Madhya Pradesh : मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ वाहनांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ वाहने अचानक बंद पडल्याचं पाहायला मिळालं. तसेच या घटनेमुळे पोलीस प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली. या घटनेनंतर संबंधित पेट्रोल पंपावर मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.रम्यान, या घटनेनंतर संबंधित पेट्रोल पंपावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हा कार गुरुवारी रात्री डिझेल भरण्यासाठी रतलाम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर थांबल्या होत्या. तेव्हा ताफ्यातील १९ इनोव्हा कारमध्ये डिझेल भरलं. त्यानंतर ताफा काही अंतरावर गेल्यानंतर एकाचवेळी सर्व गाड्या अचानक बंद पडल्या. ताफ्यातील १९ गाड्या एकाचवेळी बंद झाल्यामुळे मुख्यमंत्र्‍यांबरोबर असलेल्या पोलिसांनाही प्रश्न पडला. यावेळी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

ताफ्यातील सर्व गाड्या अचानक बंद पडल्यामुळे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नियोजित कार्यक्रमाला वेळेत पोहोचवण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ताफ्यातील काही गाड्या चालक आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून गाड्या ढकलण्यात येत असल्याचं दिसत आहे.

संबंधित गाड्यातील डिझेलमध्ये पाणी आढळून आल्यानंतर संबंधित पेट्रोल पंप स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सील केला आहे. तसेच या घटनेनंतर प्रशासनाने इंधनाचे नमुने गोळा केले आणि तपासले असता डिझेलमध्ये पाण्याचा समावेश असल्याचं आढळून आलं. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील एका कार चालकाने सांगितलं की, “वाहने इंदूरहून रतलामला येत होती आणि पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी थांबली होती. वाहनांमध्ये डिझेल भरल्यानंतर काही वाहने निघून गेली आणि १ किमी प्रवास केल्यानंतर अनेक वाहनांत अचनाक बिघाड झाला.”