भा. ल. महाबळ

मला लिहिण्यावाचून राहवत नाही म्हणून मी लिहितो. अवतीभवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. लेखन हा माझा आता छंद उरला नाही, ते माझे व्यसन झाले आहे. माझ्या खात्यावर सत्तर पुस्तके आहेत.  एकाकीपणावर मात करत मी मजेत जगतो आहे..

माझे चालू वय ८८ वर्ष आहे. पूर्ण ८७ हे वय सांगणं मला तोटय़ाचं वाटतं. ८८ हा आकडा ८७ हून मोठा आहे. तसं फुकटात मिळालेलं वडिलकीतील एक वर्ष का गमवा? पाऊणशे म्हणजे ७५ हे माझं वय खूपच मागं पडलं आहे. त्या वयात मी काय करत होतो? आज जे करत आहे तेच तेव्हाही केलं असणार. आज मी काय करतो? ६० वर्ष पुरी झाल्यावर, नियमानुसार ‘व्हीजेटीआय’, मुंबई – १९ या अभियांत्रिकी महाविद्यालयातून, मी प्राध्यापक म्हणून निवृत्त झालो. साठाव्या वर्षांनंतर जे करत आहे तेच आज अठ्ठय़ांशीव्या वर्षीही करत आहे. रोज काही वेगळं करण्याची कल्पकता माझ्याकडं नाही.

निवृत्तीनंतर, शिंका याव्यात त्याप्रमाणे, मला तीन हार्ट अ‍ॅटॅक आले. प्रत्येक हार्ट अ‍ॅटॅकनंतर माझी घराबाहेर हिंडण्याफिरण्याची क्षमता कमी होत गेली. मी एकाकी पडत होतो. मोठा मुलगा रघुनाथ,

सून अनघा, नात ईशा आणि पत्नी वसुधा यांच्या बरोबर मी राहतो. म्हणजे मी तसा एकाकी नाही. रघुनाथ आज साठीच्या अलीकडे आहे. मुलगा म्हणून त्याचं वय आणि बाप म्हणून माझं वय सारखंच आहे. त्याचा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यामुळं त्याच्यावर माझं घर सोडण्याची वेळ आली नाही. म्हातारपणी मला सहजीच मुलासुनेच्या संपन्न कुटुंबात राहायला मिळतं आहे. मी कशाला घर सोडेन? तरीही मी एकाकीच आहे. मी नोकरी करणारा मुंबईकर होतो. सकाळी आठ वाजता घर सोडायचं आणि रात्री आठ वाजता घरी यायचं हा माझा दिनक्रम वर्षांनुवर्ष होता. माझे मित्र, परिचित हे या बारा तासांमधील होते. निवृत्तीनंतर हे सारे दुरावतात आणि आपण एकटे, एकाकी पडतो यात नवल ते काय?

पंचाहत्तरीनंतर मी दुहेरी एकाकी पडलो कारण माझ्या वयाची, माझ्या घरी येऊन गप्पा मारणारी मित्रमंडळी गुडघेदुखीमुळं, रस्त्यांवरील वाहनांच्या वर्दळीमुळं आणि ‘घरात दुसरं कोणीच नाही, मला घरी थांबणं भागच आहे,’ असं म्हणत माझ्याकडे येऊ शकत नाहीत. आम्ही फोनवर बोलतो पण टाळ्या देऊन संवाद करू शकत नाही. ‘इंद्रिये मोठी आहेत असं म्हणतात, पण मन हे इंद्रियांहून मोठं आहे. मनाहून बुद्धी मोठी आहे. या सर्वाहून आत्मा मोठा आहे’ असं सांगणारा संस्कृत श्लोक मला तोंडपाठ आहे. ‘इंद्रिये मोठी आहेत,’ हे मला थेट अनुभवातूनच पटलं. म्हणून तर मी मुकाट डोळ्यांवरच्या तीन आणि गुडघ्यावरची एक अशा शस्त्रक्रिया स्वीकारल्या.

पुढच्या वयात वृद्ध एकाकी पडतात कारण बिनकामाचे, रिकामे, मोकळे पूर्ण चोवीस तास त्याच्या अंगावर आदळतात. मी मुला-सुनेच्या पालकत्वाखाली राहतो. गेली वीस वर्ष, सुतार, प्लंबर, गवंडी, इलेक्ट्रिशिअन, टीव्हीवाले यांचा आणि माझा एका शब्दाचाही संबंध नाही. माझ्या खोलीतील उपकरणे बिघडली, मला काही जास्तीच्या सोयी हव्या असल्या तर मी सुनेला सांगतो. माणसे येतात. माझ्या अडचणी दूर करतात आणि पैसे मागण्यासाठी सुनेकडे जातात म्हणजे त्यांचाही माझ्याशी संवाद होत नाही. आपलं एकाकीपण आणखी गडद होतं. घरच्या कामात लक्ष घालून मी कौटुंबिक बेबनाव वाढवला नाही. मला स्वयंपाकशास्त्र, वाढदिवसांच्या तारखा स्मरणात असणं, कापडखरेदी, जुनं-कोवळ्या-शिळ्या-ताज्या-स्वस्त-महाग भाज्या नावानिशी ध्यानी ठेवणं, हे सारं जराही जमत नाही. अशा परिस्थितीत एकाकीपणावर मात करायची असेल तर आपल्याला आपल्यातच रमता आलं पाहिजे. काही लोक प्रवृत्तीनं धार्मिक असतात. ते आपला वेळ पूजाअर्चा, नामस्मरण, जपजाप्य यांमध्ये सहज घालवतात. काहींना संगीताचा कान असतो. ते म्युझिकप्लेअरमध्ये हरवून जातात. काहींना वाद्य वाजवता येतं. वाद्यं त्यांना एकटं पडू देत नाहीत. सुदैवानं एकेकाळी, फार-फार पूर्वी मला एक छंद होता. तो मला आठवला.

१९४९ ते १९५८ या काळात म्हणजे माझ्या सतरा ते सव्वीस या वयात मी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजच्या आणि नंतर सांगलीच्याच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. विलिंग्डन कॉलेजातून मी बी.एस्सी (ऑनर्स) ही पदवी घेतली, दोन शाळांत शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. (सिव्हिल इंजिनीअरिंग) ही पदवी मिळवली. विद्यार्थी असताना मी, किलरेस्कर-स्त्री-मनोहर, हंस-मोहिनी-नवल, सह्य़ाद्री, वाङ्मयशोभा, अमृत, संजय, सकाळ, स्वराज्य, विविधवृत्त, आलमगीर, रंजन, तारका या नियतकालिकातून कथा – लेख – कविता लिहिल्या. मी बऱ्यापैकी लेखक असणार, तेव्हाचे संपादकही उदार असावेत. माझ्याकडं आज ‘मोहिनी’ या ‘हंस’ प्रकाशनाच्या मासिकाची, मे १९५६, ऑगस्ट १९५७ आणि ऑगस्ट १९५८ ची मुखपृष्ठं आहेत. अंकावर किंमत आहे १ रुपया. ‘मोहिनी’, ‘दीपावली’ १९५६ या अंकाची किंमत आहे दोन रुपये. ही मुखपृष्ठं माझ्याकडं आहेत कारण या अंकांत माझ्या कथा होत्या. अर्थात, कथाही माझ्याकडं आहेत.

१९६२ ला, मी मिरज सोडलं, नोकरीसाठी ‘व्हीजेटीआय’मध्ये हजर झालो आणि मुंबईकर होऊन बसलो, फसलो म्हणा हवं तर! मिरजेला मी माझ्या मालकीच्या तीन खोल्यांच्या घरात राहत होतो. घराला मागंपुढं अंगण होतं. मागच्या दारी विहीर होती. मुंबईत मी दोन खोल्यांच्या, एकूण क्षेत्रफळ फक्त २२० चौरसफूट, छोटय़ा जागेत, पहिल्या मजल्यावर, भाडेकरू म्हणून अडकलो. लेखनाचा माझा छंद मला भरपूर आनंद देणारा होता, पण या छंदातून मिळणारे पैसे राहण्यासाठी, थोडी मोठी ४००-५०० चौरस फुटांची जागा मिळवण्याकरता, जराही उपयोगी नव्हते. त्यासाठी मला माझी अभियांत्रिकीची पदवी पूर्ण वेळ वापरणं गरजेचं होतं. मी लिहिणं बंद केलं. १९९२ ला, म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी, मी १५०० चौरस फुटांची, मालकी हक्काची जागा, सहकारी गृहसंस्थेत, मेटाकुटीनं मिळवू शकलो.

मोठा मुलगा रघुनाथ इंजिनीअर झाला, त्यानं स्वत:चा व्यवसाय चालू केला, दोन्ही मुली डॉक्टर झाल्या. मी निवृत्त झालो, हृदयरोगी झालो, रिकाम्या चोवीस तासांचा मालक होऊन एकाकी पडलो. वेळ कसा घालवावा ही विवंचना मला पडली. मला माझा लेखनाचा छंद आठवला. १९९२ नंतर म्हणजे वयाच्या साठीनंतर, पंचाहत्तरीत आणि त्यानंतर आज अठ्ठय़ांशीव्या वर्षीही मी लिहीत आहे. आतापर्यंत, ‘अस्सा नवरा’ (१९९२) ते ‘समाधान’ (२०१८) पर्यंत माझे २९ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘संसाराचा सारीपाट’ (१९९९) ते ‘आपले गदिमा’ (२०१९) असे १९ लेखसंग्रह प्रकाशित झाले. इतर काही पुस्तके धरून माझ्या खात्यावर सत्तर पुस्तके आहेत.

‘पुस्तक प्रकाशित होणं हा योगायोगाचा भाग आहे.’ असं मला ‘मेनका प्रकाशन’चे संपादक

पु. वि. बेहेरे मला म्हणाले होते ते पूर्णपणे खरं आहे. ‘अस्सा नवरा’ हे माझं पहिलं पुस्तक शंकर सारडा यांच्यामुळंच प्रसिद्ध झालं. माझ्या दृष्टीनं आश्चर्याची आणि अभिमानाची बाब म्हणजे शंकर सारडा हे १९८९ ते १९५८ या काळातील लेखक भा. ल. महाबळांना ओळखत होते. माझ्या या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासन आणि मराठी साहित्य परिषद, पुणे यांचा ‘कथावाङ्मय – प्रकार विनोद’ हा पुरस्कार मिळाला. माझ्या छंदाला प्रारंभीच हे उत्तेजन गरजेचं होतं. आतापर्यंत मला लहान-मोठे अठरा पुरस्कार मिळाले आहेत.

‘एकाकीपणावर मात करण्याकरिता मी लिहितो.’ हे फार ढोबळ उत्तर झालं. जास्त खरं उत्तर द्यायचं झाल्यास, मला लिहिण्यावाचून राहवत नाही म्हणून मी लिहितो. अवतीभवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये स्त्री-पुरुष लग्नाशिवाय करार करून एका छपराखाली राहतात, श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरुण पोरं दारू पिऊन बेफाम वेगानं कार चालवून फूटपाथवरची माणसं चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात आणि त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात, लग्नाचं वचन देऊन पुरुष स्त्रीला फसवतो, शिकली सवरलेली माणसं बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद आणि गैरसमज यामुळं भांडणं धुमसतात आणि ती खून-आत्महत्यापर्यंत जातात, चांगल्या घरातील मुलं वाईट संगतीमुळं गुन्हेगारी विश्वात पोचतात, स्त्रियांची लैंगिक छळणूक, स्त्री-भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी रोग्यांची फसवणूक, गुंडांची खंडणीखोरी, लबाड विकासकांकडून घरखरेदीदारांची होणारी फसवणूक, वगैरे विषयांवरच्या बातम्या मी वाचतो आणि ऐकतो. या सर्व दुष्टांना धडा शिकवून सदाचरणी करावं असं मला वाटतं. पोटतिडकीनं मी यावर विधायक तोडगे काढतो आणि कथा लिहितो. अशा पाचशे कथा मी लिहिल्या आहेत.

मी शोधलेली उत्तरे तकलादू आहेत आणि व्यवहारात जराही उपयोगी नाहीत हे मला माहीत असतं. वर मी या कथा हलक्या-फुलक्या भाषेत लिहितो. काय करणार? सूर्याकडं गॉगलच्या काचेतून पाहणंच मला सोसवतं. माझ्या कथांवर ‘विनोदी कथा’ असा शिक्का बसणं आणि त्यासाठी मला ‘महाराष्ट्र शासन’, ‘मराठी साहित्य परिषद’, ‘कोमसाप’ यांचे पुरस्कार मिळणं हे घडतं. मात्र माझ्या कथांची कुंपणापर्यंतची धाव मला माहीत आहे. १९९२ ला मी निवृत्त झालो तेव्हा माझी नात ईशा तीन महिन्यांची होती. आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये आजोबा हे पद मला अत्युच्च आणि मिरवावं असं वाटतं. योगायोगानं, एका वृत्तपत्राने ‘आजीआजोबा’ हे साप्ताहिक सदर, २००३ ते २०११ अशी आठ वर्ष, लिहिण्याची संधी मला दिली. त्या सदरातील लेखांच्या ‘आजीआजोबा – आधार की अडचण’ या (रोहन प्रकाशनने) प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची पाचवी आवृत्ती मजजवळ आहे. या पुस्तकाचे मुंबई नभोवाणीवरून दोनवेळा वाचनही झालंय. हे ‘आजोबापण’ माझ्या अंगात एवढं भिनलं आहे, की मी आजीआजोबांवर कथा तर लिहितोच, शिवाय तरुण नातवंडांच्या जीवनावर प्रेमकथा लिहितो. नातवंडांच्या प्रेमात विघ्न आणतात त्यांचे प्रौढ आई-वडील आणि विघ्नहर्ते असतात त्यांचे आजीआजोबा!

लेखन हा माझा आता छंद उरला नाही, ते माझे व्यसन झाले आहे. नाही म्हटलं तरी अठ्ठय़ांशीव्या वर्षी लेखन करताना पाठ अवघडते, शरीर थकतं. माझा मुलगा रघुनाथ मला बरेच वेळा सांगतो, ‘‘बाबा, मी तीन वेळा येऊन गेलो. तुम्ही झोपला होता.’’ पुढच्या वयात रात्री झोप येत नाही, दिवसा तीन वेळा मी काय झोपणार? खुर्चीत बसून अवघडलेलं शरीर पलंगावर आडवं होतं, थकलेले डोळे बंद होऊन काहीही पाहणं नाकारतात.

अगदी अलीकडे म्हणजे २८ मे २०१९ या दिवशी माझी नात ईशा (ती आता २६ वर्षांची आहे) हिनं ‘माझे आजोबा – भा. ल.’ हे माझ्यावर लिहिलेलं छापील टिपण मला दिलं. कपाटाची आवराआवर करताना तिला ते सापडलं. ईशा त्या वेळी शाळेत सहावी ‘अ’मध्ये होती असं त्या टिपणाच्या खाली छापलं आहे. २००४  म्हणजे त्या वेळचं माझं वय ७२ होतं. नातीवरच्या प्रेमापोटी मी ते टिपण शब्दश: देतो – ‘माझे आजोबा म्हणजे भा. ल. महाबळ. लोकांच्या दृष्टीने ते लेखक आहेत, पण माझ्या दृष्टीने ते माझे लाडके आजोबा आहेत. माझे आजोबा अगदी शिस्तप्रिय आहेत. त्यांच्या दिनक्रमात सर्वात महत्त्वाचे आहे फिरणे. त्यांनी आतापर्यंत अगदी कमी वेळा फिरणे चुकवले आहे. ते नेहमी चिंतामण देशमुख बागेत फिरण्यास जातात. दुसरा नंबर म्हणजे दुपारची झोप. दुपारी एक वाजता जेवण झाले की आजोबा, वर्तमानपत्र घेऊन झोपायला गेलेच म्हणून समजा. आजोबांच्या जीवनात कुटुंब, फिरणे आणि झोप यांना सर्वात जास्त महत्त्व आहे. कोणत्याही स्पर्धेचे पाठांतर करायचे म्हटले की आजोबांची खोली गाठायची. ते माझे पाठांतर उत्तम करून घेतात. तसेच गणितात आणि मराठीत काही अडचण आली, की आजोबांची खोली गाठली, की उत्तर मिळालेच म्हणून समजावे. आजोबांना काही अडले की ते शब्दकोशाकडे धावलेच. अशुद्ध मराठी लेखन आजोबांना मुळीच चालत नाही. आजोबांची आवडती गोष्ट म्हणजे गोड खाणे. पण मधुमेह असल्यानं त्यांना ते चालत नाही. माझे आजोबा म्हणजे आमच्या घराचा आनंद आहे, आमच्या घराचे संरक्षण आहे. रात्री झोपण्याच्या आधी कडय़ा लावलेल्या आहेत, की नाही ते बघणे हे त्यांचे जणू काही कामच असल्यासारखे ते नित्यनियमाने करतात. आजोबांना प्रवास करणे बिलकुल आवडत नाही. त्यामुळे कुठल्या लांबच्या कार्यक्रमाला ते कधीही जात नाहीत. आजोबांची अजून एक प्रिय गोष्ट म्हणजे त्यांची खोली. तीही ते सोडत नाहीत. असे आहेत माझे आजोबा, सुखी आणि गंमतीदार – ईशा रघुनाथ महाबळ सहावी अ.’

१९९२ मधील साठ वर्ष पुरी केलेला मी, २००७ ला पंच्याहत्तरी गाठली आणि आजचा २०१९ मधील वयाची ८७ वर्ष पुरी केलेला मी, यांच्यात काहीही फरक नाही. आजही रात्री मी फेरी मारून दारांना कडय़ा लावल्या का ते पाहतो. महिन्यापूर्वी पूर्ण घराचे रंगकाम झाले. माझी खोली उत्तम आहे, तिला रंगकामाची गरज नाही म्हणून मी खोली सोडायलाच तयार नव्हतो. मुलाने खूप विनंत्या केल्या म्हणून एक दिवस, सकाळी दहा ते रात्री आठ खोली सोडली. आजही मला शब्दकोश हवे असतात. शरीराच्या दुबळेपणामुळं, कोणी तरी कोश माझ्या खोलीत पोचवते. आजही मी एका हातात काठी, एका हातात छत्री घेऊन, तोल सावरत चिंतामण उद्यानात सकाळी जाण्यासाठी धडपडतो. मी परतेपर्यंत घरचे चिंतेत असतात.

सारांशानं बोलायचं तर मी एकाकीपणावर मात करत मजेत जगतो आहे. मजेत हा शब्द महत्त्वाचा. मजेत जगण्याचं श्रेय मी एकत्र कुटुंबपद्धतीला आणि माझ्या लिखाणाच्या व्यसनाला देईन. मला असंच मजेत जगायचं आहे. माझ्या आत्म्याला, आज ना उद्या, नवं वस्त्र धारण करावं लागणार हे मला माहीत आहे, मात्र मला तशी घाई नाही!

mahabal60@gmail.com

chaturang@expressindia.com