-डॉ. नंदू मुलमुले

कोणतंही नातं सुंदर आणि आनंदी होण्याकरिता पूर्वग्रह दूर सारून दुसऱ्याला समजून घ्यायला हवं. याकरता समजंसपणा, माणुसकी हे गुण जोपासावे लागतात, मात्र हल्ली मुक्या प्राण्याची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करणारा माणूस आपल्याच माणसांची भाषा समजून घ्यायला कमी पडतोय का? आत्मसंवाद, आत्मपरीक्षण आणि अंतिमत: आत्मस्वीकार असेल तरच मैत्रीचा परीघ वाढत जाईल, हे समजून घ्यायला हवं.

केस केवळ उन्हानं पिकत नाहीत, तर साठ-सत्तर उन्हाळ्यांचा अनुभव त्यांना पिकवतो, मात्र त्यासाठी आत्मसंवाद, आत्मपरीक्षण आणि अंतिमत: आत्मस्वीकार हवा. माणूस जन्मभर मुक्काम केलेल्या पूर्वग्रहावरून उतरून समंजस भूतलावर यायला हवा. अशा भूतलावर त्याची दृष्टी स्वच्छ, निकोप होते. जशी नजर अधू होण्याच्या वयात सरलाबेन यांना ती निकोप दृष्टी लाभली होती.

हेही वाचा…‘आईची जात, ती मुलांची का नाही?’

सरलाबेन आणि तिचा नवरा नरोत्तमभाई हे एक छान पिकलेलं जोडपं. त्यांच्या ‘गुलमोहोर’ सोसायटीत मी तळमजल्यावर राहायला आलो आणि नरोत्तमभाई सोसायटीचे सचिव असल्यानं त्यांना वार्षिक कर द्यायला त्यांच्या घरी गेलो. समोरच्या गॅलरीत एका बसक्या खुर्चीत नरोत्तमभाई ताजं वृत्तपत्र वाचत बसलेले. गोरीपान सुरकुतली त्वचा, पापणीचेही केस पांढरे झालेले, अंगात धुवट बंडी, निळीकाळी पातळ ट्रॅक पॅन्ट, घरातही डोक्यावर कॅप. कदाचित बाहेरून फिरून आले असावेत. बाजूला फरशीवर मस्त पाय पसरून भाजी निवडत बसलेल्या सरलाबेन. डोळ्यांवर बारीक काड्यांचा चष्मा, त्यातून डोकावणारा हिशेबी ठामपणा. तरीही बाई प्रेमळ म्हणायची.

‘‘तुम्हाला काय चालेल? चहा की कॉफी? थोडा वेळ असेल, तर गरम मटकीची उसळ तयार होतेय. सकाळी नाश्त्याला चांगली असते, घ्याना बशीभर. ढोकळा रात्रीचा आहे, गरम करून देऊ? नुकतीच केलेली हिरवी चटणी आहे, पाहिजे तुम्हाला?’’ सरलाबेनने आल्या आल्या माझ्यावर आतिथ्याचा हल्ला चढवला.

आतिथ्याच्या माझ्या काही कल्पना आहेत. विमानात प्रवेश करणाऱ्या ‘यात्रीगणांचे’ हसून स्वागत करणाऱ्या हवाईसुंदरीइतके ते कृत्रिम नसावे मान्य, पण मानगुटीवर बसून पदार्थ घशात घालण्याइतके आक्रमकही नसावे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या मध्यमगती गोलंदाजीसारखं हवं, मारायचं तर मारा, सोडायचं तर सोडून द्या. मी सकाळी खाऊनपिऊन आल्याचं सांगून फक्त चहाचं निमंत्रण स्वीकारलं आणि नरोत्तमभाईंकडे पैसे सुपूर्द केले. ते मिश्कीलपणे बायकोकडे बघत होते. ‘ये इसका ऐसाही है, तुमको कुछ ना कुछ खिलाकरही छोडेगी। बैठो ना, घाई आहे का?.’’ मी खुर्चीत विसावलो.

हेही वाचा…कर्करोग प्रतिबंधात्मक उपचार हाच उपाय

‘‘ये सोसायटी का एकेक लोग ऐसा है।’’ सरलाबेन शेजाऱ्यांच्या नावे शेंगा सोलीत सांगू लागल्या, ‘‘पाच नंबरवाला खामकर वैसे अच्छा आदमी है, त्याची बायको मात्र भांडखोर आहे. कशाला पॅसेजमध्ये कचरा टाकायचा? लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवते आणि मग घरात पर्स शोधायला जाते. तीन नंबरकी विमलाबाई अच्छी औरत है। तिचा नवरा मात्र एकदम खडूस. सोसायटीचा मेन्टेनन्स वेळेवर देत नाही, पण कुणाची ना कुणाची तक्रार करत राहातो. सामनेवाली लडकी रोज पार्टी करती है, तो हुं शू करू?’’

मात्र सरलाबेनच्या व्यक्तिमत्त्वात तक्रारीखेरीज इतरही काही उमदे पैलू होते. याचा मला लवकरच प्रत्यय आला. रंगमंचावर आता तिसरं पात्र अवतीर्ण झालं. साधारण तिशी-पस्तिशीचा, शिडशिडीत अंगकाठीचा एक तरुण दारावर बेल न वाजवता आत आला. सरलाबेन आणि नरोत्तमभाईंना त्याने चरणस्पर्श केला. ‘ताजा दुधी भोपळा दिसला बाजारात, घेऊन आलो आणि या तुमच्या रक्तदाबाच्या गोळ्या. आठ दिवसांच्या उरल्यात ना? घेताय ना मम्मी तुम्हीपण?’ सरलाबेन कौतुकाने उद्गारल्या, ‘‘बरोबर लक्षात आहे बेटा तुझ्या. पण एवढा दुधी भोपळा कशाला? लागतेच किती भाजी आम्हा दोघांना? हा माणूस तर संध्याकाळी जेवतच नाही. नुसता चहा पितो.’’ तेवढ्यात त्या तरुणाचं माझ्याकडे लक्ष गेलं. सरलाबेननं त्याला माझी ओळख सांगितली. ‘‘आपल्या सोसायटीत तळमजल्यावर राहायला आलेत.’’ त्यानं हात पुढे केला, ‘‘मी भावेश, सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. छान सोसायटी आहे ही. बिझनेस एरियात असूनही निवांत आहे.’’

तेवढ्यात सरलाबेनला आपल्या आतिथ्याची आठवण झाली. ‘‘वेळ आहे ना तुझ्याकडे? थांब तुला पोहे करून देते, मराठी पद्धतीचे.की ताज्या ब्रेडला जाम लावून देऊ? बस की जरा?’’

हेही वाचा…सांदीत सापडलेले: भांडण

भावेश हसत उठला, ‘‘वाहतुकीलाच जाम लागलाय मम्मी, जातो मी. उद्या लवकर येतो जरा,’’ तो वळून गेलासुद्धा.

सरलाबेननं माझ्या बशीत नको नको म्हणत असताना चहासोबत खारी ठेवली. ‘‘शेअर सर्टिफिकेट मिळालं की नाही तुम्हाला?’’ नरोत्तमभाई विचारू लागले तोवर रंगमंचावर आणखी एका पात्राचं आगमन झालं.

ही तिशी-पस्तिशीची तरुणी होती. आल्या आल्या ती माझ्याकडे स्मित करून स्वयंपाकघरात वळली. ‘‘ही माझी मुलगी कोमल. जवळच राहते. होमिओपॅथिक डॉक्टर आहे.’’ सरलाबेन म्हणाल्या. ‘‘ इसकी एक स्पेशालिटी है. ती ‘डॉग इंटरप्रिटर’ आहे. कुत्र्यांची भाषा समजते तिला’’ नरोत्तमभाईंनी लेकीचं वैशिष्ट्य सांगितलं. मला फार कुतूहल वाटलं. इथे आम्हाला अद्याप माणूस वाचता येत नाही. हिला कुत्र्यांची भाषा कळते?

‘‘कुत्रे आणि सगळेच प्राणी नेहमीच काही ना काही हावभाव करत असतात. डोळ्यांच्या, कानांच्या, पंजाच्या, शेपटीच्या काही हालचाली करतात. त्यातून ते बोलत असतात. आपली मन:स्थिती सांगत असतात.’’ कोमलनं खुलासा केला.

हेही वाचा…मनातलं कागदावर: कोरडी साय!

‘‘आणि भुंकतात निरनिराळ्या आवाजात?’’ मी सकाळीच सोसायटीच्या आवारात दोन प्रतिस्पर्धी कुत्र्यांची मस्त खर्जातली जुगलबंदी ऐकली होती.

‘‘कुत्र्यांची शरीरभाषा, बॉडी पोश्चर हे संवादाचं मुख्य माध्यम आहे. त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. साधी शेपूट घ्या; तो शांत आहे, तणावात आहे, घाबरला आहे, आनंदी आहे की रागात आहे हे शेपटीची स्थिती आणि हालचालींवरून सांगता येतं. कानाच्या हालचालीवरून कुत्रा सावध आहे, स्वस्थचित्त आहे की आक्रमक मन:स्थितीत आहे हे कळतं.’’ कोमलनं माहिती दिली. ‘‘अद्भुत आहे हे सगळं. कुत्र्यांचा दुभाषी होणं हे आव्हानात्मक असेल नाही?’’

‘‘हो. लोक कुत्रा पाळायला घेतात, पण त्याच्या वागणुकीनं गोंधळात पडतात. मी त्यांना त्याची मन:स्थिती समजावून सांगते. त्यामुळं मालक आणि कुत्रा यांचं नातं छान जुळतं.’’ कोमलनं बशी आत नेऊन ठेवली आणि ती निघालीसुद्धा. ‘‘क्लिनिकची वेळ झाली आहे. ओके बाय अंकल.’’ तिनं वडिलांच्या गळ्यात हात टाकला आणि आईला ‘बाय’ केलं.’’

‘‘छान आहे तुमची मुलगी. स्वत:चं क्लिनिक चालवते?’’

‘‘अभी वो सीख रही है। एका नामवंत होमिओपॅथला असिस्ट करते.’’ नरोत्तमभाईंनी खुलासा केला. कोमल गेल्यापासून सरलाबेन थोड्या गप्प होत्या. आता शेंगा तोडून झाल्या होत्या. माझ्या तोंडून सहज प्रश्न बाहेर पडला. ‘‘तो सकाळी येऊन गेलेला तरुण कोण? तुमचा मुलगा का?’’ निवडलेल्या भाजीचे ताट बाजूला सारत सरलाबेनने जो खुलासा केला तो ऐकून मी तीनताड उडालो. त्याला कौतुकानं आठवत त्या म्हणाल्या, ‘‘हमारा एक्स सन इन लॉ है, भावेश!’’

माजी जावई? हा काय प्रकार आहे? माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्यांनी खुलासा केला, ‘हमारी बेटी का डिव्होर्स हो गया है। दहा वर्षं संसार केला. अलग झाले, पण भावेश फार चांगला मुलगा आहे. अजूनही येतो, आम्हाला आईवडिलांच्या ठिकाणी मानतो.’’

हेही वाचा…माझी मैत्रीण: मैत्रीचं देणं!

इथून पुढील संवादात सरलाबेनच्या समजूतदारपणाने समृद्ध झालेल्या स्वभावाचं दर्शन घडत गेलं. ‘काय झालं माहीत नाही. पोरीनं आपलं लग्न स्वत: ठरवलं, स्वत: मोडलं. तिचा स्वभाव थोडा हट्टी आहे. एकुलती एक, जे मागत गेली ते मिळत गेलं. छोटी उमरमां चालसे, पुढे मागेल ते मिळालंच पाहिजे अशी वृत्ती होऊन जाते. वस्तू मिळेल, प्रेम कसं मिळेल? काही दोष भावेशचाही असेल. मितभाषी आहे. कोमलसारखा अतिउत्साही नाही. त्याचं प्रेम दिसण्यासारखं नाही, ते मला समजत होतं, कोमलला समजलं नाही. काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. वेळेवर येत नाही, रविवारी बाहेर पडत नाही, पार्टीला जायला तयार नसतो, या गोष्टी आयुष्यभराचं नातं तोडून टाकण्या- इतक्या महत्त्वाच्या आहेत का? जिंदगी लंबी हुई है, सोच छोटी। विचारलं तर म्हणतात, आयुष्य एकदाच मिळतं, इच्छा का मारायच्या? प्रत्येक इच्छापूर्तीच्या मागे पळाल तर एकदाच मिळणारं आयुष्य पळण्यात संपून जाईल,’’ सरलाबेननं उसासा टाकला. स्वत:शीच बोलल्यासारख्या बोलू लागल्या, ‘‘छोड दिया हाथ. पण नातं का बिघडवता? लगन टूटी गयू, फ्रेंडशिप क्यू तोडना? माणस बहू सारा छे, एना माटे लग्न केलं ना? त्याच्यासोबत राहणं नाही शक्य, नका राहू, पुन्हा मैत्री करा. शत्रुत्व कशाला? कुत्र्यांची भाषा समजते, मग माणसांची का नाही?’’

खरंच. मुक्या प्राण्याची भाषा समजून घेणाऱ्या कोमलला न बोलणाऱ्या माणसाची समजली नाही की समजून तडजोड करावीशी वाटली नाही? तडजोड केली पाहिजे, पण कुणी करायची आणि किती करायची हे कोण ठरवणार? अशा प्रश्नांना उत्तर नसतं. पर्याय असतात. तेही हिरिरीने बाजू घेऊन मांडणारे पक्ष असतात. न्यायालयात तरी प्रश्नांची उत्तरं कुठं मिळतात? तिथेही तडजोड असते. अगदी खून करणाऱ्यालाही शिक्षा असते, मेलेल्या माणसाचा जीव कुठे परत मिळतो?

हेही वाचा…जिंकावे नि जागावेही: कृतज्ञता

‘‘दोघांना काही मूलबाळ?’’

‘‘मुलगी आहे सहा वर्षांची. गोड बछडी, कोमलबरोबर राहते,’’ सरलाबेननं उसासा सोडला.

‘‘घटस्फोटात नात्यांचा खून होतो, पण शिक्षा मिळते निरागस मुलांना,’’ मी पुटपुटलो.

‘‘तेच तर. म्हणून मी पोरीला म्हटलं, तुझं त्याचं पटत नसेल, पण अगदी भांडून दुष्मनी घ्यायची गरज नाही. माणूस चांगला आहे, आम्हाला मान देतो, आईवडिलांसारखा वागवतो, अजून काय पाहिजे?’’

हेही वाचा…‘भय’ भूती: आंधळ्या भयाचं निराकरण

माणूस स्वत:भोवती वर्तुळ तयार करून त्यात कोळ्यासारखा राहतो. हे विश्व एक विशाल वर्तुळ आहे. मग देश, शहर, वस्ती, व्यवसाय, धर्म, गोत्र, मैत्र ही त्यातली अनेक वर्तुळं. नवरा-बायको हे सगळ्यांत आतले, निकट वर्तुळ. ते तुटलं, तर मैत्रीचा परीघ जोपासावा. तो तुटला तर माणुसकीचा परीघ जोपासावा. ग्रहगोल आपले परीघ सांभाळतात. तो भंग करणारा धूमकेतूही आपलं वर्तुळ सांभाळतो. फक्त माणसांना पूर्वग्रहांवरून समंजसपणाच्या भूतलावर उतरता आलं पाहिजे… सरलाबेनसारखं मन थोर करता आलं पाहिजे.

nmmulmule@gmail.com