डॉ. वसुधा सहस्रबुद्धे vasudhavs@yahoo.co.in
समतावादी आणि शोषणविहीन समाजाची निर्मिती ही त्यांच्या लेखनाची प्रेरणा झाली आणि त्या आदिवासींच्या, नक्षल आंदोलनातील लोकांच्या जीवनसंघर्षांची गाथा लिहू लागल्या. शेतकरी, मजूर या संघर्षशील खऱ्याखुऱ्या नायकांना त्यांनी आपल्या लेखनाचा आधार बनविलं. समाजातील अन्याय, शोषण, दु:ख त्यांना लिहायला प्रेरित करतं. त्या म्हणतात, ‘‘ज्या व्यवस्थेने त्यांना मुक्त केलं नाही त्याविरुद्ध, शुद्ध सूर्यासारखा क्रोध ही माझ्या लेखनाची प्रेरणा आहे.’’
महाश्वेतादेवींचं आयुष्य आणि साहित्य एक चिरंतन, चेतनामय प्रवाह आहे. शोषित, वंचित, पीडित सगळेच या प्रवाहाचे साथीदार आहेत. त्यांची अस्मिता जागी करून, असंवेदनशील समाजव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आक्रोश व्यक्त केला. महाश्वेतादेवींचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाका शहरात झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब पश्चिम बंगालमध्ये आलं. त्यांचे आई-वडील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक ऋ त्विक घटक त्यांचे काका होते. एकूण पूर्ण कुटुंब साहित्यिक-सामाजिक कार्य करणारं होतं. शिवाय शांतिनिकेतनमध्येही त्यांचं वास्तव्य-शिक्षण झालं. त्यामुळे रवींद्रनाथांचा, निसर्गाचा प्रभाव होताच. त्या लहानपणीच लिहू लागल्या.
महाश्वेतादेवी डाव्या विचारसरणीच्या होत्या, परंतु पार्टीच्या बंधनातून मुक्त होत्या. म्हणूनच समतावादी आणि शोषणविहीन समाजाची निर्मिती ही त्यांच्या लेखनाची प्रेरणा झाली आणि त्या आदिवासींच्या जीवनसंघर्षांची गाथा लिहू लागल्या. संघर्षशील खऱ्याखुऱ्या नायकांना त्यांनी आपल्या लेखनाचा आधार बनविलं. त्यांच्या ‘जली थी अग्निशिखा’ या कादंबरीची नायिका झाशीची राणी आहे. तर ‘जंगलाचे दावेदार’चा नायक बीरसा मुंडा आदिवासी आहे. ‘मास्टर साहेब’ कादंबरीचा नायक भोजपूरचा नक्षलवादी आहे. तसंच ‘१०८४ की माँ’ ही महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. हे लेखन करण्यासाठी त्या अनेक दिवस आदिवासींबरोबर राहिल्या. त्यांच्या जीवनात आणि संघर्षांत एकाकार झाल्या. आपल्या साहित्यातून जन-इतिहास मांडण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं.
‘जंगलाचे दावेदार’ या कादंबरीत बिहारमधील अनेक गावांच्या घनदाट जंगलात राहणाऱ्या हो, हूल, मुंडा, संथाल, ओरांव अशा अनेक आदिवासी जमातींच्या – श्रद्धा, अंधश्रद्धा, गरिबी, भूक, शोषण याबरोबरच अतिशय इमानदार आणि निष्ठावान माणसांचं जिवंत चित्रण आहे. जंगलाला आई मानून पूजा करणाऱ्या, निसर्गाइतक्या निष्पाप परंतु अशिक्षित जातींकडून शोषणाविरुद्ध आणि जंगलाचा मालकी हक्क परत मिळविण्यासाठी केलेल्या सशस्त्र क्रांतीची ही प्रेरक महागाथा आहे. २५ वर्षांच्या बीरसा मुंडाला सगळ्यांनी भगवान मानलं. आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी तो भगवान बनला. संकटातही हसणाऱ्या, नाचणाऱ्या, गाणाऱ्या आदिवासींनी अतिशय निष्ठेने आणि विश्वासाने दिलेल्या प्राणांच्या आहुतीची ही महागाथा आहे.
‘जंगलाचे दावेदार’ कादंबरीला १९७९ मध्ये ‘साहित्य अकादमी’पुरस्कार मिळाला. अतिशय आनंदाने मुंडा आदिवासींनी महाश्वेतादेवींना मिदनापूरला बोलावलं. त्या सभेत एक आदिवासी म्हणाला, ‘‘समाजातील मुख्य धारेने आम्हाला कधीच स्वीकारलं नाही. आम्ही इतिहासात नव्हतो. परंतु तुमच्या लेखनाने आम्हाला स्वीकृती मिळाली.’’ पुरस्कार मिळाल्याच्या आनंदापेक्षा अधिक आनंद त्यांना आदिवासींची प्रसन्नता बघून झाला. महाश्वेतादेवींना वाटलं त्यांची आदिवासींबद्दलची जबाबदारी वाढली आहे. त्यांचं लेखन आदिवासींप्रमाणे दलितांवरही केंद्रित झालं.
महाश्वेतादेवी आपल्या साहित्यातून आदिवासींच्या अस्मितेचा प्रश्न पुन: पुन्हा पोटतिडिकीने मांडीत होत्या. ‘अग्निगर्भ’ कादंबरीच्या भूमिकेत शेतकरी, मजूर आणि शोषितांच्या संबंधात राजकारणाला जबाबदार मानून त्या म्हणतात. ‘‘माणसाचे अधिकार जतन करण्यासाठी अधिकार सार्थक करणं हा राजकारणाचा मुख्य उद्देश असायला हवा. माझा पक्षीय राजकारणावर विश्वास नाही. स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली परंतु अजूनही अन्न, पाणी, जमीन, कर्ज, बेगारी यामधून आदिवासी मुक्त झाले नाहीत. ज्या व्यवस्थेने त्यांना मुक्त केलं नाही त्याविरुद्ध, शुद्ध सूर्यासारखा क्रोध ही माझ्या लेखनाची प्रेरणा आहे. जेव्हा भागीदारी, अर्धेली यांसारख्या तिरस्करणीय प्रथा शेतकऱ्यांवर लादल्या जात आहेत, शेती करणाऱ्या मजुरांना योग्य मजुरी मिळत नाही की बीज, खत, पाणी, वीज मिळत नाही, त्यांचं अस्तित्व धोक्यात येतं, अशा वेळी सामंती हिंसेविरु द्ध हिंसाच केली तर काय आश्चर्य?’’ खरं तर ‘अग्निगर्भ’चा संथाल अग्निबीज आहे आणि अग्निगर्भ आहे सामंती-कृषी-व्यवस्था.
१९६७ मध्ये दार्जिलिंग जिल्ह्य़ातील नक्सलबाडी, खडीबाडी इत्यादी ठिकाणी एक संघटित सशस्त्र आंदोलन सुरू झालं, त्याचं नाव नक्षलवाद. ‘अग्निगर्भ’ कादंबरीत एक लहानसं गाव या मोठय़ा आंदोलनाशी जोडलं आहे. भारतातील ‘बंधुआ’ (बंदी) मजुरांच्या विद्रोहाचं चित्रण लेखिकेने केलं आहे. अर्धेली किंवा भागीदारी प्रथेच्या माध्यमातून जमीनदार तर कधी ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांचं शोषण करीत. संघर्षांनंतर भूमिहिनांसाठी कायदे बनवले, मजुरी ठरवली. परंतु उपयोग शून्य. कारण मजुरी देण्याची जबाबदारी सरकारची नव्हती. सरकार कम्युनिस्ट असो की काँग्रेस, कायद्याची अंमलबजावणी झालीच नाही. परिणाम विद्रोह. त्यांचा नायक आहे बसाई टूटू. बसाई टूटूला अनेकदा मारल्याची बातमी सरकार पसरविते. परंतु तो पुन्हा जिवंत होतो. तो मरता मरता जगत असतो. शेवटी आणीबाणीच्या वेळी मारला जातो. बसाईने संथालांना एकत्र करून आपल्या अधिकाऱ्यांसाठी सशस्त्र संघर्षांला तयार केलं होतं. पुन्हा कधीही शेतकरी मजुरांवर अन्याय, दमन, शोषणाचा राक्षस आक्रमण करील तेव्हा बसाई जिवंत होईल, असा कादंबरीचा आशय.
‘हजार चौरासी की माँ’ नक्षलवादी आंदोलनाची भयावहता व्यक्त करणारी कादंबरी आहे. १९७० मध्ये बंगालमध्ये नक्षलवादी आंदोलन सुरू झालं होतं. त्यामध्ये अनेक तरुणांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली. सुजाता आणि दिव्यनाथनचा मुलगा ‘वर्ती’ यांची ही कथा आहे. सुजाता मितभाषी, भावुक, धार्मिक हिंदू महिला आहे. आपल्या मुलाची काळजी घेताना तिने आपलं आयुष्य कुटुंबासाठी समर्पित केलं होतं. अचानक एक दिवस पोलीस कळवतात की ‘वर्ती’ मारला गेला आहे. सुजाता आणि दिव्यनाथ आपल्या मृत मुलाचं प्रेत ओळखायला जातात. पोलीस सांगतात ‘वर्ती’ नक्षली होता. पोलिसांच्या चकमकीत तो मारला गेला. सुजाताला आश्चर्य वाटलं, आपल्या मुलाशी ती कॉलेज, शिक्षण याबद्दल बोलत असे. परंतु तो नक्षली कधी झाला? मुलाच्या मृत्यूचा शोध घेताना ती त्याच्या प्रेयसीला भेटते आणि तिला त्याचे विचार समजतात. महाश्वेतादेवी म्हणतात, ‘‘शोक से भी बलवान है समय। शोक तट है तो समय सदा प्रवाहित होनेवाली गंगा। समय शोक पर बार – बार मिट्टी की परत चढाता जाता है। फिर प्रकृति के अमोघ नियम के अनुसार समय की परतों के नीचे दबे शोक पर अंकुर – सी उंगलियाँ उगती है।’’ अंकुर-आशा, दु:ख, चिंता और द्वेष के अंकुर! यातूनच सुजाताला स्वत:चाही शोध लागतो. सुजाताला नवी ओळख मिळते. ती ‘एक हजार चौऱ्याशींची आई’ होते.
अनेक वर्ष दक्षिण बिहार, बंगाल, ओरिसा, गुजरात आणि महाराष्ट्रातील आदिवासींसाठी त्या सतत काम करीत होत्या. त्या अनुभवातून त्यांना तीक्ष्ण दृष्टी आणि सामर्थ्य प्राप्त झालं होतं. त्यांनी आदिवासींच्या जीवनातील घटनांशी – इतिहास, मिथक आणि वर्तमान राजकारणातील यथार्थ यांचा मेळ घालून समाजातील मानवीय वेदना व्यक्त केली. म्हणूनच त्यांच्या कथांमधून समाजातील परस्परसंबंधांचं महत्त्व उलगडत जातं. त्यांच्या कथांच्या नायिका मेहनती, संघर्षरत आणि निर्भय आहेत. परंतु पुरुष सत्तेपुढे हतबल होताना दिसतात.
‘अग्निगर्भ’ आणि ‘द्रौपदी’ कथेची पात्रं आणि समस्या एकमेकांशी निगडित आहेत. द्रौपदी अतिशय निर्भय, हुशार आणि योग्य निर्णय घेणारी नक्सल आहे. द्रौपदी आणि दूलन, बसाई टूटूच्या विद्रोही आंदोलनात सामील असतात. दूलनला पोलिसांनी मारलं आहे. द्रौपदीलाही गोळी लागली आहे. ती बसाईची अंगरक्षक असल्याने तिची जिवंत किंवा मृत माहिती देणाऱ्यास अथवा जिवंत पकडून द्यायला मदत करणाऱ्यास सरकारने शंभर रुपये इनाम जाहीर केलं आहे. बसाईला पकडण्यासाठी द्रौपदीला पकडणं महत्त्वाचं होतं. जागरूक राहूनही पोलिसांनी तिला पकडलं आणि कॅम्पमध्ये घेऊन गेले. तिचे हात-पाय खुंटय़ाला बांधले होते. कमरेखाली तिला चिकट चिकट जाणवलं. ते तिचंच रक्त होतं. तिला समजलं योनीतून रक्तस्राव होतो आहे. स्तनांवर ओरखडे होते. तिला सरळ करायला किती माणसं? चार-पाच-सात. मग ती बेशुद्ध झाली. सकाळी शुद्धीवर आल्यावर साहेबासमोर नेलं गेलं. नग्नावस्थेत त्याच्यासमोर उभी राहून त्यांच्या शर्टावर थुंकून म्हणाली, ‘‘लाज वाटायला इथे कोणी पुरुषच नाही. तू कपडे उतरवू शकतोस, कपडे घालायची जबरदस्ती करू शकत नाही. आणखी काय करशील? कर ना काऊंटर, कर!’’ अधिकाऱ्याला आपल्या स्तनांनी ढकलत राहते. पहिला ऑफिसर नि:शस्त्र ‘टारगेट’समोर उभा राह्य़लाही घाबरतो. द्रौपदीच्या माध्यमातून लेखिकेने स्त्रीशक्तीची धग दाखविली आहे.
समाजातील अन्याय, शोषण, दु:ख त्यांना लिहायला प्रेरित करतं. म्हणूनच त्या आदिवासींच्या जवळ राहून त्यांचं जगणं अनुभवतात. ते विश्वासाने त्यांना ‘आई’ म्हणतात. त्यासुद्धा त्यांना म्हणतात. ‘‘तुम्ही राहता तशीच मी राहीन. मला आई म्हणता ना, मग त्याच हक्काने हे सांगते आहे.’’ त्यांच्यामधल्या आईने आदिवासींच्या मनात चेतना जागविली. त्या म्हणायच्या – ‘‘माझ्या मनात खूप वर्षांपासून या समाजासाठी वेदनेची ज्वाला धगधगते आहे, माझ्या चितेबरोबरच ती शांत होईल.’’
निवडक पुस्तके कादंबरी
जंगलाचे दावेदार, अग्निगर्भ, अक्लान्त कौरव, १०८४ की माँ, ग्राम बंगला, शालगिरह की पुकार पर, झाँसी की रानी, अमृतसंचय, नटी, उन्तीसवी धारा का आरोपी, भारत में बंधुआ मजदूर (वैचारिक)
कथा
कृष्णद्वादशी, पचास कहानिया, घहराती घटाएँ, ईंट के उपर ईंट, मूर्ति
ग्रंथसंपदा
१०० कादंबऱ्या आणि २० कथासंग्रह
chaturang@expressindia.com