. कर्जत स्टेशन आलं, की खाली उतरून बटाटेवडे खाणं हा माझा आणखी एक आवडीचा भाग होता. पुण्याला मोटारनं जाताना पळस्प्याला थांबून कोथिंबीर वडी खाण्याचा आनंद मी अनेकदा लुटला आहे. असो, हा एका वेगळय़ा लेखाचा भाग आहे; पण अनेक प्रवास यामुळे कायमचे लक्षात राहिले.
शब्दांकन : डॉ. नितीन आरेकर
nitinarekar@gmail.com
