आझाद यांच्या निलंबनानंतर भाजप ज्येष्ठांची खलबते
‘डीडीसीए’तील भ्रष्टाचाराच्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात आवाज उठविणारे खासदार कीर्ती आझाद यांची भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर ज्येष्ठांचे ‘मार्गदर्शक मंडळ’ सक्रीय झाले असून आता लालकृष्ण अडवाणी हेच जेटलींविरोधात दंड थोपटत आझाद यांच्या पाठिशी उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. ‘मार्गदर्शक मंडळा’मुळे जेटली यांच्या मार्गातील अडथळ्यांची शर्यत अधिकच अटीतटीची होणार आहे.
आझाद यांच्यावरील कारवाईनंतर भाजपमधील ज्येष्ठांनी गुरुवारी प्रदीर्घ खलबते केली असून जेटली यांनी चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी हे नेते करणार असल्याचे समजते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी स्थापलेल्या या मार्गदर्शक मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोनच ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. असे असले तरी बिहारमधील पराभवानंतर अडवाणी आणि जोशी यांनी पक्षातील अन्य ज्येष्ठांनाही खास बैठकीत सहभागी करून घेतले होते. आझाद यांच्या निलंबनानंतर झालेल्या बैठकीतही हे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.
डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी सुमारे तासभर झालेल्या या बंदद्वार बैठकीत अडवाणी, शांता कुमार व यशवंत सिन्हा सहभागी झाले होते. जेटलींवरील आरोपांबाबत पक्षांतर्गत चौकशी समिती नेमण्याची मागणीही योग्य व्यासपीठावरून करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, आपल्यावरील कारवाईत हस्तक्षेप करण्याची मागणी आझाद यांनीच मार्गदर्शक मंडळाकडे केली होती. रात्री उशिरा आझाद यांनी डॉ. जोशी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

‘निष्कलंक’ पुढाकार
हवाला घोटाळ्यातून अडवाणी जसे निष्कलंक ठरले तसेच जेटलीही ठरतील, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यामुळे अडवाणींच्या जेटलीविरोधी पवित्र्याला वेगळे वलय लाभणार आहे.

शहांची नजर
या बैठकीवर पक्षाच्या एकाही केंद्रीय नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा मात्र या साऱ्या प्रकाराची माहिती दिवसभर घेत होते. केंद्रीय संघटनमंत्री रामलाल यांना या ज्येष्ठांशी चर्चा करण्याची सूचना शहा यांनी केल्याचा दावा सूत्रांनी केला.

डीडीसीएकडूनही कारवाई
माजी अध्यक्ष जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबद्दल क्रिकेटपटु कीर्ती आझाद आणि बिशनसिंग बेदी यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याचा विचार डीडीसीएची कार्यकारिणी करीत आहे. शुक्रवारी या संबंधात कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता आहे.

आझादसमर्थक आक्रमक
आझाद यांच्या निलंबनाविरोधात त्यांच्या सुमारे ४० समर्थकांनी अरुण जेटली यांच्या घरासमोर निदर्शने केली. त्यानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर त्यांनी पक्षविरोधी घोषणा दिल्या. प्रतिबंधात्मक आदेश मोडल्यावरून नऊ निदर्शकांची पोलिसांनी धरपकड केली.

लोकसभा निवडणूक प्रचारापासून मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत होते. आपण खाणार नाही की खाऊही देणार नाही, असे सांगत होते. मग आता ते गप्प का?
राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच भ्रष्टाचार नष्ट करण्याविषयी बोलतो. त्यामुळे मी नेमकी काय चूक केली, हे पंतप्रधानांनीच सांगावं. मला स्पष्ट उत्तराची अपेक्षा आहे.
– कीर्ती आझाद, खासदार

क्रिकेट भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा पक्षशिस्तीशी संबंध असू शकतो का? ‘कारणे दाखवा’ नोटिशीला उत्तर देण्यासाठी मी आझाद यांना साह्य़ करीन.
– सुब्रमण्यम स्वामी, भाजप नेते