Modi Visit to China : भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. तसेच त्याआधी अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयातशुल्क लावले होते. त्यामुळे अमेरिकेकडून लावण्यात येणारं एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे याचा फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अमेरिका-भारत संबंध ताणले गेले आहेत.

अमेरिका सातत्याने भारतावर टीका करत असतानाच आता भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीसाठी चीनला जाणार आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात तियानजिन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता चीनकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांघाय शिखर परिषदेच्या दौऱ्याचं चीन स्वागत करणार असल्याचं अधिकृत निवेदन चीनकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच या निवदेनात चीनने एक महत्वाची प्रतिक्रिया देखील दिली आहे. एकता आणि मैत्रीचा हा नवा टप्पा असल्याचं चीनने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिली आहे.

चीनने निवदेनात काय म्हटलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ शिखर परिषदेसाठी चीनला भेट देणार असल्याच्या वृत्तांनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं की, “एससीओ तियानजिन शिखर परिषद ही एससीओच्या स्थापनेपासूनची सर्वात मोठी शिखर परिषद असेल. एससीओ तियानजिन शिखर परिषदेसाठी चीन पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये स्वागत करत आहे. आम्हाला विश्वास आहे की सर्व पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तियानजिन शिखर परिषद एकता, मैत्री आणि फलदायी मेळावा असेल आणि एससीओ विकासाच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करेल. ज्यामध्ये अधिक एकता, समन्वय, गतिमानता आणि उत्पादकता असेल.”

पंतप्रधान मोदींचा चीन दौरा महत्त्वाचा का आहे?

२०२० मध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गलवान येथे झालेल्या लष्करी संघर्षात २० भारतीय जवान आणि अनेक चिनी सैनिक मारले गेले होते. चीनने अधिकृतपणे त्यांच्या बाजूचे चार सैनिक मारले गेल्याचे कबूल केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा आहे. तेव्हापासून, दोन्ही देशांनी सीमावाद सोडवण्यासाठी राजकीय, लष्करी आणि राजनैतिक स्तरांवर अनेक चर्चा केल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची रशियामधील कझान शहरात भेट झाली आणि त्याच्या काही दिवसांनी, भारत आणि चीनमधील सैनिकांनी माघार घेतली, असे सांगितले जाते. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध सुधारत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चीनमधील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बैठकांमध्ये आपला सहभाग दर्शवला.