साधना तिप्पनाकजे
आत्मविश्वास आणि आपल्या गावासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या प्रबळ इच्छेने तुळसाबाई धडाडीने कामं करू लागल्या. लोकांना रेशनवर चांगल्या दर्जाचं धान्य वेळेवर मिळू लागलं. विविध शासकीय योजनांपासून तुळसाबाईंच्या गावातले गरजवंत कोसो दूर होते. तुळसाबाईंना जसजसं योजनांबद्दल कळू लागलं, तसं त्या सर्व गरजवंतांपर्यंत घरकुल, शौचालय, वीजपुरवठा या पायाभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवू लागल्या. म्हसणजोगी समाजातून आलेल्या, नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली तालुक्यातल्या आळजापूरच्या सरपंच तुळसाबाई संकवाड यांच्याविषयी..
भारतीय समाजव्यवस्थेत अनेक जाती-जमाती आहेत. त्यातलाच एक म्हसणजोगी समाज. एकेकाळी गावकुसाबाहेर राहणाऱ्या या म्हसणजोगी समाजानेही काळाच्या ओघात बदल घडवत नेले. आज त्याच समाजातील एक स्त्री थेट सरपंचपदावर विराजमान होऊन गावाला प्रगतीच्या दिशेने नेते आहे. त्या आहेत, नांदेड जिल्ह्य़ातील बिलोली तालुक्यातल्या आळजापूरच्या सरपंच तुळसाबाई संकवाड. आरक्षण असेल म्हणून या बाई सरपंच झाल्या, इतकं ते सोपे नाही. ‘भिकाऱ्याचं गाव’ अशी ओळख असलेल्या वस्तीतल्या अशिक्षित तुळसाबाई, पुण्या-मुंबईतील कार्यशाळेत अत्यंत आत्मविश्वासाने आणि परखडपणे बोलतातच, पण त्यांनी गावच्या कारभारावर आपली वेगळी मोहोर उमटवलीय. विशेष म्हणजे, तुळसाबाई सरपंच झाल्यावर त्यांच्या वस्तीतल्या जातपंचायतीच्या वर्चस्वाचं प्रमाण खूप कमी झालं आहे.
म्हसणजोगी समाज मराठवाडय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात आढळतो. भटक्या-विमुक्त वर्गात हा समाज येतो. स्मशानभूमी किंवा स्मशानभूमीच्या आसपास राहायचं. चितेवरील मृतदेह पूर्ण जळेपर्यंत त्याची देखरेख करायची, अशी कामं हा समाज करतो. मृतदेहावर वाहिलेले पैसे गोळा करणे, मृतांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या धान्यांवर, कपडय़ांवर हे लोक आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. यासोबतच गावात भिक्षाही मागतात. भिक्षेकरता गावं ठरलेली असतात. काही गावांमध्ये अंधश्रद्धांमुळे या समाजातील लोकांविषयी भीती असते. तर काही गावांमध्ये नवीन पीक आलं, की एखाद्या म्हसणजोगी कुटुंबाला पिशवीभर उत्पन्न देण्यात येतं. नवीन धान्य आलं की, या कुटुंबांना बोलावणं करतात. समाजातील महिला तुळजाभवानीला जायचं असं सांगून तेल, पीठ वगैरे जिन्नस मागतात. या भिक्षेतला काही भाग देवीला अर्पण करून उरलेला घरी आणतात. आत्तापर्यंत स्मशानात राहत असल्यामुळे, वेगळ्या वेशभूषेमुळे, अस्वच्छ राहणीमानामुळे इतर समाज त्यांना टाळत आला होता. त्यामुळे कामे मिळत नाहीत. घरात खाणारी पोटं खूप, पण हाताला काम नाही. त्यामुळे मागून खाण्याचाच पर्याय त्यांच्यासमोर असतो.
या कुटुंबांच्या हलाखीच्या परिस्थितीची कल्पना आपण क्वचितच करू शकतो. आता सरकारी मदतीमुळे त्यांच्या परिस्थितीत थोडा फरक पडू लागलाय. पण तरीही या समाजात शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे. आपल्या समाजातील इतर लोकांप्रमाणेच गावात जाऊन भिक्षा मागून खाण्याचं काम तुळसाबाईही करायच्या. लोकांच्या घरातून मिळणाऱ्या भिक्षेवरच त्या त्यांचं आणि पाच लेकरांचं पोट भरत होत्या. जोडीला कधी मिळालं तर मजुरीचं काम असायचं. त्यांचं गाव आंध्र प्रदेश सीमेपासून जवळ आहे. त्यांचे पती खटपट करून आंध्र प्रदेश मधल्या एका तांदळाच्या मिलमध्ये कामाला लागले. गावातली वस्ती हेच त्यांचं जग होतं. आळजापूर गावात त्यांच्या समाजाची ९० मतं आहेत. आरक्षणामुळे त्यांचे वडील आणि मामा एकदा ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. परंतु प्रस्थापित सांगतील तिथं ‘अंगठा लावायचा’ इतकंच त्याचं काम. साठ रुपयांचं मानधन मिळणं एवढंच त्यांच्यासाठी सदस्यपदाचा अर्थ होता. आरक्षण, ग्रामपंचायत सदस्य म्हणजे काय? हे त्यांना कधीच कळलं नाही. कोणत्याही निवडणुकीच्या काळात वस्तीवर मत मागायला लोकं यायची. तेवढाच काय तो मुख्य प्रवाहातल्या लोकांशी संबंध.
नांदेडमध्ये पंचफुला वड्डे यांची बालकामगारांकरता शाळा होती. त्या वेळी आळजापूरमधल्या या वस्तीतल्या मुलांकरताही वड्डे पतीपत्नींनी शाळा भरवणं सुरू केलं. या वस्तीतल्या लोकांना शासकीय योजना सांगितल्या आणि कागदपत्रं, जातीचे दाखले काढण्यास मदत केली. त्या वेळी तुळसाबाईंना प्रश्न पडू लागले. एवढय़ा सगळ्या योजना आहेत, मग कोणतीही योजना आली तरी त्यांच्यापर्यंत का पोचत नाही? घरकुल, रस्ते, पाणीपुरवठा आपल्या वस्तीपर्यंत का येत नाही? वीज नाही, रेशन नाही. आपल्याबाबतीत असं का होतं? त्यांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट, त्यातून मनात येणाऱ्या प्रश्नांना हळूहळू वाचा फुटू लागली. पंचफुलाबाईंच्या सततच्या भेटीनंतर तुळसाबाईंच्या विचारांमध्येही हा स्पष्टपणा अधिक येऊ लागला. २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याचं त्यांना समजलं. या वेळचं सरपंचपद भटक्या-विमुक्त जमातींकरता राखीव असल्याची माहितीही त्यांच्यापर्यंत पोचली.
या माहितीचा योग्य तो वापर करायचं, असं त्यांनी ठरवलं. तो आपला हक्क आहे. गावाची सत्ता पिढय़ान्पिढय़ा एकाच घरातल्या लोकांकडे होती. तुळसाबाईंनी उमेद दाखवली आणि निवडणुकीचा अर्ज भरला. पण त्यांच्या पतीचा नकार होता. त्यांचं म्हणणं होतं की, ‘‘हजार भानगडी होतील. लोकं हसतील. तुला कुणीही निवडून नाही देणार.’’ तुळसाबाईंनी त्यांना उत्तर दिलं, ‘‘सावित्रीबाईंनाही लोक हसले होते. पण महात्मा फुलेंनी माघार नाही घेतली.’’ तुळसाबाईंच्या या पवित्र्यानंतर त्यांच्या पतीने विरोध केला नाही, उलट त्यांच्यासोबत ते खंबीरपणे उभे राहिले. तुळसाबाईंना त्यांच्या समाजातील इतर लोकांचीही साथ मिळाली. गावकारभारात विकासाची आस असणाऱ्या गावातील लोकांनीही त्यांना साथ दिली आणि तुळसाबाई गावच्या सरपंचपदी निवडून आल्या.
तुळसाबाई निवडून आल्या खऱ्या, पण पुढच्या कामांचं काय, कारण त्यांना लिहितावाचता तर येत नव्हतं. ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत. तुळसाबाईंनी गावातल्या कामांची माहिती घ्यायला सुरू केली. सुरुवातीला खूप जड जात होतं, कारण ग्रामपंचायतीशी कधी संबंधच आला नव्हता. तुळसाबाई माजी सरपंचांना कारभाराविषयी विचारू लागल्या, पण हाती फार काही लागलं नाही. इतर सदस्य आणि ग्रामसेवकाला तुळसाबाईंनी विश्वासात घेतलं. ‘आपण मिळून कारभार केला तरच गावात काहीतरी कामं होऊ शकतात,’ हे पटवून दिलं.
ग्रामसेवक तुळसाबाईंना शासकीय कागदपत्र वाचून दाखवू लागले. तुळसाबाईंची मुलं शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत. त्यांचीही त्यांना मदत होऊ लागली. त्या प्रत्येक कागद तीन-चार वेगवेगळ्या व्यक्तींकडून वाचून घेतात. काही शंका आली तर लगेच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना भेटतात. पूर्वी सगळा कारभार लपूनछपून होत असे. आता उघडपणे कामं होऊ लागली. झालेली कामं आणि योजनांची रक्कम वेळच्या वेळी ती कामे पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांच्या, पुरवठादारांच्या खात्यात जमा होऊ लागली. पूर्वीच्या कारभारात कामं फक्त कागदावर होताना दिसत असत. मात्र तुळसाबाईंनी तो कारभार बदलला. आत्मविश्वास आणि आपल्या गावासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या प्रबळ इच्छेने त्या धडाडीने कामं करू लागल्या. गावातले रस्ते बांधले, शाळेला संरक्षक भिंत, शुद्ध पाण्याचा पुरवठा ही कामं वेळेत आणि चांगल्या दर्जाने तुळसाबाईंनी पूर्ण करवून घेतली. लोकांना रेशनवर चांगल्या दर्जाचं धान्य, वेळेवर मिळू लागलं. विविध शासकीय योजनांपासून तुळसाबाईंच्या गावातले गरजवंत कोसो दूर होते. राहायला धड छप्परच नाही तर वीज तरी कुठून असणार? तुळसाबाईंना जसजसं योजनांबद्दल कळू लागलं, तसं त्या सर्व गरजवंतांपर्यंत घरकुल, शौचालय, वीजपुरवठा या पायाभूत सुविधा पोचवू लागल्या. त्यांच्या समुदायातील लोकांचीसुद्धा कागदपत्रं त्यांनी पूर्ण करून घेतलीत. त्यांच्या घरकुलांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे. स्वत: तुळसाबाईही पत्र्याच्या घरात राहतात. लोक म्हणतात, ‘‘कार्यकाळ संपत येईल आता. घरं कधी मिळणार?’’ त्या सर्वाना धीर देतात. आता तुळसाबाई घरोघरी भिक्षा मागायला जात नाहीत. त्यांनी त्यांच्या गावातल्या समुदायाचीही समजूत घातली, त्यामुळे तरुण वर्ग भिक्षा मागायला जात नाही. काही वृद्ध माणसं परंपरा म्हणून भिक्षा मागतात.
लिहितावाचता येत नाही ही एक मोठी अडचण तुळसाबाईंना अजूनही जाणवते. गावातील काही लोक आणि त्यांच्या समुदायातीलही काही लोक त्यांना विरोध करतात. तरीही त्या सतत काम करतच राहतात. कारभार करताना त्या लोकांना प्रत्यक्ष भेटून कामाचे महत्त्व समजावून सांगतात. त्यांचा पाठिंबा मिळवून त्यांनाही कारभारात सहभागी करून घेतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता वाढते. पण एखाद्या गोष्टीला जास्तच विरोध होत असेल, तर तुळसाबाई संबंधित शासकीय अधिकाऱ्याला गावात बोलावतात. अधिकारी आणि गावकऱ्यांचा मुक्त संवाद आयोजित करतात व त्यातून मार्ग निघतो. अशा प्रकारे त्या ही कोंडी फोडतात. प्रत्येक कामाच्या ठिकाणी त्या स्वत: उभ्या राहतात आणि कामं करवून घेतात. तुळसाबाई निवडून आल्यावर त्यांनी गावात महिलासभा आणि ग्रामसभा सुरू केल्या. या सभांना गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पण आसपासच्या गावांमध्ये महिलासभा, ग्रामसभा आणखी सक्षम व्हायला हव्यात असं त्या म्हणतात. उपसमित्यांनाही शासनाकडून प्रशिक्षणाची गरज असल्याचं मत त्या व्यक्त करतात. आपला गाव आदर्श गाव म्हणून ओळखला जावा हे त्यांचं स्वप्न आहे, पण निवडणुकीचा पाच वर्षांचा काळ कामाकरता कमी आहे असं त्यांना वाटतं. ‘महिला राजसत्ता आंदोलन’ आणि नांदेडमधील ‘संकल्प ग्राम विकास संस्थे’कडून तुळसाबाईंना प्रशिक्षण दिलं गेलं. आताही त्यांना या दोन संस्थांकडून विविध प्रकारची माहिती आणि मार्गदर्शन मिळतं.
आपली बोलीभाषा आणि मराठीचा संगम करून तुळसाबाई खूप उत्साहाने, भरभरून बोलतात. त्यांच्या वाणीत गोडवा आहे. व्यासपीठावर व्यक्त होणाऱ्या किंवा समोरासमोर गप्पा मारणाऱ्या तुळसाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाने प्रत्येक जण भारावून जातो. आमच्या गप्पांच्या शेवटी तुळसाबाई म्हणाल्या, ‘‘एवढा त्रास सहन केला, वणवण केली. पण त्यातुलनेत पंचायतीचा कारभार सोपा आहे एकदम!’’
सौजन्य – तुळसाबाईंची बोलीभाषा समजून घेण्याकरता ‘संकल्प ग्राम विकास संस्थे’च्या अध्यक्षा आणि धुप्पा गावच्या उपसरपंच पंचफुला वड्डे यांची मदत झाली.
sadhanarrao@gmail.com
chaturang@expressindia.com