सुषमा देशपांडे
‘‘संगीतबारी तमाशातील कलाकारांवर नाटक करायचं ठरल्यावर त्यांच्याशी संवाद साधणं सुरू झालं. त्या स्त्रियांचं जगणं, घराची आर्थिक जबाबदारी पेलणं, त्यासाठी आयुष्याला भिडणं, कमाल होतं सगळं. त्यांचं ते आयुष्य इतकं माझ्यामध्ये मुरलं की प्रयोगानंतर या वेश्या व्यवसायातल्या स्त्रिया मला विचारत राहिल्या, ‘‘सच बोल, तू कौनसे थिएटर की है?’’ त्यातूनच ‘तिच्या आईची गोष्ट, अर्थात माझ्या आठवणींचा फड’, ‘माय मदर, हर घरवाली, हर मालक आणि हिज वाइफ’ व ‘हम और तुम सब’ नाटकं रंगभूमीवर आली.’’
‘व्हय मी सावित्रीबाई’च्या प्रयोगाआधी मला तमाशातील स्त्रियांवर नाटक करावंसं वाटलं होतं. पत्रकार म्हणून काम करताना एका गावात हातावर शिक्का मारलेलं तिकीट काढून ढोलकी फड तमाशा पाहिला होता. गावात फडाचे ट्रक आल्यावर कांताबाई सातारकर ज्या प्रकारे कामाच्या सूचना देत होत्या, ते पाहून यावर काही करायला हवं असं वाटलं. अनेक कलाकारांशी बोलून ‘काही’ लिहिलंही. ते काही दिवसांनी पुन्हा वाचायला घेतलं तेव्हा ‘बकवास’ वाटलं. माझ्या मध्यमवर्गीय चौकटीतून मी त्यांचं जगणं पाहात होते. मी ते फाडून टाकलं.
‘सावित्री’च्या एका प्रयोगाच्या वेळी अचानक मनात आलं, ‘आमचं हे जगणं असं आहे. तुमच्या बापाचं काय गेलं?’ हा आत्मा हवा या लेखनाचा. हा राम बापट सरांच्या प्रशिक्षणाचा संस्कार होता. मी पुन्हा तमाशाच्या विषयाकडे वळले. या वेळी मात्र ठरवलं होतं, संगीतबारी तमाशातील स्त्रियांचा विचार करायचा. तमाशातील स्त्रियांना भेटायचं तर सुरुवात पुण्यातील ‘आर्यभूषण’ थिएटरपासून करू या, असं वाटलं आणि ‘आर्यभूषण’चे मालक मजीदशेट यांना भेटले. त्यांनी थिएटरमध्ये कधीही यायची परवानगी दिली.
हरिभाऊ नामक तबलजींची ओळख करून दिली आणि लावणी करणाऱ्या कलाकाराची माहिती सांगणं इत्यादीची जबाबदारी त्यांच्यावर दिली. रात्री थिएटर सुरू होत असे तेव्हा मी थिएटरवर जायला सुरुवात केली. ‘‘हा फड लावण्या चांगल्या करतो. ही ही लावणी करायला सांगा त्यांना.’’ हरिभाऊ माहिती द्यायचे. फक्त ५-१० रुपये देऊन मी लावणी करायला सांगायचे. लावणी करणाऱ्या त्या कलाकारांना दुसऱ्या दिवशी दिवसा भेटायला जायचं असं ठरवलं. कोणाचीच मुलाखत न घेता त्यांच्याशी गप्पा मारत माहिती घेऊ या, असंही मनात पक्कं होतं.
तमाशा थिएटरवरचा पहिला दिवस. लावण्यांतील अदाकारी वेड लावणारी होती. दुसऱ्या दिवशी थिएटरवरच फडाच्या जागेत गेले. कमाल सात्त्विक चेहऱ्याने नुकतीच देवळात जाऊन आलेली एक स्त्री मला ‘नमस्कार’ म्हणत बसायला जागा करत होती. माझे डोळे कालची कलाकार शोधत होते. काही क्षणानंतर माझ्या लक्षात आलं की, ही तीच आहे. चेहऱ्यावरून मी शांत होते, पण आतून चक्रावले होते. या शकुंतला भूमाकरांशी आजही माझा संवाद आहे.
यांच्यासह शकुंतला नगरकर, मोहना म्हाळून्गरेकर आणि चंदा म्हाळून्गरेकर यांच्याकडून आणि अनेकींकडून मी खूप शिकले. याच दिवसांत मी एकीला माझा नवरा विश्वास, चौफुल्याला काही मित्रांना घेऊन तमाशाला गेला असं सांगत होते. ती मला पुन:पुन्हा ‘‘त्यांना थिएटरवर जाऊ देऊ नका.’’ सांगत होती. मी हसत म्हणाले, ‘‘माझा विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर.’’ ती कमाल शांतपणे पण आत्मविश्वासाने म्हणाली, ‘‘आणि माझा आमच्या मुलींवर. गळाला लागले भाऊ तर मी काही करू शकणार नाही.’’ मी अवाक् झाले.
सुरुवातीपासूनच ‘मला तुमच्यावर नाटक करायचं आहे.’ हे मी त्यांना सांगितलं होतं. पण पहिले सहा महिने या स्त्रिया मोकळ्या होत नव्हत्या. ‘‘चहा पाज आणि फुटव हिला.’’ असं एकमेकींना तोंडातल्या तोंडात माझ्यासमोर सांगत. (मला हे नंतर समजलं.) हळूहळू संवाद सुरू झाले. ही तिच्याबद्दल बोले. ती हिच्याबद्दल. आजही त्यांना माहीत नाही कोण कोणाबद्दल काय काय बोललं आहे. आमच्यातला संवाद नंतर इतका वाढला की त्यांचे ‘मालक’ मला सांगू लागले. ‘‘ती चिडली आहे, तिला समजवा ना.’’ काही गोष्टी पुरुष वर्गाकडूनही समजत.
‘‘आमचं आयुष्य समजून घ्यायचं असेल, तर खासगी बैठक घ्या.’’ शकुंतला भूमकर म्हणाल्या. बापू करंदीकर या मित्राच्या मदतीने बैठक ठरवली. जुन्या लावण्या, एकेकीने पकडलेला ‘हिरो.’ त्यांनी पैसे खिशातून सहज काढावे म्हणून केलेली अदाकारी, ‘टायमिंग सेन्स’. अफाट अनुभव होता तो. मग मीच कोणाला तरी घेऊन थिएटरवर जाऊ लागले, एक पुरुष आणि अनेक स्त्रिया अशा बैठका पाहिल्या.
कोणी पुरुष नसेल तर अंजोर, माझा मुलगा असायचा ‘हिरो’ म्हणून. या स्त्रियांचं जगणं, घराची आर्थिक जबाबदारी पेलणं. त्यासाठी आयुष्याला भिडणं, कमाल होतं सगळंच. त्यांच्या आयुष्यातले समान धागे लक्षात घेऊन एक प्रातिनिधिक गोष्ट लिहायची ठरवली. चारच दिवसांत ही संहिता लिहून झाली. तमासगीर स्त्री आणि पत्रकार मुलगी यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्यावरच्या नाटकाला नाव दिलं, ‘तिच्या आईची गोष्ट, अर्थात माझ्या आठवणींचा फड.’
मी संहिता घेऊन ‘आर्यभूषण’वर गेले. सगळ्यांना बैठकीच्या खोलीत बोलावलं. त्यांचंच आयुष्य त्यांना वाचून दाखवलं. ‘‘काही चुकीचं लिहिलं असेल तर सांगा.’’ म्हणाले. एकजण म्हणाली, ‘‘बया, लैच समजलंय तुम्हाला आमच्याबद्दल.’’ ही दाद पुरेशी होती. ‘‘आता नाटक बसवायचं, तर थोडं गाणं शिका, थोडा नाच शिका तुम्ही,’’ असं त्यांचं सुरू झालं.
मग काय आप्पासाहेब इनामदारांचे पेटीवादक, मास्तर नित्यन्याय यांच्याकडे शिकायला जात होते. एक दिवस मी थिएटरवर गेले असता त्यांना म्हटलं, ‘‘तुमच्यावरच नाटक करायचं तर गाणं शिका, नाच शिका. खूप व्याप आहे.’’ त्यावर एक म्हणे, ‘‘हलक्यात समजू नका आम्हाला ताई.’’ कमाल हजरजबाबी आणि वास्तवाचं पूर्ण भान असलेल्या या कलाकार. त्यांच्यावर बोलेन तितकं थोडं आहे. एक कलाकार म्हणाली होती, ‘‘ताई, अधीमधी आमालाबी खचायला व्हतचकी. अशा येळी आता तुमच्या नाटकाला येणार आणि तुम्हाला स्टेजवर दावून सांगणार, ती स्टेजवर हाय ना ती मी आहे.’’ जगण्याची खोल ताकद शिकवली या सख्यांनी.
हा एकपात्री प्रयोग सांगलीच्या ‘संग्राम’ आणि ‘वेश्या अन्याय मुक्ती परिषद’(VAMP) या संस्थांच्या मीना शेशू आणि उज्ज्वला परांजपे यांनी ‘धंदा करणाऱ्या’ स्त्रियांच्या शिबिरासाठी ठरवला. प्रयोगानंतर या स्त्रिया विचारत राहिल्या, ‘‘सच बोल, तू कौनसे थिएटर की है?’’. मी लग्न झालेली, घर संसार मांडलेली स्त्री आहे, हे ऐकून या चक्रावल्या. याच ‘धंदा करणाऱ्या’ स्त्रियांसाठी मुंबईच्या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ संस्थेच्या बिशाखा दत्ताने एक शिबीर घेतलं होतं. चित्रपटातील वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या भूमिकांबाबत त्यात चर्चा झाली.
‘‘चित्रपटात दाखवतात तशा आम्ही नाही आहोत.’’ एक ठाम सूर होता या बायकांचा. ‘‘मग कशा आहात?’’ या चर्चेतून आपल्याच जगण्यावर नाटक करायचं ठरलं. या स्त्रियांसाठी नाट्यशिबिरं आयोजित केली. जी पुरुषांनी घेतली होती. वेश्या वस्तीतलं त्यांचं जगणं दिसेल अशी संहिता तयार केली गेली. ‘पृथ्वी थिएटर’ आणि बंगळूरुच्या ‘रंगशंकरा थिएटर’च्या तारखा ठरल्या, मात्र नाटक हवं तसं उभं राहात नव्हतं. शिबिरं घेणाऱ्या पुरुषांचं म्हणणं होतं, ‘‘नाट्य कलावंतांना घेऊन नाटक करूयात.’’ पण ते नाटक या स्त्रियांनाच करायचं होतं.
मीना शेशूने एक दिवस ‘‘तू हे नाटक बसवशील का?’’ विचारलं. नाटकातले संवाद सगळ्यांचे पाठ आहेत, हे लक्षात घेऊन मी होकार दिला. या नाटकात वेश्या आणि त्यांचीच मुलं अशी एकूण २४ जणं काम करत होती. मी ‘थिएटर ऑफ ओप्रेसड्’ची तंत्र स्वत: आगुस्तो बोआल यांच्याकडून शिकून आले होते. त्या तंत्रानं या कलाकारांशी संवाद सुरू केला. त्यांचं जगणं समजून घ्यायला सुरुवात केली. नेपथ्य आणि प्रकाशयोजना यासाठी प्रदीप वैद्याला बोलावून घेतलं. या स्त्रियांना लिहिता-वाचता येत नाही. मुलांनी सांगितलं आणि त्यांनी पाठ केलं. त्यामुळे सगळ्या एका तालात पाठ केलंय असं बोलत.
नाटक सुरू झालं की पूर्ण वेळ, ठरलेलं पात्र म्हणून वावरणं, समोरच्या पात्राचं बोलणं ऐकणं, रंगमंचावरच्या अदृश्य भिंतीतून हात आरपार न घालणं, लहान लहान गोष्टी शिकवणं गरजेचं होतं. कधी ‘‘मी तिला मावशी म्हणतो, तिच्यावर प्रेम कसं करू?’’ सारखा प्रश्न समोर येई, तर कधी ‘‘इकडून जायचं होतं पण जागा नाही दिली तर भिंतीतून जावंच लागेल ना? तिथं पोचायचं तर पुढच्या वाक्याला.’’ सारखी विधानं सुरू असतात. रंगमंचावर जास्त कलाकार कोण, कुठे आणि कसं पाहील, त्याचे लूक ठरवावे लागतात.
कलाकारांना त्यांच्याच आयुष्यातून, त्यांनीच सांगितलेली पात्रं समजावून सांगावी लागतात. उदाहरण द्यायचं झालं, तर शाळेत जाणाऱ्या मुलाची भूमिका करणारी स्त्री, तिला तिच्या शाळेतले वाईट प्रसंग आठवून दिले, मग ती जी काय कमाल ऊर्जेनं बोलायला लागली की सगळेच चक्रावले. वेगळंच आव्हान होतं ते. त्यात सगळे एका समुदायामधले, कोणाचं कोणाशी सख्य, तर कोणाशी भांडण. मुलांना सतत दंगा करायचा असे. तसंच रंगमंचावर उभं राहाणं, चालणं याचं सूत्र शिकवणं आणि ध्वनी प्रक्षेपण शिकवण्याची पद्धत त्यांना समजेल तशी सांगणं, कस लागायचा. पात्र समजून घेताना शिकवायला.
मी मीनाच्या घराच्या ओट्यावर कलाकारांसाठी ‘सावित्री’चा प्रयोग केला. त्याआधी नेहमी मी ‘माझ्या अभिनयावर नाही, विषयावर बोलायचं आहे’, असं सांगते. इथे ‘‘आता आपण माझ्या अभिनयावर बोलूयात’’ म्हटलं. चर्चा सुरू झाल्या. ‘‘तुम्ही जे जे पात्र करता तेच वाटता.’’
‘‘ का वाटतं?’’ या गप्पांचा उपयोग पात्र समजून घेण्यासाठी झाला.
अंधारात रंगमंचावर पडद्यासारख्या बदलण्याच्या गोष्टींची तालीम घेऊनही जबरदस्त ताण यायचा मुलांना. सर्व प्रयोग ‘हाउसफुल’ झाले. नंतरच्या चर्चा हा मोठा विषय असायचा. शांता गोखले या मैत्रिणीमुळे ‘पृथ्वी’च्या प्रयोगाला सत्यदेव दुबे आले.
‘‘तुम्ही इतरांना आनंद द्यायचं काम करता, इथे तुम्ही मला किती आनंद दिलात माहीत आहे का?’’ ते म्हणाले. या नाटकाचं नाव होतं, ‘माय मदर, हर घरवाली, हर मालक आणि हिज वाईफ.’ याच संस्थेसह, ‘हम और तुम सब’ हे दुसरं नाटक त्यांना लिखाणाची मदत करण्यापासून केलं. यात रवी सावंतने नेपथ्य आणि प्रकाशयोजनेसाठी मदत केली. यात विखुरलेल्या या स्त्रिया एकत्र कशा आल्या आणि कशा शिकल्या हा प्रवास होता. ‘आविष्कार’ संस्थेने या नाटकाचा महोत्सवात प्रयोग केला. कोणी मला, ‘‘पोलीस बंदोबस्तात तालीम घेतलीस का?’’ अशा सारखे प्रश्न विचारले. माणसासारख्या माणूस असणाऱ्यांपासून भय कसलं? मला कळलंच नाही त्याचा अर्थ.
तमाशातल्या स्त्रिया कलेचा व्यवहार करतात. वेश्या जी सेवा देतात त्याचा व्यवहार करतात. जगण्यासाठी व्यवहार अटळ आहे हे सत्य या पुरुषप्रधान जगात या स्त्रिया पुरुषांबरोबर व्यवसाय करत शिकवत राहतात.
सुषमा देशपांडे | sushama.deshpande@gmail.com