Pakistan PM Shehbaz Sharif: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर भारताविरोधात गरळ ओकत असताना आता पंतप्रधान शाहबाज शरीफही भारताविरोधात बरळत आहेत. मंगळवारी एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली होती. यावर टीका करत असताना शाहबाज शरीफ म्हणाले की, आमच्या देशाचा पाण्याचा एकही थेंब शत्रूला आमच्यापासून आम्ही हिरावू देणार नाही.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर भारताने १९६० साली झालेल्या सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानात जाणारे पाणी अडवले होते.
सदर कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार भारताविरोधात गरळ ओकण्यात येत आहे. तसेच पाणी रोखण्याचे कृत्य युद्धाला चिथावणी दिल्यासारखे मानले जाईल, असेही सांगितले जात आहे.
भारताला धडा शिकवू…
इस्लामाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात शाहबाज शरीफ यांनी म्हटले, “आम्ही शत्रू राष्ट्राला सांगू इच्छितो की, तुम्ही जर आमचे पाणी रोखण्याची धमकी देत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पाकिस्तानच्या वाट्याचा एक थेंबही तुम्ही पाकिस्तानपासून हिरावू शकत नाहीत. जर पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असा धडा शिकवू की पुन्हा असे कृत्य करण्याचा विचारही करणार नाहीत.”
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विधानावर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
असीम मुनीर काय म्हणाले होते?
अमेरिकेतील टाम्पा शहरात बोलताना असीम मुनीर म्हणाले की, आता जर संघर्ष सुरु झाला तर भारताच्या पूर्व भागापासून सुरुवात करत आपण पश्चिमेच्या दिशेने जाऊ. मुकेश अंबानी यांची जामनगरमध्ये रिफायनरी आहे. ती जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे. या रिफायनरीवर हल्ला करु. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश आहे. आम्हाला बुडवण्याचा प्रयत्न झाला तर आम्हीही अर्धे जग घेऊन बुडू. पहिला हल्ला रिलायन्सच्या जामनगरमधील रिफायनरीवर करण्यात येईल.