आजही काही समाजातील प्रथेप्रमाणे लग्नात मुलींना कौमार्य चाचणीच्या विधीला सामोरं जावं लागतं. नेहालाही या विधीला सामोर जावं लागलं, या वेळी जातपंचांनी तिला शीलभ्रष्ट ठरवून तिचं लग्न रद्द केलं. मात्र ‘महिला आयोगा’ची साथ, ‘अंनिस’चा आधार आणि कर्तव्यदक्ष पोलिसांच्या मदतीमुळे कोंडी फुटली आणि तिचा संसार सुरळीत सुरू झाला…
संघटनेच्या कामानिमित्त मी आमच्या जवळच्याच एका गावात गेले होते. काम संपवून घरी परतले तोच चळवळीतील सहकारी कृष्णा चांदगुडे माझ्या घरी आले. दुपारची वेळ. चांदगुडे मला म्हणाले, ‘‘आपल्याला एका ठिकाणी जाऊन यायचंय. प्रकरण गंभीर आहे. त्यांनी घटना थोडक्यात सांगितली. संगमनेरपासून चार किलोमीटर अंतरावरील एका छोट्या गावात आम्ही पोचलो.
तिथल्या एका तरुणीचं नेहाचं, लग्न होऊन चार दिवस उलटून गेल्यावरही घरासमोर लग्नमंडप तसाच होता. आम्ही नेहाच्या घरात प्रवेश केला. घरात ती, तिचे आईवडील, दोन बहिणी, भाऊ, काका चिंताक्रांत चेहर्याने खाली मान घालून बसले होते. आम्ही आमची ओळख करून देत घडलेल्या प्रकाराची माहिती विचारली तर नेहा व तिचे आई-वडील ढसाढसा रडायला लागले. नेहाला व तिच्या आईवडीलांना आम्ही शांत केलं. ‘‘आम्ही तुम्हाला मदत करू,’’ असा विश्वास दिला. नेहाने संपूर्ण घटना आम्हाला सांगितली.
विकासशी नेहाचं लग्न ठरलं. विकास घटस्फोटित होता. नेहा महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. पोलीस खात्यात नोकरी करण्याची तिची तीव्र इच्छा होती. उंच, धडधाकट, चुणचुणीत – पोलीस खात्यास योग्य असं नेहाचं व्यक्तिमत्व. दिसायलाही देखणी होती. नेहाचे वडील मोलमजुरी करून कुटुंब चालवत होते. तिच्या पाठच्या दोन बहिणी होत्या. तिघीही बहिणी लग्ना योग्य वयाच्या होत्या. याचंच नेहाच्या वडीलांना मोठं दडपण होतं. त्यांनी नेहाचं लग्न ठरवलं. नेहाचा व्यायाम, शैक्षणिक अभ्यास, पोलीस भरतीच्या दृष्टीने तयारी सुरूच होती.
लग्नाचा दिवस उजाडला. जातपंचही लग्नास रीती रिवाजाप्रमाणे हजर होते. जात पंचांचा मानपान झाला. प्रथेप्रमाणे सर्व विधी होऊन लग्न लागलं. त्यानंतर मुख्य (?) विधी सुरू झाला, ‘कौमार्य चाचणी’.
प्रथेप्रमाणे नेहाच्या अंगावरचे सर्व दागिने उतरविण्यात आले. दोन स्त्रियांनी नेहाला घरातील पुढच्या बाजूस असलेल्या एका खोलीत नेलं. नेहाची नखं तर वाढलेली नाहीत ना? अंगावर काही धारदार वस्तू तर लपवली नाही ना? नेहाची संपूर्ण तपासणी केली. तपासणीनंतर स्त्रिया खोलीतून बाहेर पडल्या. त्यानंतर विकास खोलीत आला. त्याच्या हातात सव्वा मीटर पांढरा कपडा होता. विकासने दरवाजा बंद केला.
बाहेर पंच मंडळी रिंगण करून बसली होती. पती-पत्नी खोलीत होते. त्यांच्या प्रथम समागमा वेळी बिछान्यावर पांढरा कपडा अंथरण्यात आला. काही वेळाने विकास पांढरा कपडा घेऊन खोलीच्या बाहेर पडला. पंचांनी विकासला विचारलं, ‘‘माल खरा की खोटा?’’ विकासने पांढरा कपडा पंचांना दाखवत उत्तर दिलं, ‘‘माल खोटा’’.
जातपंचांनी त्याच बैठकीत नेहाचं लग्न रद्द केलं. पंचांच्या दृष्टीने नेहा शील भ्रष्ट होती, चारित्र्यहीन होती. विकास व आलेले वर्हाडी त्यांच्या गावी नेहाला न घेताच निघून गेले. जाताना नेहाच्या वडीलांनी दिलेलं सर्व सामान व नेहाला लग्नात आलेल्या भेटवस्तू, दागदागिने घेऊन गेले. नेहाच्या आई-वडीलांनी, नेहाने विकासची व त्याच्या कुटुंबियांची खूप विनवणी केली. नेहा ते जाईपर्यंत म्हणत होती, ‘‘मला घेऊन जा’’ परंतु कोणीही तिचं ऐकून घेतलं नाही. सर्व नातेवाईक, जात बांधव निघून गेले. त्यानंतरही नेहाने विकासला वारंवार फोन करून ‘‘मला नांदायला ने’’अशी विनंती केली. विकासने प्रतिसाद दिला नाही. चार दिवस नेहाच्या घरात स्वयंपाक झाला नाही.
नेहाचं कथन ऐकून एकाच वेळी चीड, संताप, दु:ख या सर्व भावना मनात दाटून आल्या. मे महिन्यातली ती दुपार. बाहेर रखरखीत ऊन आणि नेहाचं डोंगराएवढं दु:ख. नेहा आमच्याशी बोलत असतानाच तिच्या बहिणीने आमच्यासाठी दोन सरबताचे ग्लास आणले. एवढ्या दु:खी वातावरणातही ते माणुसकी विसरले नव्हते. आम्ही नेहा व तिच्या आई-वडीलांना ‘‘आपण पोलीसांत तक्रार देऊ,’’ असं सांगीतलं.
तेव्हा तिचे वडील म्हणाले, ‘‘आम्ही पोलीसांत तक्रार केली तर पंच आमच्या कुटुंबाला वाळीत टाकतील, आमच्या इतर मुलींची लग्नं होणार नाहीत.’’ नेहा आणि तिची आई तक्रार करायला तयार होत्या. आम्ही नेहा व तिच्या कुटुंबियांचं सांत्वन करून, त्यांना मदतीचं आश्वासन देऊन बाहेर पडलो. डोक्यातून नेहाचा विचार जात नव्हता.
स्त्री सन्मान, स्त्री सक्षमीकरण, स्त्री मुक्ती हे शब्द, या संकल्पना केवळ बोलण्या-वाचण्यासाठीच असतात की काय असं यासारख्या घटना बघून वाटतं अनेकदा. पहिली बायको सोडून दुसरं लग्न करणारा विकास पवित्र. प्रथम समागमाच्या वेळी तिच्या योनितून रक्तस्राव झाला नाही म्हणून ‘ती’ अपवित्र? हे आजच्या काळातही चालत आहे, याचं वाईट वाटतं.
एकेकाळी समाज अडाणी, अशिक्षित होता. विज्ञानाचे शोध लागले नव्हते. आज वैद्यकशास्त्र पुढे गेलं आहे. मुली शिकतात, वेगवेगळे व्यायाम करतात, सायकल चालवतात. व्यायामामुळे किंवा सायकल चालवण्यामुळे योनि मार्गातील पडदा फाटतो, हे आता सिद्ध झालं आहे. मात्र इथे महत्त्वाचा मुद्दा हा की स्त्रियांसाठी कौमार्य चाचणी मग पुरुषांसाठी काय?
जातपंचायतीकडून उगारलं जाणारं बहिष्काराचं शस्त्र, समाजाकडून होणारी कोंडी यामुळे पोलीसांत तक्रार करण्यास नेहाच्या वडीलांचा विरोध होता. पण त्याला न जुमानता दुसर्या दिवशी नेहा पोलीसांत तक्रार देण्यासाठी माझ्याकडे आली. आम्ही पोलीस ठाण्यात पोहोचलो. तेवढ्यात नेहाचे वडीलही तिथं पोचले. त्यांनी नेहाला गाठून पोलीस ठाण्यामधून तक्रार न देताच माघारी नेलं.
त्यानंतरही नेहा सतत माझ्या संपर्कात होती. नेहाची आई व काकाही भेटून गेले. पोलीसात तक्रार दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत, असं मी त्यांना वारंवार सांगीतलं. परंतु ते मोठ्या कोंडीत सापडले होते. एकीकडे मुलीच्या आयुष्याचा प्रश्न, तर दुसरीकडे समाजाचा दबाव. नेहाच्या कुटुंबीयांसोबतच आमचीही अस्वस्थता वाढली होती. कोंडी मात्र फुटत नव्हती. आम्ही फोनवर विकासशी संपर्क साधला. विकासला नेहाला नांदायला घेऊन जाण्याची विनंती केली, पण तो आमचं म्हणणं मान्य न करता उर्मटपणे उत्तर देत होता.
शेवटी मी विभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांच्याशी संपर्क साधला. ते अत्यंत कर्तव्यदक्ष, सामाजिक भान आणि कायद्याची जाण असलेले पोलीस अधिकारी. नेहाचं लग्न होऊन आठ दिवस उलटले होते. प्रकरण धुमसतच होतं. मार्ग निघत नव्हता. नेहाला व तिच्या कुटुंबियांना जातपंचांचं नाव व दूरध्वनी क्रमांक विचारले तर सांगण्यास कुणीही तयार नव्हतं. ते आम्हाला सांगत होते की, ‘‘ही बाब पोलीसांना कळायला नको.’’
आमच्यासमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. समोर अन्याय घडतो आहे हे कळत असून, समजत असूनही आम्ही काहीही करू शकत नव्हतो. शेवटी ठरलं-कोंडी फोडायची. मी, ‘राज्य महिला आयोगा’च्या त्या वेळच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याशी संपर्क साधला. कृष्णा चांदगुडेंनीही प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. एकाच वेळी निरनिराळी आयुधं वापरली गेली. रहाटकरांनी कारवाईबाबत संबंधितांना सांगीतलं.
पोलीस अधिकारी देवरे व त्यांचा पोलीस ताफा नेहाच्या घरी पोहोचला. मीही तिथं होते. काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विकासवर प्रश्नांचा भडिमार केला. तो असं काही घडलंच नाही असं सांगत होता. ‘‘माझी बायको माहेरी गेली आहे. आज मी तिला घ्यायला जाणार आहे,’’ असं सांगत होता. या गदारोळात एका जातपंचाचं नाव समजलं. प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी त्याच्याकडे गेले असता त्यानेही कानावर हात ठेवले. असं काही घडल्याचं माहीत नाही असं म्हणाला. दृक् -श्राव्य माध्यमांवर बातम्या, चर्चा सुरू झाल्या.
पोलीस अधिकारी देवरे व त्यांचे सहकारी नेहा व तिच्या आईचे जबाब नोंदवून घेत होते. मी त्यांच्या सोबत होते. नेहाच्या घराभोवती पोलीस पहारा होता. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने जमा झाले होते. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून विकास नेहाला घरी आणण्याचे मान्य करून तिच्या गावी निघाला. त्याने सायंकाळी पाच वाजता नेहाचं घर गाठलं. तो नेहाला नांदायला घेऊन जातो, असं म्हणत होता.
नेहाने ही बाब मला कळवली. आता विकासला सरळ सरळ नेहाला घेऊन जाता येणार नव्हतं. मी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलीसांना कळवलं. पोलीसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यामध्ये आणलं. दोघांचेही जबाब नोंदवून घेतले व नंतरच त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली.
नेहा सासरी गेली. थोड्या दिवसांत तिचा संसार मार्गी लागला. अर्थात तरीही नेहाला विकासच्या समाजातील काही लोकांनी मानसिक त्रास देण्याचा प्रयत्नही केला.
समाजात अपप्रवृत्तींबरोबर सत्प्रवृत्ती असतातच. खूप लोकांचे बळ देणारे, प्रोत्साहन देणारे फोन येत होते. पोलीस यंत्रणा आमच्या सोबत होती. ‘महिला आयोगा’ची आम्हाला साथ होती. आमच्या संघटनेचा (मअंनिस) भर भक्कम आधार होता. स्वत:चं आयुष्य उद्ध्वस्त होतंय की काय अशी वेळ येऊनही नेहा जातपंचांचं नाव व फोन नंबर सांगत नव्हती. विकासच्या बाबतीत बोलताना त्याच्यावर गुन्हा दाखल होईल असं बोलणं नेहाने टाळलं. नेहाच्या आईही खबरदारी घेत होत्या. हे सर्व कशामुळे, तर जातपंचांचा असलेला दबाव. पोलीसांत गेले म्हणून जातपंचांच्या कारवाईला सामोरे जाण्याची भीती. हे स्त्रीशोषण थांबवून भीतीमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू या.
अॅड.रंजना पगार-गवांदे | ranjanagawande123@gmail.com
(या लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)