पीटीआय, रायपूर

‘‘स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची देशात दीर्घकाळ सत्ता होती, पण या कालावधीत त्यांनी राष्ट्रउभारणीकडे लक्ष न देता केवळ सरकार स्थापनेवरच लक्ष केंद्रित केले’’, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. देशाचा विकास काँग्रेससाठी कधीही महत्त्वाचा नव्हता आणि तो पक्ष ‘घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणा’च्या पलीकडे पाहू शकत नाही या टीकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत, विकसित छत्तीसगड उपक्रमाअंतर्गत राज्यातील ३४ हजार ४०० कोटी रुपयांच्या १० विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

हेही वाचा >>>“भाजपासाठी ३७० जागा जिंकणं अवघड, तर काँग्रेस…”, प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला लोकसभेच्या निकालाचा अंदाज

मोदी यावेळी म्हणाले की, ‘‘ज्यांनी देशावर दीर्घकाळ सत्ता गाजवली ते मोठा विचार करू शकत नव्हते आणि केवळ राजकीय हितसंबंध लक्षात घेऊनच निर्णय घेत होते. काँग्रेस वारंवार सत्तेवर येत होती, पण ते देशाचे भविष्य घडवायला विसरले’’. काँग्रेसला केवळ सरकार स्थापन करण्यात रस होता, देशाला पुढे घेऊन जाणे हा विषय त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर नव्हताच. आजही काँग्रेसची दशा व दिशा तीच आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

येत्या पाच वर्षांमध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, तर छत्तीसगड विकासाची नवीन उंची गाठेल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.