वर्षां राजहंस
‘लोकसत्ता’नं दिलेल्या या विषयावर विचार करता करता मी गेल्या ४-५ वर्षांचा आढावा घेतला. २०१८ पर्यंत माझं आयुष्य सर्वसाधारणपणे, सुरळीत चालू होतं. २०१९ हे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. निवांत चालणारं आयुष्य ढवळून निघालं. आणि तेव्हाच मला माझ्या आयुष्याचं ‘इकिगाई’ (जपानीत दीर्घायुषी, आनंदी, निरोगी आयुष्याचं रहस्य) सापडलं! हा सगळा प्रवास नवीन काही शिकण्याचा होता. थोडा अवघड खरा; पण त्यानं आत्मविश्वास दिला.
२०१९ मध्ये मी ज्येष्ठांसाठी असणारी एक कार्यशाळा केली होती. त्या कार्यक्रमात डॉ. मंगला जोगळेकर यांच्याशी माझी भेट झाली. मंगला जोगळेकर यांची लेखमाला ‘चतुरंग’मध्येच ‘स्मृती आख्यान’ या नावानं प्रसिद्ध होत होती. त्या अल्झायमर आणि डिमेन्शिया या आजारांबाबत पुण्यात काम करतात. मेंदूचं आरोग्य जपण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या विचारातून ‘मेमरी क्लब’ची संकल्पना तयार झालीय. त्या ‘मेमरी क्लब’चा मी भाग झाले. क्लबला जागा मिळवण्यासाठी बराच खटाटोप करावा लागला. जागा मिळाल्यावर क्लबसाठीच्या नवीन नवीन ‘एक्सरसाईज’साठी सतत काही शोध घेणं, लोकांना भेटणं, क्लबचं महत्त्व पटवून देणं, या सगळय़ातून मी खूप शिकत गेले.
याच्या पुढचा टप्पा होता करोनाच्या टाळेबंदीत नवीन तंत्रज्ञानाशी जमवून घेणं. तेव्हा ‘गूगल मीट’, ‘झूम’ हे वापरायला शिकले. तेव्हाच मला ऑनलाइन खरेदी करणं जमू लागलं. हे सर्व माझ्या मुलांच्या सहकार्यानं होत गेलं. मुलंही न कंटाळता ‘ऑनलाइन’च शिकवत गेली. सुदैवानं माझ्या सगळय़ा गोष्टींना मुलांनी आनंदानं, सक्रिय पाठिंबा दिलाय आजपर्यंत. ‘आता तुला काय करायचं आहे शिकून?’ असं म्हटलं नाही. मला आत्मनिर्भर केलं.
टाळेबंदीत प्रत्यक्ष ‘मेमरी क्लब’ बंद झाल्यावर मी व्हॉट्सअॅपवर मेमरी क्लब सुरू केला. त्या वेळी व्हॉटस्अॅप ग्रुप कसे तयार करायचे, पाठवलेले एक्सरसाईज ‘सेव्ह’ कसे करायचे, गूगल डॉक्स, वर्ड, पीडीएफ, या सगळय़ा गोष्टी माहिती करून घेतल्या. नंतर इतरांनाही शिकवल्या. दुसऱ्यांना शिकवल्यामुळे मला मिळालेली माहिती पक्की झाली.
हे चालू असतानाच नवीन लोकांशी संभाषण करणं, लोकांना सांभाळून घेणं, नवीन गट तयार करणं, नवीन लोकांशी एक बंध तयार करणं, त्यांना ‘कम्फर्टेबल’ वाटेल अशा प्रकारे आपलं बोलणं ठेवणं, अशा गोष्टीसुद्धा मला शिकता आल्या. न कंटाळता त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं द्यायला शिकले. लेखनही करू लागले. ‘मेमरी क्लब’ आता सर्वाना आवडायला लागला आहे आणि त्याचं कामही झपाटय़ानं वाढतं आहे. पुण्यात व्हॉटस्अॅप गटांचं स्नेहसंमेलनही पार पडलं. सर्वजण एकमेकांना भेटण्याच्या ओढीनं आले होते. प्रत्यक्ष जरी ओळख नसली तरी ‘मेमरी क्लब’च्या परिवाराशी सगळे ऑनलाइन जोडले गेले होते.
मेंदूच्या आरोग्यासाठी इतर गोष्टींबरोबर नवीन भाषा शिकणं, नवीन छंद जोपासणं, हेही आवश्यक आहे, हा विचार करून मी गेल्या वर्षी जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगते, इतकं छान वाटलं ना मला ते करताना! जर्मन भाषेची गोडी लागली. त्याचा अभ्यास मनापासून, शाळेत जसा आपण अभ्यास करायचो, तसा करायला लागले.
‘मेमरी क्लब’च्या कामात माझं गुंतलेपण वाढत होतं. नवीन कल्पना सुचत होत्या आणि त्या आम्ही राबवत गेलो. या सर्व प्रक्रियेत आत्मविश्वास वाढला. आपल्याला अजूनही नवीन काही शिकता येऊ शकतं, याचा आनंद झाला.
साठीनंतर आपण मेंदूचा वापर खूप कमी करायला लागतो. त्यात टीव्ही, मोबाईलमुळे आपलं वाचन, एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क, हे सगळं कमी झालेलं आहे. या सगळय़ा गोष्टींचा आपल्या मेंदूच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो, हे आपल्या कुणाच्याही लक्षात येत नाही. प्रत्यक्ष भेटीगाठी, एकमेकांचे अनुभव जाणून घेणं, एकमेकांकडून शिकणं आणि जिथे लागेल तिथे नवं तंत्रज्ञानसुद्धा वापरणं, असा समन्वय साधला, तर मात्र अनेक वर्ष आपण मेंदूनं ‘तरुण’ राहू शकू, अशी खात्री या शिकण्याच्या प्रवासात वाटू लागली.
varsha.rajhans@gmail.com
