दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी गुरुवारी सकाळी आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम आदमी पार्टीचे आमदार फोडण्यासाठी भाजपाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना कसं तोंड द्यायचं? याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीपूर्वी पक्षाचे अनेक आमदार संपर्कात नव्हते, असं वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत अधिक माहिती देताना पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी सांगितलं की, सर्व आमदार सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. या बैठकीसाठी ६० पैकी ५३ आमदार केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आम आदमी पार्टीच्या काही आमदारांशी भाजपानं संपर्क साधला असून त्यांना धमकावण्यात आले आहे. पक्ष फोडण्यासाठी संबंधित आमदारांना प्रत्येकी २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, असा आरोप पक्षाकडून केला आहे.

‘आप’चे सर्व आमदार पक्षासोबत आहेत आणि पक्षासोबतच राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावलेल्या पक्षाच्या आमदारांची बैठक सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. तोपर्यंत सर्व आमदार येतील अशी माझी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया ‘आप’च्या आमदार आतिशी यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील चार आमदारांना भाजपमध्ये सामील व्हा अन्यथा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लादलेल्या खोट्या खटल्यांना तोंड देण्यास तयार राहा, असे लाचेचे प्रलोभन आणि धमकी भाजपतर्फे देण्यात आल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला.

हेही वाचा- ‘आप’च्या चार आमदारांना २० कोटींच्या लाचेचे प्रलोभन ; पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार संजय सिंग यांचा आरोप

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार संजय सिंग यांनी हा आरोप केला. संबंधित चार आमदारही या वेळी उपस्थित होते. सिंग यांनी सांगितले की, अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार या आमदारांसोबत हा प्रकार घडला. भाजपच्या काही नेत्यांसह त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यांच्याकडून हा प्रस्ताव आला होता. या आमदारांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकी २० कोटी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. जर त्यांनी इतर आमदारांना सोबत आणले तर २५ कोटीही देण्याचे प्रलोभन दाखवले होते. जर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारून भाजपमध्ये जाणे नाकारले, तर मात्र उपमुख्यमंत्री सिसोदियांप्रमाणे त्यांना ‘सीबीआय’, ‘ईडी’च्या कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी धमकीही भाजपच्या या नेत्यांकडून देण्यात आली होती, असा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap chief aravind kejriwal hold meeting bjps attempt to buy mlas rmm