समाजव्यवस्थेच्या तथाकथित उतरंडीवर खालच्या पायरीवर असणं आणि त्यातही स्त्री असणे हे आजही शोषणाचे कारण ठरत असेल तर समाज म्हणून सर्वार्थाने आपण किती बदललो याचा विचार करावा लागेल. पोट भरण्यासाठी मजुरी करत आईवडिलांना मदत करणारी मुलगी गावातल्या एका मुलाच्या सततच्या छळाने अस्वस्थ होते, परंतु जातपंचांच्या वाळीत टाकण्याच्या धमकीपोटी आत्महत्या करते आणि त्यानंतरही तिच्या आईवडिलांना बहिष्कृत आयुष्य जगायला लागते तेव्हा समाजाच्या संरक्षणासाठी असणाऱ्या सर्व यंत्रणांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते.
डोक्यावर देव्हारा घेऊन फिरणारी व अंगावर आसूड मारून दररोज भिक्षा मागून स्वत:ची उपजीविका करणारी एक भटकी जमात. कमरेभोवती रंगीबेरंगी कपडे गुंडाळून हातात आसूड, पायाला चाळ, कपाळावर हळदी- कुंकवाचा मळवट भरलेला पुरुष आणि त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या पत्नीच्या डोक्यावर देव्हारा, खांद्यावर ढोलकं. अनेकदा आपल्या मुलाबाळांसह ही जमात गावोगावी फिरत असते. या जमातीत आजही मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आणि अंधश्रद्धा आहेत.
याच भटक्या समाजातला ३८ वर्षांचा गंगा. पारंपरिक व्यवसायात भागत नाही म्हणून मोलमजुरी करून उपजीविका करतो. गंगाला चार मुली व दोन मुलं अशी सहा अपत्ये होती. मोठी मुलगी हेमा ही १७ वर्षांची. हेमाची आई संगी हीसुद्धा गंगासोबत मोलमजुरी करते. दोघांच्या मजुरीत भागत नव्हतं म्हणून हेमाही मजुरी करत होती. या समाजात जातपंचांचं मोठं वर्चस्व आहे. लोकं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जातपंचायतीचा आधार घेतात. जातपंचायतीत पंचांचा प्रमुख असलेल्या व्यक्तीस ‘पाटील’ म्हणून संबोधलं जातं. आणि त्यांना साहाय्य करणारी व्यक्ती म्हणजे सरपंच.आयुष्य असं जगताना गंगाच्या संसाराला अचानक खीळ बसली. जातपंचायतीचा प्रमुख काशिनाथचा पुतण्या राजू वारंवार हेमाची छेड काढू लागला, तिचा पाठलाग करून, अश्लील भाषा वापरून मानसिक छळ करू लागला. एवढंच नाही तर तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. तिने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. हेमाच्या आई-वडिलांनी राजूच्या वडिलांकडे, रामा यांच्याकडे तो तिला देत असलेल्या त्रासाविषयी तक्रार केली. यावर रामाने उलट हेमाच्या कुटुंबीयांनाच दमदाटी केली. दिवसेंदिवस राजू हेमाला जास्तच त्रास देऊ लागला. राजूच्या वडिलांकडे पुन्हा तक्रार केली असता, राजूच्या आई-वडिलांनी हेमा व तिच्या कुटुंबीयांना ‘जातीबाहेर काढू, गावात राहू देणार नाही, जीवे मारू’ अशी धमकी दिली. राजूचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता.
हेमा वसतिगृहात कामाला जात होती. तिथंही राजू जाऊन त्रास देऊ लागला. वसतिगृहातला शिपाई व हेमाच्या वडिलांनी पुन्हा राजूच्या वडिलांकडे तक्रार केली. त्यांना वसतिगृहातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगही दाखवले. त्यानंतर राजूच्या वडिलांनी हेमाच्या घरी येऊन हेमा व तिच्या कुटुंबीयांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. असभ्य भाषा वापरली. तसेच त्यांनी गंगाचे घर पेटवून देण्याची धमकीही दिली. भांडणं सुरू आहेत हे समजताच हेमा घरी आली. तिच्यासमोरही राजूच्या वडिलांनी शिव्या देऊन गंगाला मारहाण केली. ‘‘तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली, तर तुम्हाला वाळीत टाकू.’’ असेही म्हणाले. या सर्व गोष्टींचा हेमाला खूप त्रास होऊ लागला. त्यात भर म्हणजे राजूच्या वडिलांनी पूर्ण वस्तीतील लोकांसमोर केलेला अपमान, वापरलेली अश्लील भाषा, गावातून बहिष्कृत करतात की काय याची सततची भीती या सगळ्यांचा हेमावर प्रचंड ताण येऊ लागला.
कुटुंबाला बहिष्कृत केल्यास स्वत:चं लग्न तर होणार नाहीच, पण भावंडांचीही लग्नं रखडतील, सुख-दु:खात समाज तिच्या कुटुंबाला जवळ करणार नाही, नातेवाईक दुरावतील ही कल्पना तिला असह्य होत होती. हेमाच्या चुलत्याने आंतरजातीय विवाह केला म्हणून त्यांना, हेमाच्या आजी-आजोबांना जातपंचांनी वाळीत टाकले होते. हेमा बहिष्कृततेचे परिणाम जाणून होती. त्यामुळे ती पूर्णपणे खचली होती. एके दिवशी रात्री हेमा कुणाशीही काहीही न बोलता झोपी गेली. सकाळी रोजच्याप्रमाणे सगळे झोपेतून उठले तेव्हा त्यांना हेमा आढ्याला लटकलेली दिसली. तिने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. कुटुंबीयांच्या रडण्याचा आवाज ऐकूनही वस्तीतील कुणीही त्यांचे सांत्वन करण्यासाठी पुढे आलं नाही, कारण जातपंचांचा असलेला धाक!
हेमाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. या समाजाला मुळात कोर्ट-कचेरी, पोलीस ठाण्याची माहिती नाही. पोलीस ठाणे किंवा न्यायालयात गेल्यास जात बहिष्कृत करण्याची टांगती तलवार डोक्यावर! परंतु हेमाच्या कुटुंबाचं दु:ख मोठं होतं. त्या दु:खाने भीतीवर मात केली. हेमाचे कुटुंब पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निघालं.
परंतु जात पंचायतीचे पंच त्यांना पोलीस ठाण्यात जाण्यास अडथळा आणत होते. हेमाचे चुलते बाहेरगावी राहात होते. त्यांना हेमाच्या वडिलांनी तिच्या आत्महत्येची बातमी सकाळी सहा वाजता फोनद्वारे सांगितली होती. त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला फोन करून याविषयी कळवलं होतं. त्यानंतर ते गावी पोहोचले. जातपंचायतीचे पंच हेमाच्या कुटुंबीयांना भीती घालत होते, ‘‘तुम्ही पोलिसात फिर्याद दिली तर तुमच्या मुलीच्या मौतीला कोणीही येणार नाही.’’ जातपंचायत पाटील म्हणाला, ‘‘पोलीस केस केली तर तुमच्या मुलीचं मढं पोलीस ठाण्यासमोर पुरावं लागेल.’’ पण या कोणत्याही दडपणाला न जुमानता हेमाचे वडील व चुलत्यांनी पोलीस ठाण्याला फिर्याद दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. समाजबांधव कुणीही जवळ येत नव्हते. अखेर परगावावरून आलेले पाहुणे व परिचितांच्या मदतीने कुटुंबीयांनी हेमाचा अंत्यविधी केला. दुसऱ्या दिवशी वस्तीतच जातपंचायत बसली. बैठकीत हेमाच्या वडिलांना बोलावून घेतलं. जातपंचायतीचा बोलावण्याचा हेतूही त्यांच्या लक्षात आला होता, आलेलं फर्मान डावलता येणार नाही. म्हणून ते जातपंचांच्या बोलावण्यानुसार जातपंचायतीच्या बैठकीला गेले. बैठकीत समाजाचे पंच व पंचप्रमुख पाटील हजर होते. जातपंचांनी हेमाच्या वडिलांचं म्हणणं ऐकून न घेता आदेश दिला. ‘‘पोलीस ठाण्याला दिलेली तक्रार ताबडतोब मागे घ्या, तक्रार मागे न घेतल्यास वाळीत टाकलं जाईल, तुमच्या इतर मुलींची लग्नं होणार नाहीत.’’ हेमाच्या वडिलांवर जातपंचांनी दडपण आणून कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेतल्या. ‘तक्रार मागे घेत आहोत’, अशा आशयाचा मजकूर लिहून पंचांनी तो कागद पोलीस ठाण्यामध्ये नेऊन दिला.
इतकं करूनही त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं. गंगाच्या कुटुंबाची मोठी मानसिक कोंडी झाली होती. वस्तीत त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं की कोणीही संबंधही ठेवत नव्हतं. त्यामुळे गंगाची मुलंही एकटी पडली. बहिष्काराच्या सुमारे ७-८ महिन्यांनंतर गंगाने जातपंचांना जाब विचारला, ‘‘मी असा कोणता गुन्हा केला म्हणून मला जातीबाहेर टाकलं आहे?’’ तेव्हा जातपंचांनी गंगा व त्याची पत्नी संगी यांना मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही केला.
त्याच दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान हेमाच्या चुलत्याने मला दूरध्वनी करून सविस्तर माहिती सांगितली. मी संबंधित पोलीस ठाण्याला संपर्क केला. जातपंचांवर कारवाई करण्याबाबत लेखी पत्र पाठवलं. मी पुन:पुन्हा कारवाईबाबत विचारणा करत होते. पोलीस मात्र सांगत होते की, ‘फिर्यादीने तक्रार मागे घेतली आहे.’ एवढा गंभीर गुन्हा असताना पोलीस अशा प्रकारचे उत्तर देत होते. शेवटी आम्ही वरिष्ठांकडे तक्रारी पाठवल्या. वारंवार वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज पाठवले, भेटी घेतल्या. सतत आठ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर रामाविरुद्ध फिर्याद दाखल झाली.
त्याचा योग्य तो परिणाम झाला. आरोपी पाच दिवस पोलीस कोठडीत होते. एक महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला. हेमाचे कुटुंबीय गाव सोडून जवळच्या गावी राहायला गेले. कारण वस्तीत त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं. कुणी संबंध ठेवत नव्हतं. आम्ही शासकीय यंत्रणेसोबत वस्तीमध्ये बैठक घेतली. ‘सामाजिक बहिष्कार विरोधी’ कायद्याची जाणीव करून दिली. वस्तीवाल्यांनी एकमुखाने सांगितलं की, ‘गंगाच्या कुटुंबावर बहिष्कार टाकलेला नाही.’ आपली कायदा व्यवस्था, शासन व्यवस्था बहुसंख्यांवर विश्वास ठेवते. एकट्या गंगाच्या कुटुंबावर कोण विश्वास ठेवणार? गंगाच्या डोळ्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे. हेमा गेली, पण तिच्या पाठच्या बहिणींची लग्नं कशी होणार? आजही गंगा पोटाची खळगी भरण्यासाठी डोक्यावर देव्हारा घेऊन पत्नी-मुलांसह गावोगाव फिरतो आहे.
आरोपी जातपंचायतीचा पाटील व अन्य लोकांवर गुन्हा दाखल होऊन हेमाला न्याय मिळाला का? हेमाच्या जाण्यामागच्या कारणाचाही शोध घ्यावा लागेल. हेमाची होणारी छेडछाड, छळ, तिला त्रास देणारा मुलगा, त्याला पाठीशी घालणारं त्याचं कुटुंब व कुटुंबीयांना बळ देणारी जातपंचायतीची यंत्रणा खरं तर दोषी आहे. या भटक्या समाजातही ‘स्त्री ही उपभोग्य वस्तू’ ही मानसिकता अस्तित्वात आहे. त्याच मानसिकतेतून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराकडे बघितलं जातं व तिला बेदखल केलं जातं. दुसरा भाग म्हणजे आजही टिकून असलेली जातपंचायत व्यवस्था. या व्यवस्थेच्या नियमानुसार पोलिसात तक्रार करायची नाही. न्यायालयात जायचं नाही. गंगाने वेळीच पोलिसात तक्रार केली असती तर कदाचित हेमा वाचली असती.
ढीगभर कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा अनेकदा कचखाऊ धोरण स्वीकारते, असं अनेकदा अनुभवास येतं. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन असलेले कायदे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी गेलेल्या सर्वसामान्यांची दखल घेतली जात नाही. बऱ्याचदा त्यांनाच उलट जाब विचारला जातो. अनेक हेलपाटे मारावे लागतात. या सर्व त्रासांमुळे लोकं पोलीस ठाण्यामध्ये जाण्यासाठी टाळाटाळ करतात,असाही अनुभव येतो.
जिथं-जिथं जातपंचायती अस्तित्वात आहेत, तिथं तिथं जातपंच व प्रमुख हे धनाढ्य तर अन्य समाजबांधव अतिशय दरिद्री अशी बहुतांशी परिस्थिती आहे. अन्य समाजबांधव या जातपंचांपुढे दबून असतात. राजू जातपंच प्रमुखाचा पुतण्या असल्याने हेमाचा बळी गेला. या समाजाला सावरण्यासाठी शिक्षण, रोजगार, अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे. त्यासाठी मूठभर नाही तर ढीगभर कार्यकर्ते आणि अफाट शासकीय यंत्रणा कामाला लागणं आवश्यक वाटतं. एवढंच नाही तर सर्वसामान्यांतूनही कार्यकर्ते तयार व्हायला हवेत.
( लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)