चंदीगडच्या आयएएस अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये जाऊन जिवाची मुंबई केली. या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २०१५ मध्ये त्यांच्या कार्यकाळात पॅरीस ट्रीप केली. तसंच ६ लाखांहून अधिकचा अनधिकृत खर्च केला. बैठकीला जात आहोत हे सांगून विविध उंची हॉटेल्समध्ये राहणं, धमाल मस्तीसाठी त्यांनी पैसे खर्च केले. विजय देव, अनुराग अग्रवाल आणि विक्रम देवदत्त अशी या तीन अधिकाऱ्यांची नावं आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या हाती या तिघांनी केलेल्या खर्चाचा ऑडिट रिपोर्ट आला आहे. त्यावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे की या अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या खर्चाहून अधिक खर्च केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे प्रकरण कसं उघडकीस आलं?

माहितीच्या अधिकारात चंदीगडच्या अधिकाऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती. चंदीगढच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी मागच्या दहा वर्षांत किती परदेश वाऱ्या केल्या? हा प्रश्न त्यात विचारण्यात आला होता. याबाबतचं उत्तर येताच हे समजलं की तीन अधिकाऱ्यांनी २०१५ मध्ये पॅरीसला जाऊन जिवाची मुंबई केली आहे. हे अधिकारी फाईव्ह स्टार हॉटेल ऐवजी एका लक्झरी निवासस्थानात राहण्यासाठी गेले होते.

RTI च्या अंतर्गत काय समोर आलं?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार RTI च्या अंतर्गत ही माहिती समोर आली आहे की या तिन्ही अधिकाऱ्यांना तीन दिवसांच्या टूरवर जायचं होतं. मात्र हे तिघेही सात दिवस पॅरीसमध्ये होते. त्यांच्या या दौऱ्यासाठी जी रक्कम मंजूर केली गेली होती त्यापेक्षा ४० टक्के जास्त रक्कम या अधिकाऱ्यांनी खर्च केल्याची बाबही ऑडिट रिपोर्ट आणि माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. जो अधिकचा खर्च या तिघांनी केला त्याला एक महिन्याने या तिघांनी मंजुरीही दिली.

हे पण वाचा- पंतप्रधान मोदींच्या ‘सेल्फी पॉईंट’साठी झालेल्या खर्चाची माहिती दिली म्हणून रेल्वे अधिकाऱ्याची बदली ?

१५ ते १७ जून २०१५ या कालावधीत या तीन दिवसांमध्ये चंदीगडच्या या अधिकाऱ्यांची पॅरीसमध्ये एक बैठक झाली. यामध्ये भाग घेण्यासाठी विजय देव यांना ६ लाख ५० हजार, अनुराग अग्रवाल यांना ५ लाख ६० हजार तर विक्रम देवदत्त यांना ५ लाख ७० हजारांचा निधी मंजूर झाला होता. मात्र या सगळ्यांनी यापेक्षा जास्त पैसे खर्च केले. ऑडिट रिपोर्ट समोर आल्याने या उधळपट्टीची बातमी समोर आली आहे. १२ जून ते १८ जून पॅरीसच्या एका उंची प्रॉपर्टी व्हिलामध्ये हे राहण्यासाठी गेले होते.

कुणी उडवाउडवीची उत्तरं दिली, कुणी बाळगलं मौन

यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने विजय देव, विक्रम देव द्त आणि अनुराग अग्रवाल यांच्याकडे विचारणा केली. आपल्याला हे फारसं लक्षात नाही असं अनुराग अग्रवाल म्हणाले. विक्रम देव दत्त म्हणाले मला कार्यालयानेच पाठवलं होतं. तर विजय देव यांनी फोन किंवा इमेलचं काहीही उत्तर दिलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 senior chandigarh ias officers who went to paris switched hotels made unauthorized expenditure says audit report scj
Show comments