पीटीआय, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आठ जणांसह भाजप, माकप, काँग्रेस आणि आयएसएफ यांच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मतदान केंद्रांची तोडफोड, मतपत्रिकांची जाळपोळ आणि बॉम्बस्फोट असे या हिंसाचाराचे स्वरूप होते.

राजकीय विश्लेषक पश्चिम बंगालमधील या निवडणुकीकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहत होते. मात्र या निवडणुकीत मतपेटय़ा पळवणे आणि त्या जाळून टाकण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी बॉम्बस्फोटही घडवण्यात आल्याचे वृत्त आहे. लोकांनीही राजकीय पक्षांविरोधात प्रचंड संताप व्यक्त केल्याचे आढळले. मुर्शिदाबाद, नादिया आणि कूचबिहार जिल्ह्यांशिवाय दक्षिण २४ परगणातील भांगर आणि पूर्वा मदिनीपूरच्या नंदिग्राममधील काही भागांत मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शनिवारी सकाळी ७ वाजता मतदान सुरू होताच नादिया, मुर्शिदाबाद आणि माल्दा जिल्ह्यांतील हिंसाचारात तृणमूलच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. कूचबिहार जिल्ह्यातील फालीमारीमध्ये भाजपचा मतदान प्रतिनिधी (पोलिंग एजंट) माधव बिस्वास याची हत्या झाल्याचा आरोप आहे. पूर्व बर्दमान जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी गंभीर जखमी झालेल्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तर २४ परगणा येथील कदमबागाची येथे झालेल्या हाणामारीत अपक्ष उमेदवाराचा समर्थक जखमी झाला.

हिंसाचारावरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विधानसभेतील विरोधी पक्षनेते भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निवासस्थान असलेल्या कालीघाटावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. तृणमूलची सत्ता असताना पश्चिम बंगालमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेणे हे एक मृगजळ आहे. राष्ट्रपती राजवट किंवा अनुच्छेद ३५५ लागू करून निवडणुका घेतल्या तरच हिंसाचार टाळता येईल, असेही ते म्हणाले.  

भाजप, माकप आणि काँग्रेस यांची हिंसाचारात युती असल्याचा आरोप ‘तृणमूल’च्या ज्येष्ठ मंत्री शशी पांजा यांनी केला. हिंसाचारामागे तृणमूल असेल तर, हा पक्ष आपल्याच कार्यकर्त्यांचा जीव का घेईल, असा युक्तिवाद पक्षाच्या निवेदनात करण्यात आला आहे. विरोधकांनी पराभव मान्य केला असून हिंसाचारामुळे तृणमूल जिंकला अशी कथा रचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही निवेदनात केला आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते कौस्तव बागची यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना निवेदन देऊन हिंसाचारामुळे पंचायत निवडणूक रद्दबातल करण्याची विनंती केली.

दरम्यान, राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागांना भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. ते म्हणाले, ‘‘लोकांनी मोटार थांबवण्याची विनंती मला केली. त्यांनी माझ्याकडे हत्यांबद्दल, गुंडांनी त्यांना मतदान केंद्रावर जाण्यापासून अडवल्याबद्दल आणि मतदान अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याबद्दल तक्रार केली.’’

हिंसाचारामागे विरोधकच : तृणमूल 

कोलकाता : पंचायत निवडणुकीत विरोधकांनीच हिंसाचार घडवल्याचा आरोप सत्ताधारी तृणमूल काँग्रसने शनिवारी केला. तसेच या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच सर्वाधिक जागा जिंकेल, असा दावाही करण्यात आला. विरोधकांनी माजवलेला हिंसाचार सरकारने मोडून काढला, असा दावाही तृणमूल काँग्रेसचे मंत्री ब्रात्य बसू यांनी केला.

तृणमूलमुळे भारताची जगभर बदनामी : भाजप ‘हत्या’ घडवून आपण सत्ता मिळवू, असे तृणमूल काँग्रेसला वाटते. तृणमूलच्या बॉम्ब संस्कृतीमुळेच भारताची आणि भारतीय लोकशाहीची जगभर बदनामी होत आहे, अशी टीका भाजपने केली. हत्या आणि अंदाधुंदीशिवाय ममता बॅनर्जी जिंकू शकत नाहीत. वर्चस्वासाठी आणखी किती खालच्या पातळीवर येणार, असा सवाल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.